(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amravati Crime : अमरावतीत मेडिकल व्यावसायिकाची हत्या 'त्या'च कारणामुळे ; भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केला संशय
सोशल मीडियावरील पोस्टला समर्थन देणाऱ्यांविरोधात हिंसाचार सुरु आहे. या मालिकेतच अमरावती येथील व्यावसायिकाची हत्या झाली असून पोलिसही तपास करत नसल्याचा आरोप भाजपचे खासदार डॉ. बोंडे यांनी केला आहे.
अमरावतीः नुपूर शर्माच्या पोस्टला समर्थन करणाऱ्या एका टेलरही हत्या ज्याप्रकारे राजस्थानमध्ये झाली, त्याच प्रकारे अमरावती शहरात उमेश कोल्हे यांची हत्या झाली आहे. उमेश हे मेडिकल व्यावसायिक होते. तसेच त्यांनी नुपूर शर्माच्या काही पोस्ट व्हायरल केल्या होत्या. म्हणून त्यांची हत्या झाली असावी असा अंदाज भाजपचे खासदार डॉ अनिल बोंडे यांनी व्यक्त केला.
या प्रकरणी अटक असलेल्या आरोपींनी अद्याप हत्येचा उद्देश अद्याप सांगितेला नाही. त्यांनी फक्त 'आम्हाला एकाने हत्या करण्यास सांगितले' म्हणून आम्ही हत्या केली अशी माहिती पोलिसांनी आपल्याला दिली असल्याचे डॉ बोंडे यांनी सांगितले. सोबतच शहरात 10 लोकांना नुपूर शर्माच्या पोस्ट लिहिल्याबद्दल धमक्या आल्या आहेत. पोस्ट लिहीणाऱ्यांकडून माफीनामा लिहून घेण्यात आला, मात्र ह्या धमक्या कुणी दिल्या? याचाही तपास अद्याप पोलिसांकडून झालेला नाही, असा गंभीर आरोप डॉ बोंडे यांनी केला आहे.
समाजात भयाचे वातावरण निर्माण होऊ नये आणि भयमुक्त समाजाकरिता आरोपींना अटक होणे गरजेचे आहे. त्यामुळे तातडीने धमक्या देणाऱ्या लोकांना पोलिसांनी अटक करावी. ज्यांना धमक्या मिळाल्या त्यांना संरक्षण द्यावे आणि कोल्हे यांच्या हत्येतील मास्टर माईंडला अटक करण्यात यावी यासाठी त्यांनी पोलिसांची भेट घेतली. तसेच कोल्हे यांच्या हत्येच्या घटनेचा निषेध भाजपतर्फे करण्यात आला. पोलीसांनी या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. पण हत्येचा कारण अद्यापही अस्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई
पोलिसांनी नुकतंच प्रेसनोट जारी करत सांगितले की, या गुन्ह्याचे संबंधाने कोणीही धार्मिक तेढ निर्माण होईल, असे विधान करू नये केल्यास कलम 153 (अ) भा.दं.वी. प्रमाणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद करण्यात येईल. गुन्ह्याचा सर्व बाजूने तपास तसेच तांत्रिक दृष्ट्या सखोल तपास सुरू आहे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
इतर बातम्या