(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: 'ईश्वर चिट्ठी'ने औरंगाबादच्या 'या' पाच ग्रामपंचायत सदस्यांचे नशीब उजळले
Aurangabad Gram Panchayat Election Result: ईश्वर चिट्ठी काढल्यावर एकाचा विजय आणि दुसऱ्याला पराभवाचा सामना करावा लागला.
Aurangabad Gram Panchayat Election Result: औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण 216 ग्रामपंचायतीचे अंतिम निकाल मंगळवारी समोर आले आहेत. ज्यात पाच ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांना सारखीच एक समान मते मिळाल्याने ईश्वर चिट्ठी काढावी लागली. ज्यात एकाचा विजय आणि दुसऱ्याला पराभवाचा सामना करावा लागला. या पाचही घटना जिल्हाभरात चर्चेचा विषय ठठरला आहे.
पहिली घटना कन्नड तालुक्यात...
समान मते पडल्याची पहिली घटना कन्नड तालुक्यात समोर आली. तालुक्यातील गराडा ग्रामपंचायत निवडणुकीत दोन सख्या मावस भावांच्या अर्धागणी निवडणुकीत एकमीकींच्या विरोधात रिंगणात होत्या. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पूजा सचिन राठोड तर शिंदे गटाकडून रेश्मा राहुल राठोड रिंगणात होत्या. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता. आपणच विजय होणार असा विश्वास दोन्ही गटाकडून व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान मतमोजणी वेळी दोघींना 540 समान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली आहे. ज्यात पूजा सचिन राठोड यांचा विजय झाला आहे.
दुसरी आणखी एक घटना कन्नडमध्येच समोर आली आहे. कन्नड तालुक्यातील नेह्गाव येथील ग्रामपंचायत सदस्यासाठी निवडणूक लढवणाऱ्या दोन उमेदवारांना समान मते मिळाली आहे. ज्यात रेखा गणेश बोगणे आणि कांदे कल्याणी नागेश्वर यांना 539 अशी समान मते मिळाली. त्यामुळे एका लहान मुलाच्या हाताने ईश्वर चिट्ठी टाकून निवड केली असता रेखा गणेश बोगाणे विजयी झाल्या आहेत.
तिसरी घटना औरंगाबाद तालुक्यात...
समान मते मिळाल्याची तिसरी घटना औरंगाबाद तालुक्यातील लायगाव ग्रामपंचायतमध्ये समोर आली. लायगाव ग्रामपंचायत सदस्य पदासाठी नामदेव बोंगाणे आणि चंद्रकांत बोंगाणे रिंगणात होते. यावेळी या दोन्ही उमेदवारांना समान 189 मते पडली. त्यामुळे यासाठी चिठ्ठी काढावी लागली. एका लहान मुलीच्या हाताने काढण्यात आलेल्या ईश्वर चिठ्ठीनंतर चंद्रकांत बोंगाणे यांचा विजय झाला आहे.
चौथी घटना
चौथी घटना औरंगाबादच्या पिंपळगाव पांढरी येथे समोर आली आहे. येथे देखील दोन्ही उमेदवार यांना समान मते पडली आहे. ग्रामपंचायत सदस्य पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या जयश्री ठोंबरे आणि पुष्पा ठोंबरे यांना 145 समान मते पडली होती. त्यामुळे अखेर ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. ज्यात जयश्री ठोंबरे विजयी झाला आहे.
पाचवी घटना पैठण तालुक्यात
एकसमान मते पडल्याची पाचवी घटना पैठण तालुक्यातील तारु पिंपळवाडी ग्रामपंचायतमध्ये समोर आली आहे. सदस्य पदाच्या निवडणुकीत छाया थोटे व वंदना थोटे यांना 164 समसमान मते पडली होती समसमान मते पडल्याने लहान मुलाच्या हस्ते ईश्वर चिठ्ठी टाकण्यात आली. यात वंदना थोटे या विजयी झाल्या आहेत.
ग्रामपंचायत हटके निकाल! आपल्याच संस्थाचालकाचा पराभव करून शिपाई बनला 'गावाचा कारभारी'