Health: प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिताय? सावधान! कर्करोग, हृदयविकार अन् रक्तदाबाला आमंत्रण, संशोधनातून समोर
Health: प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी प्यायल्याने शरीराला कसे नुकसान होते? संशोधनातून माहिती समोर, जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
Health: आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्लास्टिकचा वापर खूप वाढला आहे. अनेकदा आपण बाजारातून प्लास्टिक पिशवीतून भाजी आणतो आणि मसाले प्लास्टिकच्या डब्यात ठेवतो. एवढेच नाही तर काही लोक प्लास्टिकच्या बाटल्यांचे पाणीही पितात. पण प्लॅस्टिकच्या बाटल्यांचे पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहित, तर जाणून घ्या...
प्लास्टिकमुळे रक्तदाब कसा वाढतो? अभ्यासात म्हटलंय...
आपण अनेकदा प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पितो. पण असे केल्याने तुमचा रक्तदाब वाढू शकतो, सोबत अनेक आजारांना आमंत्रण मिळते, हे तुम्हाला माहिती आहे का? प्लॅस्टिकच्या बाटल्यांचे पाणी पिण्याने शरीराला कसे नुकसान होते? न्यूयॉर्क पोस्टमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार, अलीकडील अभ्यासात असे दिसून आले आहे की प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिल्याने उच्च रक्तदाब होऊ शकतो. ऑस्ट्रियातील डॅन्यूब प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये हा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात असे आढळून आले की जेव्हा प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी प्यायले जाते तेव्हा प्लास्टिकचे छोटे कण पाण्यात मिसळतात आणि त्यानंतर ते पाण्याद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतात. या प्लास्टिक कणांना मायक्रोप्लास्टिक्स म्हणतात. ते आपल्या शरीरात रक्तप्रवाहात प्रवेश करतात आणि बराच वेळ रक्तात राहून आपले बीपी वाढवतात.
संशोधनात आठवडाभर प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिण्यास मनाई
विद्यापीठाने काही लोकांवर एक संशोधन केले, ज्यामध्ये त्यांनी काही लोकांना आठवडाभर प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिण्यास मनाई केली. आठवडाभरानंतर असे आढळून आले की, प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिणाऱ्यांपेक्षा या बाटलीतील पाणी न पिणाऱ्यांचा रक्तदाब कमी होता.
कर्करोग आणि हृदयविकाराचा धोका
काही वर्षांपूर्वी एका शास्त्रज्ञाने असा दावा केला होता की, एका आठवड्यात सुमारे 5 ग्रॅम मायक्रोप्लास्टिक मानवी शरीरात प्रवेश करते. जे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. यामुळे बीपी तर वाढतोच, पण हृदयाच्या समस्या आणि कॅन्सरचा धोकाही वाढतो.
हेही वाचा>>>
Health: उपवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, उपवास केल्यानं कर्करोगाचा धोका कमी होतो? एका संशोधनातून खुलासा, नेमकं सत्य काय?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )