Aurangabad News: केमिकलच्या स्फोटाने घर कोसळले, एकाचा जागीच मृत्यू; औरंगाबादच्या हर्सूलजवळील घटना
Aurangabad News: याप्रकरणी हर्सल पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
Aurangabad News: औरंगाबादच्या (Aurangabad) हर्सूल परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टँकर मागे घेतना त्यामधील केमीकल खाली पडून झालेल्या स्फोटामुळे एक तरूण मजूर ठार, तर त्याचे आई-वडील व भाऊ जखमी झाले. रात्रीच्या सुमारास झालेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हर्सल परिसरातील चेतनानगर येथील वीटभट्टीजवळ ही घडली आहे. भावनेश नंदू पवार (वय 19 ववर्षे, रा. बिडकीन, ता. पैठण, ह.मु. चेतनानगर वीटभट्टी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर नंदु पवार (वय 45 वर्षे), चंदा पवार ( वय 40 वर्षे) व योगेश पवार (वय 17 वर्षे) अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदू पवार आणि त्यांचे कुटुंब हे हर्सलमधील चेतनानगर येथील रवी भगुरे यांच्या मातीच्या वीटभट्टीवर कामाला आहेत. त्यांना विटभट्टीजवळच घरात राहण्याची व्यवस्था मालकाने करून दिली आहे. मंगळवारी रात्री पवार कुटुंबाने जेवण केल्यानंतर झोपी गेले होते. यावेळी शेजारी जवळच असलेल्या सुनिल कासारे व राजू पटेल यांची सिमेंटच्या विटा बनविण्याची भट्टी आहे. या सिमेंट विट बनविन्यासाठी फ्लॅश या केमीकलचा वापर करण्यात येतो. त्यामुळे हे केमीकल घेऊन टँकर आला होता.
दरम्यान यावेळी चालक केमीकल उतरविण्यासाठी टँकर मागे घेत असतना त्याच्या धक्का पवार यांच्या घराच्या भिंतीला लागला. त्यामुळे टँकरमधील केमीकल हे खाली पडून त्याचा स्फोट झाल्याने पवार यांच्या घराच्या चार भिंती कोसळल्या आहेत. या भिंतीखाली चौघेही दबले होते. स्फोटाचा आणि घर कोसळल्याने आवाज झाल्याने इतर मजूर जागे झाले. त्यांनी पवार कुटुंबियांना बाहेर काढून घाटी रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना भावनेश पवारचा पहाटे मृत्यू झाला. याप्रकरणी हर्सल पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक एस. के. चव्हाण व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.
एकच धावपळ उडाली...
नंदू पवार आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य घरात असताना, बाजूला असलेल्या सिमेंटच्या विटा बनविण्याची भट्टीवर फ्लॅश नावाच्या केमीकलचा टँकर आला होता. मात्र टँकर मागे घेताना त्याचा धक्का नंदू पवार यांच्या घराला लागला. ज्यामुळे टँकरमधील केमिकल खाली पडल्याने स्फोट झाला. या स्फोटामुळे पवार यांचा घर पडल्याने जोरदार आवाज झाला. अचानक स्फोट आणि त्याच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. तर आजूबाजूला असलेल्या लोकांची एकच धावपळ उडाली. बाजूला आलेल्या नागरिकांनी तत्काळ पवार कुटुंबातील जखमींना घाटीत दाखल केले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Aurangabad News: मोठी बातमी! शिंदे गटातील मंत्र्याचा ताफा महिलांनी अडवला; औरंगाबादेतील घटना