Mumbai Crime : लोन फर्ममधील कर्मचाऱ्याला पिस्तुल दाखवून धमकावलं, मुंबईतील रहिवासी अटकेत
कर्मचाऱ्याला परवानाधारक शस्त्र दाखवून धमकावल्याप्रकरणी मुंबईतील वरळी येथील रहिवाशाला अटक करण्यात आली आहे.

Mumbai Crime : फायनान्शियल कंपनीतील (Financial Company) कर्मचाऱ्याला परवानाधारक शस्त्र दाखवून धमकावल्याप्रकरणी मुंबई (Mumbai) वरळी (Worli) येथील रहिवाशाला अटक करण्यात आली आहे. संबंधित कर्मचारी कर्जाची वसुली करण्यासाठी आरोपीच्या घरी आला होता. वरळी पोलिसांनी आरोपी बच्चन खान (वय 52 वर्षे) या वरळी येथील व्यापाऱ्याला अटक केली आहे. पोलिसांनी शनिवारी (16 जुलै) त्याला कोर्टात हजर केलं असता त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, "तक्रारदार प्रकाश माळी हे एका फायनान्शियल कंपनीचे कर्मचारी असून ते कर्जाची वसुली करण्यासाठी शुक्रवारी (15 जुले) वरळीतील ई मोजेस रोड इथल्या खान याच्या फ्लॅटवर गेले होते. यावेळी बच्चन खानने त्याला घरात ओढले, शिवीगाळ केली आणि 'दोबारा पैसा मांगा तो इधर ही ठोक डालूंगा' (पुन्हा पैसे मागितले तर मी गोळ्या घालेन) म्हणत शस्त्राने धमकावले. शिवाय प्रकाश माळी यांना घराबाहेर जाऊ दिलं नाही"
दरम्यान बच्चन खानच्या घरातून सुटका झाल्यानंतर प्रकाश माळी यांनी वरळी पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला आणि बच्चन खानविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरळी पोलिसांनी खानला अटक केली असून त्याच्याकडून परवाना रिव्हॉल्व्हर आणि आठ काडतुसे जप्त केली आहेत. त्याचा परवाना रद्द करण्यासाठी पोलीस आता शहर पोलीस प्रमुखांना पत्र लिहिणार आहेत.
इतर बातम्या
Mumbai Crime : संपत्तीवरुन वाद, 22 वर्षीय तरुणाने आईला संपवलं, नंतर उचललं टोकाचं पाऊल, मुंबईतील घटना
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
