Solar Power Project : शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी पहिला सौरऊर्जा प्रकल्प सुरू, देवेंद्र फडणवीसांचे विशेष प्रयत्न
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नातून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी पहिला सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आलाय.
Solar Power Project for Farmer : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत राज्यात 9200 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यापैकी 3 मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे कार्यान्वित करण्यात झाला. या प्रकल्पामुळे 1753 शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.
सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. हा जगातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे. धोंदलगाव प्रकल्प ही सुरुवात आहे. या वर्षी मार्चमध्ये प्रदान केलेल्या 9200 मेगावॅट विकेंद्रित सौर प्रकल्पांचा हा एक भाग आहे. प्रकल्पांतर्गत संपूर्ण क्षमता डिसेंबर 2025 पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जाणार आहे, असे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले.
धोंदलगाव येथे महावितरणच्या उपकेंद्रापासून सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या 13 एकर शासकीय जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या कामासाठी महावितरणकडून संबंधित कंपनीला 7 मार्च 2024 रोजी कार्यादेश देण्यात आला तसेच 17 मे रोजी वीजखरेदी करार करण्यात आला. त्यानंतर अवघ्या साडेचार महिन्यांत प्रकल्प उभारून 5 सप्टेंबर रोजी कार्यान्वित करण्यात आला आहे. हा प्रकल्प महाविरणच्या धोंदलगाव 33 केव्ही उपकेंद्राशी जोडण्यात आला आहे. त्यामुळे उपकेंद्रातून निघणाऱ्या 5 वीजवाहिन्यांवरील 1753 शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळणार आहे. धोंदलगाव, नालेगाव, अमानतपूरवाडी व संजरपूरवाडी या गावांतील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2020 रोजी सत्तेची सूत्रे स्वीकारल्यानंतर किमान तीस टक्के कृषी फीडर्स डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेवर चालविण्यासाठी मिशन 2025 जाहीर केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती देण्यात आली.
16 हजार मेगावॉट विकेंद्रीत सौर ऊर्जा क्षमता निर्मिती उद्दिष्टास शासनाने मान्यता
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे. मिशन मोडवरील या योजनेतून सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेचे उद्दिष्ट 7 हजार मेगावॅटने वाढवून 16 हजार मेगावॉट विकेंद्रीत सौर ऊर्जा क्षमता निर्मिती उद्दिष्टास शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील शंभर टक्के कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीजपुरवठा होणार आहे.
सौर ऊर्जेचा वापर करून वीज निर्माण करायची व त्याच्या आधारे कृषी पंप चालवायचे अशी ही योजना आहे. त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी विकेंद्रित स्वरुपात सौर ऊर्जा निर्मिती केंद्रे उभारण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा भरवशाचा वीज पुरवठा होण्यासोबत स्वस्तात वीज उपलब्ध झाल्याने उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी करण्याची संधी भविष्यात मिळणार आहे. या योजनेमुळे कृषी क्षेत्राला मोलाची मदत करण्यासोबतच उद्योगांनाही प्रोत्साहन मिळणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या