iNCOVACC: भारत बायोटेकची नाकावाटे देण्यात येणारी iNCOVACC लस आजपासून बाजारात
भारत बायोटेकची नाकावाटे घेण्यात येणारी ही लस सरकारी रुग्णालयामध्ये प्रति डोस 325 रुपयामध्ये उपलब्ध होईल, तर खाजगी रुग्णालयांमध्ये त्याची किंमत 800 रुपये इतकी असेल.
iNCOVACC Intra-Nasal Covid Vaccine: भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने (Bharat Biotech International Limited) विससित केलेल्या इन्कोव्हॅक (iNCOVACC BBV154) या नाकावाटे दिली जाणारी लस आज बाजारात आणली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ मनसुख मांडविया आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते ही लस वितरित करण्यात आली. इन्कोव्हॅक ही नाकातून (सुईशिवाय) दिली जाणारी जगातील पहिली कोविड लस आहे. इंग्रजीमध्ये या लशीला Intra-Nasal Covid Vaccine असं म्हटलं जातं.
Happy Republic Day.... #republicday2023 #BharatBiotech #republicdayindia #RepublicDay #RepublicDayCelebrations #26january #intranasalvaccine #iNCOVACC #india #nation pic.twitter.com/8Jr1vqo64m
— BharatBiotech (@BharatBiotech) January 26, 2023
भारत बायोटेकने विकसित केलेली ही लस सरकारी रुग्णालयामध्ये प्रति डोस 325 रुपयामध्ये उपलब्ध होईल, तर खाजगी रुग्णालयांमध्ये त्याची किंमत 800 रुपये इतकी असेल. कंपनीला डिसेंबर 2022 मध्ये, प्राथमिक 2-डोस शेड्यूलसाठी आणि हेटरोलॉगस बूस्टर डोस म्हणून मान्यता मिळाली होती. त्याआधी सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने 18 आणि त्यावरील वयोगटातील आपत्कालीन परिस्थितीत इंट्रानासल लसीचा वापर करण्यास मान्यता दिली होती.
स्टोरेज आणि वितरणासाठी iNCOVACC लस दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानात ठेवता येते. नाकातून दिली जाणारी ही लस कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांनुसार खास डिझाइन आणि विकसित करण्यात आली आहे. अमेरिकेतील सेंट लुईस, मिसूरी येथील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या भागीदारीत ही लस विकसित करण्यात आली आहे.
भारत बायोटेकची iNCOVACC या इंट्रानेझल कोविड-19 लसीचा पर्याय कोविन ॲपवर (CoWin App) उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 18 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील लोकांना नेझल कोरोना वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येईल. आधी ही लस खाजगी लसीकरण केंद्रवर उपलब्ध होणार आहे.
नेझल कोरोना वॅक्सिन म्हणजे काय? (What is Nasal Corona Vaccine?)
नेझल कोरोना वॅक्सिन (Nasal Corona Vaccine) म्हणजे नाकावाटे देण्यात येणारी कोरोना लस आहे. नाकाद्वारे या लसीचा डोस दिला जातो. या लसीला इंट्रानेझल वॅक्सिन असेही म्हणतात. नाकावाटे देण्यात येणारी ही लस इंजेक्शनला पर्याय म्हणून वापरली जाणार आहे. विशेषत: लहान मुले किंवा वृद्ध ज्यांना ट्रायपॅनाफोबिया आहे, म्हणजेच सुईची भीती वाटते. अशा लोकांसाठी नेझल कोरोना वॅक्सिन उत्तम पर्याय आहे.