(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Friday Movies Release : सिनेप्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी; आज प्रदर्शित होणार 'हे' हिंदी-मराठी सिनेमे
Friday Movies Release : आज 'फोन भूत', 'मिली', 'मन कस्तुरी रे', '36 गुण' असे वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहेत.
Friday Movies Release : शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांची (Movies) प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. तर काही सिने रसिक वीकेंडला कोणता सिनेमा पाहायचा हे ठरवत असतात. आज शुक्रवारी अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे या शुक्रवारी प्रेक्षकांना मनोरंजनाची चांगलीच मेजवानी मिळणार आहे.
फोन भूत (Phone Bhoot)
कैटरीना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरचा 'फोन भूत' हा हॉरर विनोदी सिनेमा आहे. गुरमीत सिंह दिग्दर्शित आणि रविशंकरन आणि जसविंदर सिंग बाथ लिखित, 'फोन भूत' हा सिनेमा रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटद्वारा निर्मित आहे.
मिली (Mili)
'मिली' हा थरार नाट्य असणारा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहे. जान्हवी कपूरशिवाय 'मिली' सिनेमात सनी कौशल तिच्या प्रियकराच्या भूमिकेत तर मनोज पाहवा तिच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. हसलीन कौर, राजेश जैस या कलाकारांनी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. मिली हा सिनेमा 2019 साली प्रदर्शित झालेल्या हेलन या मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे.
डबल एक्सएल (Double XL)
'डबल एक्सएल' या सिनेमात हुमा कुरॅशी आणि सोनाक्षी सिन्हा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. बॉडी शेमिंग या गंभीर विषयावर विनोदी पद्धतीने भाष्य करणारा हा सिनेमा आहे. सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांच्यासोबतच जहीर इकबाल आणि तमिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता महत राघवेंद्र हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
मन कस्तुरी रे (Mann Kasturi Re)
संकेत माने दिग्दर्शित 'मन कस्तुरी रे' हा सिनेमा आज 4 नोव्बेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनय बेर्डे आणि तेजस्वी प्रकाश मुख्य भूमिकेत आहेत. भरपूर सस्पेन्स आणि ट्विस्ट या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
प्रेम प्रथा धुमशान
सिंधुदुर्गातील गावपळणीची अनोखी प्रथा आणि त्या दरम्यानची थरारक प्रेमकथा आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राष्ट्रीय पुरस्काप्राप्त अभिजीत मोहन वारंग दिग्दर्शित ‘प्रेम प्रथा धुमशान’ हा सिनेमा आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबसह विनायक चव्हाण, अभय खडपकर, अभय नेवगी, मिलिंद गुरव, विश्वजित पालव, विद्याधर कार्लेकर, निकिता सावंत, कल्पना बांदेकर असे दमदार कलाकार या सिनेमात आहेत.
36 गुण (36 Gunn)
अभिनेता संतोष जुवेकर आणि अभिनेत्री पूर्वा पवार मुख्य भूमिकेत असलेल्या '36 गुण’ या सिनेमात पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. कुटुंबाच्या आशीर्वादाने, रीतसर पत्रिका बघून लग्न केलेल्या सुधीर आणि क्रियाला मधुचंद्रापासूनच एकमेकांच्या उणीवा जाणवू लागतात. यातूनच त्यांच्या नात्यात खटके उडू लागतात. नेमकं काय चूक? काय बरोबर? या व्दिधा मनःस्थितीत त्यांचं नातं कोणतं वळण घेतं? याची मनोरंजक तितकीच विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे '36 गुण' हा सिनेमा.
संबंधित बातम्या