अमरावतीतही उदयपूरसारखंच हत्याकांड? नुपूर शर्मांचं समर्थन केल्यानं व्यावसायिकाची हत्या, भाजपचा आरोप; NIA, ATS कडून तपास सुरु
Maharashtra Amravti News : नुपूर शर्मांचं समर्थन केल्यानंच अमरावतीतील मेडिकल व्यावसायिकाची हत्या, भाजपचा आरोप, तर चौकशीसाठी NIA चं पथक अमरावतीत दाखल
Maharashtra Amravti News : अमरावतीमध्ये (Amravti) उदयपूरसारखी हत्या झाल्याचा आरोप भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केला आहे. गेल्या 21 जून रोजी अमरावतीतील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची गळा कापून हत्या करण्यात आली होती. कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या काही पोस्ट व्हायरल केल्या होत्या, असा दावा खासदार बोंडे यांनी केला आहे. त्यामुळे ही घटना उदयपूरप्रमाणे असल्याचा आरोप बोंडे यांनी केला आहे. या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एनआयएचं (NIA) पथक अमरावतीत दाखल झालं आहे. पोलिसांनी हत्या प्रकरणात 5 आरोपींना अटक केली असली तरी या हत्येचा सूत्रधार शोधण्यासाठी एसआयटीमार्फत चौकशी (SIT) करण्याची मागणी भाजपनं केली होती. अशातच, एटीएस (ATS) याप्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे.
महाराष्ट्र एटीएसचे पथक अमरावतीमध्ये या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. एटीएसच्या सूत्रांनी सांगितलं की, ते या प्रकरणाचा दहशतवादाशी संबंध आहे का? याचा तपास करत आहे. उदयपूरच्या आरोपींप्रमाणे अमरावतीच्या आरोपींनीही हाच नमुना वापरला आहे का, याचा तपास एटीएस करत आहे. तपास अजूनही स्थानिक पोलिसांकडे आहे, पण एटीएस समांतर तपास करत आहे. एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, महाराष्ट्र एटीएसचं पथक गेल्या काही दिवसांपासून अमरावतीत आहे.
अमरावती येथील अमित मेडिकलचे संचालक उमेश कोल्हे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. राजस्थानमधील उदयपूरमध्ये झालेल्या हत्येप्रमाणेच अमरावती शहरात ही हत्या झाली असल्याचं बोललं जात आहे. मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांनी नुरूर शर्माच्या काही पोस्ट व्हायरल केल्या होत्या आणि म्हणून त्यांची हत्या झाली, असा अंदाज भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे. या हत्येचा काटेकोर तपास करावा अशी मागणी भाजपच्या वतीनं पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली होती. खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत भाजपचं एक शिस्टमंडळ पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांना भेटलं आणि घटनेचा मुख्य आरोपीचा तपास करा, अशी मागणी केली होती. या प्रकरणी अटकेत असलेल्या 5 आरोपींनी अद्याप हत्येचा उद्देश सांगितला नाही, आम्हाला एकानं हत्या करण्यास सांगितलं, अशी माहिती त्यांनी दिली.
MHA has handed over the investigation of the case relating to the barbaric killing of Shri Umesh Kolhe in Amravati Maharashtra on 21st June to NIA.
— गृहमंत्री कार्यालय, HMO India (@HMOIndia) July 2, 2022
The conspiracy behind the killing, involvement of organisations and international linkages would be thoroughly investigated.
खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी अजून एक गंभीर आरोप केलाय की, अमरावती शहरात 10 लोकांना नुपूर शर्मांच्या पोस्ट लिहिल्याबद्दल धमक्या आल्या असून त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेण्यात आला आहे. मात्र या धमक्या कुणी दिल्या, याचाही तपास अद्याप पोलिसांकडून झालेला नाही, असा आरोपही खासदार डॉ. बोंडे यांनी केला होता. विशेष म्हणजे, या 10 जणांनी अद्यापही पोलीस तक्रार दिली नाही, पण समाजामध्ये भितीचं वातावरण निर्माण होऊ नये आणि भयमुक्त समाजाकरिता आरोपींना अटक होणं गरजेचं आहे, असं बोडेंचं म्हणणं आहे.
पोलिसांनी या हत्येप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. पण हत्येचा कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पोलिसांनी नुकतीच एक प्रेसनोट जारी करत सांगितलं की, या गुन्ह्या संबंधात कोणीही धार्मिक तेढ निर्माण होईल, असं वक्तव्य करू नये, असं केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. गुन्ह्याचा सर्व बाजूनं तपास तसेच तांत्रिक दृष्ट्या सखोल तपास सुरू आहे, असंही पोलिसांकडून सांगितलं गेलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :