(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...
Baipan Bhaari Deva : केदार शिंदेच्या ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाबद्दल एका शब्दात सांगायचं झालं तर ‘भारी’ एवढंच म्हणता येईल.
केदार शिंदे
रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब
Baipan Bhaari Deva : केदार शिंदेच्या (Kedar Shinde) ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) या सिनेमाबद्दल एका शब्दात सांगायचं झालं तर ‘भारी’ एवढंच म्हणता येईल.
कधी कधी स्वत:कडे त्रयस्थपणे पाहाणं फार गरजेचं असतं. कारण जेव्हा आपण त्या कॅमेऱ्यातून स्वत:च्या आयुष्याकडे पाहातो तेव्हा आपणच केलेला गुंता ठळकपणे दिसायला लागतो आणि मग डोंगराएवढ्या वाटणाऱ्या प्रश्नांचीही अगदी सहज उत्तरं मिळून जातात. हा सिनेमा म्हणजे ‘तो’ कॅमेरा आहे. स्वत:कडे, आपल्या नात्यांकडे, आपल्या माणसांकडे नव्याने पाहायला लावणारा.
अगदी नकळत घडलेल्या एखाद्या गोष्टीमुळे घट्ट नात्यात दुरावा येतो. जिथं एकदुसऱ्याला समजून घेण्याची गरज असते तिथं इगो आडवा येतो आणि मग दुरावा वाढतच जातो. मग पुढे कधीतरी, कुठेतरी झालेल्या चुकीची जाणीव होते आणि मग पश्चाताप होतो आणि वाटत राहातं की अरे आपण त्याचवेळी का नाही बोललो? हा सिनेमा ती जाणीव आपल्याला करुन देतो.
सिनेमाच्या गोष्टीबद्दल बोलायचं झालं तर अगदी साधीसरळ कथा आहे. किरकोळ कारणावरुन दुखावल्या आणि दुरावल्या गेलेल्या बहिणींची. त्यांच्या नात्यांची पुनर्भेट ही या सिनेमाची वनलाईन.
‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाची सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे यातली पात्रं आणि ती साकारणारी तेवढीच दमदार कलाकार मंडळी. यातलं प्रत्येक पात्र तुमच्या-आमच्या घरातलं वाटतं त्यामुळं ते प्रेक्षकांशी थेट कनेक्ट होतं आणि ते कनेक्ट होणं हेच या सिनेमाचं यश आहे. ड्रामा हवा म्हणून कुठेही लॉजिकचा बळी दिलेला नाही. ना लिहिताना ना पडद्यावर साकारताना. त्यामुळेच त्याचा परिणाम दीर्घकाळ राहतो. याचं श्रेय अर्थातच दिग्दर्शक केदार शिंदे आणि लेखिका वैशाली नाईक (Vaishali Naik) यांचं. एक साधा सरळ फॅमिली ड्रामा प्रेक्षकांना गुंतवून ठेवेल इतक्या उत्तम रितीनं साकारला आहे.
रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukunya Mone), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) आणि दीपा परब चौधरी (Deepa Parab) या साऱ्यांनीच कमाल केली आहे. मुळात लिखाणाच्या पातळीवर प्रत्येकीचं पात्र आणि तिची गोष्ट उत्तम पद्धतीनं लिहिली गेलीय.
सिनेमाची तांत्रिक बाजूही भक्कम आहे. वासुदेव राणे यांचा कॅमेरा, साई पियुष जोडीचं संगीत आणि मयुर हरदास यांनी केलेलं संकलन. या साऱ्या जमेच्या बाजू असताना खटकतं काय तर मध्यंतरानंतर कमी झालेलं स्पीड. सिनेमा तिथं काहीसा रेंगाळल्यासारखा वाटतो. ही एक गोष्ट सोडली तर ‘बाईपण भारी देवा’ हा संपूर्ण कुटुंबासोबत आवर्जून घ्यावा असा अनुभव आहे. या सिनेमाला मी देतोय साडेतीन स्टार्स.