Ram Navami 2023 : शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सव सुरु तर शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात स्वाहाकार यागास प्रारंभ
Ram Navami 2023 : शिर्डीत आजपासून तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. तर श्री रामनवमी उत्सवानिमित्त शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात स्वाहाकार यागास सुरुवात झाली आहे.
Ram Navami 2023 : शिर्डीत (Shirdi) आजपासून तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. 1911 साली सुरू झालेला रामनवमी उत्सव आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साईबाबा संस्थानच्या वतीने 29 ते 31 मार्च दरम्यान तीन दिवसीय रामनवमी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. साईबाबांची काकड आरती आणि पोथी मिरवणुकीनंतर धार्मिक कार्यक्रम पार पडले. पुढील तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून उद्या (30 मार्च) म्हणजेच रामनवमीच्या मुख्य दिवशी साई मंदिर (Sai Baba Temple) रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. रामनवमी उत्सवासाठी दरवर्षी राज्यभरातून शेकडो पालख्या (Palkhi) घेऊन साईभक्त पायी शिर्डीत येतात. यंदाही भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत.
मंदिर परिसराला फुलांची सजावट, विद्युत रोषणाई
रामनवमी उत्सवानिमित्त समाधी मंदिर आणि परिसरात अमेरिकेतल्या दानशूर साईभक्त श्रीमती शोभा पै यांच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार आहे. तर मुंबई इथल्या द्वारकामाई मंडळाच्यावतीने समाधी मंदिर आणि परिसरात विद्युत रोषणाई तसंच प्रवेशद्वारावर काल्पनिक भव्य देखावा उभारण्यात आला आहे. तसंच वाढते तापमान लक्षात घेऊन राज्यभरातून येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेसाठी ठिकठिकाणी मांडव उभारण्यात आले असून साई मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
शिर्डीमध्ये रेलचेल
साईबाबा हयात असताना हा उत्सव मोठा उत्साहाने साजरा करत होते. आजही साईसंस्थान आणी गावकरी मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करतात. तीन दिवस अनेक कार्यक्रमाची रेलचेल शिर्डीत असते. पंढरपूरप्रमाणे शिर्डीलाही अनेक पायी पालख्या येतात. यंदाही राज्यभरातून शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. साईनामाचा गुजर करत खांद्यावर पालखी घेऊन नाचत गात अनेक भक्त शिर्डीत आल्याने रामनवमी उत्सवाला मोठी रंगत आली आहे.
श्री रामनवमी उत्सवानिमित्त शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात स्वाहाकार यागास प्रारंभ
दुसरीकडे दरवर्षीप्रमाणे यंदाही बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथल्या संत गजानन महाराज मंदिरात रामनवमी उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करुन होत आहे. गुढीपाडव्याला या उत्सवाची सुरुवात होऊन रामनवमीला मोठा उत्सव संत गजानन महाराज मंदिरात संपन्न होत आहे. श्री रामनवमी निमित्त श्रींच्या मंदिरात काल (28 मार्च) आध्यात्म रामायण स्वाहाकार यागास प्रारंभ झाला असून उद्या (30 मार्च) रामनवमी उत्सवासाठी राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत.