Kurla Bus Accident: कुर्ला बस अपघातानंतर बाप मदतीला धावला; अचानक हाती मुलाचाच मृतदेह आला, अंगावर काटा आणणारा क्षण!
Kurla Bus Accident: कुर्ला बस अपघातामध्ये शिवम कश्यप या विद्यार्थ्याचा देखील मृत्यू झाला.
Kurla Bus Accident मुंबई: मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये काल रात्री नऊच्या सुमारास झालेल्या बेस्ट बसच्या अपघातानं (Mumbai Kurla Bus Accident) अवघा महाराष्ट्र हादरला. कुर्ला एलबीएस मार्गावरून भरधाव वेगानं जाणाऱ्या बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटून एक भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा जीव गेला. तर 49 जण गंभीर जखमी झाले. त्याशिवाय बसच्या धडकेनं रस्त्यावरच्या 20-22 वाहनांचंही मोठं नुकसान झालं.
बापाच्या हाती अचानक मुलाचाच मृतदेह आला-
कुर्लातील बस अपघातानंतर आता विविध माहिती समोर येत आहे. या अपघातामध्ये शिवम कश्यप या विद्यार्थ्याचा देखील मृत्यू झाला. ज्या ठिकाणी बसचा अपघात झाला, त्याच ठिकाणी शिवमच्या वडिलांची कपड्याचे दुकान होते. अपघात झाल्यानंतर शिवमचे वडील लगेच घटनास्थळी धावले आणि जखमी झालेल्या लोकांना मदत करण्यास सुरुवात केली. मदत करत असताना त्यांचा मुलगा शिवम गंभीर जखमी झाला होता. मुलाला घेऊन वडिलांनी रुग्णालयात धाव घेतली मात्र शिवमचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शिवमच्या कुटुंबियांसह सर्वंच हादरुन गेले.
बेस्ट बस चालकाला 21 दिवसांची पोलीस कोठडी-
कुर्ला अपघात प्रकरणी न्यायालयाने संजय मोरे या बेस्ट बस चालकाला 21 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र हा अपघात बसमध्ये स्पार्क झाल्याने झाला असल्याची खळबळजनक माहिती संजय मोरेने त्याच्या वकिलांना दिली आहे. अचानक गाडी समोर स्पार्क झाला आणि गाडीने स्पीड पकडली आणि गाडीचे नियंत्रण सुटले असल्याचे संजय मोरेने त्याच्या वकिलाला सांगितले आहे. यामुळे याबाबत सखोल चौकशी व्हावी. तसेच या निर्णयाबाबत आपण वरच्या कोर्टात दाद मागणार असल्याचे त्याचे वकील समाधान सुलाने यांनी सांगितले.
बसचालक संजय मोरेची पत्नी काय म्हणाली?
बेस्ट बस अपघातप्रकरणातील आरोपी बसचालक संजय मोरे कोणतीही नशा करत नाहीत असा दावा त्याच्या पत्नीने केला आहे. त्याचे वडील हे गेल्या 35 वर्षांपासून गाडी चालवतात. मात्र कोणताही अपघात झाला नसल्याची माहितीही देण्यात आली. दरम्यान, अपघात झालेल्या इलेक्ट्रिक बसमध्ये कुठलाही बिघाड नसल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी इलेक्ट्रिक बस बनवणारी कंपनी आणि तज्ज्ञांशी साधला संवाद साधला. त्यामध्ये अपघातग्रस्त बसचा ब्रेक फेल झाल्याचा दावा खोटा असल्याचं समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.