Gondia shivshahi bus accident : पोलिसात भरती झाली, कुटुंब गहिवरून गेलं; पण शिवशाही बस अपघाताने आनंद हिरावला, जागेवरच दुर्दैवी मृत्यू
Gondia shivshahi bus accident :
Gondia shivshahi bus accident : पोलिसांत भरती होण्यासाठी अनेक तरुण-तरुणी जीव तोडून मेहनत घेत असतात. अशीच मेहनत गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील स्मित सुर्यवंशी यांनी घेतली होती. दरम्यान तीन महिन्यांपूर्वी पोलिसांत भरती झालेल्या स्मिता सुर्यवंशी यांच्या कुटुंबात आनंदाने गहिवरले होते. मात्र, सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांचा आनंद फार काळ टिकला नाही. गोंदिया येथे झालेल्या शिवशाहीच्या बस अपघातात महिला पोलीस कर्मचारी स्मिता सुर्यवंशी यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
अधिकची माहिती अशी की, गोंदियाच्या कोहमारा गोंदिया मार्गावर डव्वा-खजरी गावाजवळ झालेल्या शिवशाही एस.टी. बसच्या भीषण अपघातात 11 प्रवासी मृत झाल्याची घटना घडली. यामध्ये अर्जुनी मोरगाव येथील स्मिता सुर्यवंन्सी या पोलीस शिपाई महिलेचा समावेश आहे. या अपघातात मृत्यू झालेली स्मिता सुर्यवंशी यांचे पती पोलीस विभागातच कार्यरत होते. त्यांचे यापूर्वीच आजाराने निधन झाले होते. आपले सासू सासरे व एका छोट्याशा बाळासह हलाखीचे जीवन जगत असताना स्मिता हिला पोलीस मुख्यालय गोंदिया येथे पोलीस शिपाई म्हणून दोन तीन महिन्यापूर्वीच नोकरी मिळाली होती. आपले परिवारांना भेटून स्मिता आज 29 नोव्हेंबर ला आपल्या नोकरीवर जाण्यासाठी अर्जुनी मोरगाव वरुन साकोलीला गेल्या आणि गोंदियाला जाण्यासाठी याच बसने जात असता हा अपघात घडल्याने स्मिताचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, गोंदिया एसटी अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन प्रशासनाला दिले आहेत. सध्या मृतांचा आकडा 11 वर असला तरी अनेक प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत.
शिवशाही बस अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांची नावे -
1) स्मिता विक्की सुर्यवंशी, वय- 32 वर्ष, राहणार- अर्जुनी मोरगाव, जि.गोंदिया
2) मंगला राजेश लांजेवार, राहणार- पिपरी, जि.भंडारा
3) राजेश देवराम लांजेवार, राहणार- पिपरी, जि.भंडारा
4) कल्पना रविशंकर वानखेडे, वय- 65 वर्ष, राहणार- वरोरा, जि.चंद्रपूर
5) रामचंद्र कनोजे, वय- 65 वर्ष, राहणार- चांदोरी, ता.साकोली, जि.भंडारा
6) अंजिरा रामचंद्र कनोजे, राहणार- चांदोरी, ता.साकोली, जि.भंडारा
7) आरिफा अजहर सय्यद, वय- 42 वर्ष, राहणार- घोटी, ता.गोरेगाव, जि.गोंदिया
8) अजहर अली सय्यद, वय- 45 वर्ष, राहणार- घोटी, ता.गोरेगाव, जि.गोंदिया
9) नयना विशाल मिटकर, वय- 35 वर्ष, राहणार- बेसा, नागपूर
टिप : मृत्यू पावलेल्या 2 प्रवाशांची अद्याप ओळख पटलेली नाही
अपघातानंतर देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला महत्त्वपूर्ण निर्देश
गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनीनजीक शिवशाही बसचा दुर्दैवी अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे लोक जखमी झाले, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या, असे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास त्यांना नागपूरला हलविण्याची व्यवस्था करा, असेही मी गोंदियाच्या जिल्हाधिकार्यांना सांगितले आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, ते मदतकार्यासाठी समन्वय करीत आहेत. या घटनेतील जखमींना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या