एक्स्प्लोर
भेदरलेल्या कुत्र्यांच्या झुंडीसोबत कुरुंदवाडमध्ये अडकलेले पूरग्रस्त, 10 दिवसांचा भीषण थरार
तो दिवस होता तीन ऑगस्टचा... कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाल्यामुळे पाण्याचा मोठा प्रवाह पंचगंगेतून शिरोळ च्या दिशेने पुढे सरकत होता. तर सांगलीहून कृष्णामाई दुथडी भरुन वाहत शिरोळच्या दिशेने पुढे सरकत होती. कुरुंदवाडला पुराचा धोका निर्माण झाला होता.
पंधरा दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं होतं. या पावसामुळे संपूर्ण जिल्ह्याला महापुराने वेढलं होतं. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शहराला रातोरात पाण्याने वेढा दिला आणि आपला जीव वाचवण्यासाठी माणसांनी आपल्यासोबत गाई, म्हशी, बैल यांना घेऊन उंच ठिकाणी म्हणजेच राजवाडा परिसरात आसरा घेतला. हे सगळं होत असताना त्यांच्या मागून या गाव परिसरातील शंभरहून अधिक भटकी कुत्रीही आपला जीव वाचवण्या साठी त्या ठिकाणी पोहचली. त्यानंतर मात्र पुढचे आठ दिवस जीव मुठीत घेऊन काढण्याची वेळ पूरग्रस्तांवर आली.
तो दिवस होता तीन ऑगस्टचा... कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाल्यामुळे पाण्याचा मोठा प्रवाह पंचगंगेतून शिरोळ च्या दिशेने पुढे सरकत होता. तर सांगलीहून कृष्णामाई दुथडी भरुन वाहत शिरोळच्या दिशेने पुढे सरकत होती. गावाला पुराचा धोका आहे, याची कल्पना ग्रामस्थांना होती. मात्र ही स्थिती पुराच्या पलीकडे जाईल याची कल्पना त्यांना आली नव्हती. त्या रात्री पाण्याचा प्रवाह वाढू लागला, घराघरांमध्ये पाणी शिरू लागलं आणि गावात एकच गोंधळ उडाला...
अनेक जण आपला जीव वाचवण्यासाठी आपल्या लेकरा-बाळांना घेऊन उंचवट्याच्या ठिकाणी जाऊ लागले. जाताजाता गायी, म्हशी, बैल घेऊन तर काहींनी आपली वाहने घेऊन उंच ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. कुरुंदवाड शहरात रावसाहेब पाटील यांचा मोठा वाडा आहे. शहराच्या उंच भागात हा वाडा असल्यामुळे या परीसाला राजवाडा असंही म्हटलं जातं. या वाड्याला लागून संजीवनी स्कूल नावाची शाळादेखील आहे. गावात पाणी वाढत असल्यामुळे कुरुंदवाड गाव परिसरात राहणाऱ्या अनेक गावकऱ्यांनी राजवाडा परिसरात येणे पसंत केलं. त्यांना याच परिसरातील नागरिकांनी शाळेत तसेच इतर घरांमध्ये राहण्याची व्यवस्था केली. सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र त्यानंतर हळूहळू गावठी कुत्र्यांची झुंड या परिसरात येऊ लागली. माणसांप्रमाणे तेही आपला जीव वाचविण्यासाठी पाण्यातून वाट काढत सुरक्षित ठिकाणी म्हणजे राजवाडा परिसरात पोहोचले. एक नव्हे दोन नव्हे तर 100 हून अधिक गावठी कुत्री या परिसरात पोहोचली. अगोदरच या परिसरात लावलेल्या चारचाकी वाहनांच्या खाली आणि मिळेल त्या जागी त्यांनी राहणं पसंत केलं . पहिले दोन, तीन दिवस लोकांना त्याचं काहीच वाटलं नाही. मात्र तीन दिवसानंतर या परिसरात पुराच्या भीती बरोबरच या कुत्र्यांची भीती वाटू लागली.
कुरुंदवाड शहराला पाण्यानं घेरलं होतं. शासकीय मदत इथपर्यंत पोहोचत नव्हती. त्यामुळे राजवाडा परिसरात असलेल्या नागरिकांनी तीन ते साडेतीन हजार पूरग्रस्तांना आसरा दिला होता. त्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय केली होती. हळूहळू या परिसरातील अन्नधान्यही संपू लागलं. कशीबशी वैरण जनावरांना घातली जात होती. तर पूरग्रस्त जे खातील त्यांचं राहिलेलं खरकटं आणि राहिलेले अन्न हे या कुत्र्यांना दिलं जात होतं. हळूहळू या परिसरातला शीधा संपू लागला. त्यामुळे इथं अडकलेल्या सर्वांनी केवळ भात खाण्याचा निर्णय घेतला. जेवढं तांदूळ होतं त्यात पुरवून-पुरवून सकाळ-संध्याकाळ भात शिजू लागला आणि तो स्थानिक नागरिक आणि पूरग्रस्त ही खाऊ लागले. अशा परिस्थितीत या टापूवर आलेल्या या कुत्र्यांची अवस्था दयनीय झाली होती. माणसालाच मिळेना मग कुत्र्यांना ते काय देणार? अशी परिस्थिती इथं होऊ लागली. जी कुत्री सुरुवातीचे तीन दिवस शांत होती, जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या कोपऱ्यात बसून होती, तीच कुत्री आता भुकेने व्याकूळ होऊ लागली होती. जितकं हवं तितकं अन्न त्यांच्या पोटात जात नव्हतं. त्यामुळे पोट भरण्यासाठी त्यांची धडपड सुरु होती. दिवस सरेल आणि रात्री येईल तशी कुत्र्यांची हालचाल वाढत होती. रात्री मोठ्याने ओरडणे, एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, एकमेकाकडे पाहून गुरगुरणे या सगळ्यांचा आवाज ऐकून रात्रीच्या नीरव शांततेत अंगावर काटा येत होता. सात दिवसानंतर भुकेने व्याकूळ झालेली ही कुत्री एकमेकांच्या अंगावर धावून जाऊ लागली. एखाद्या बेसावध व्यक्तीच्या अंगावर धावून जाऊन त्याचा लचका केव्हा तोडला जाईल याची शाश्वती कोणालाच नव्हती.
ज्या शाळांमध्ये पूरग्रस्त राहिले होते, त्यामध्ये खूप सारी लहान मुले होती. या लहान मुलांकडे ही कुत्री दिवसभर पाहून गुरगुरत असायची. संध्याकाळ झाली की ही सगळी मुलं आपल्या आई-वडिलांना जवळ मुकाट्याने जाऊन बसायची, रात्रभर कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून सगळ्यांच्या पोटात गोळा येत होता. यापूर्वी गल्लीत यायचं म्हटलं की या कुत्र्यांचा पहारा असायचा, ओळखीचा चेहरा असला की हीच कुत्री शेपूट हलवत पायामध्ये घुटमळायाची. मात्र या कुत्र्यांचं आता रुप पालटलं होतं. पोटात भुकेची आग असल्यामुळे त्यांच्या नजरेसमोर दुसरं काहीही दिसत नव्हतं. पूरग्रस्तांच्या सोबत असणाऱ्या लहान मुलांवर एखादा कुत्रा हल्ला करू नये, त्यांचे लचके तोडू नये यासाठी या परिसरातल्या तरुणांनी लक्ष ठेवलं. कुत्र्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणाऱ्या या तरुण मंडळींमध्येसुद्धा थोडी भीतीही होतीच, कदाचित हा हल्ला आपल्यावरही होऊ शकतो, अशी कुणकुण त्यांच्याही मनात होती. पाऊस पडत होता, नदीचं पाणी वाढत होतं, दिवसामागून दिवस जात होते. भुकेने व्याकूळ झालेली कुत्री आता शरिरानेही थकली होती. एकमेकांच्या अंगावर पाय पसरून भुकेने व्याकूळ होऊन अनेक कुत्री आकाशाकडे बघत जमिनीवर पडलेली असायची. भुकेने व्याकूळ झालेल्या या कुत्र्यांनी गुराढोरांनी टाकलेलं शेणही खाल्लं आणि आपली भूक भागवली. अभिजीत पाटील आणि डॉ. संदीप पाटील यांनी या कुत्र्यांच्या हालचालींसंदर्भात पूरग्रस्तांना पूर्वकल्पना दिल्यामुळे सर्वजण सावध होते. शेवटी तो दिवस जवळ आला आणि हळूहळू पुराचं पाणी ओसरू लागलं.
पाणी उतरत असल्याची पहिली खबर या कुत्र्यांनाच मिळाली. वाट मिळेल त्या दिशेने, जिथे खायला मिळेल त्या दिशेने ही कुत्री हळूहळू हा परिसर सोडून जाऊ लागली. कुत्र्यांनी हा टापू सोडल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सुदैवाने या परिसरात आलेल्या कुत्र्यांनी कोणावरही हल्ला केला नाही. जर एखाद्या कुत्र्यांनं पूरग्रस्त आणि त्यांच्या मुलांवर हल्ला केला असता तर अनर्थ घडला असता. कारण कुरुंदवाडसोडून बाहेर जायला ना वाट, ना बोट , ना हेलिकॅप्टर....
कुत्र्यांनी राजवाडा परिसर सोडल्यानंतर अनेकांनी देवाला हात सोडून आपली सुखरूप सुटका झाल्याबद्दल त्यांचे आभार मानले...
अभिजीत पाटील याबाबत म्हणाले की, त्या दिवशी पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत होतो. पण त्यांच्यासोबत येवढ्या मोठ्या प्रमाणात कुत्रीदेखील येतील अशी कल्पना कधीच केली नव्हती. सुरुवातीला या कुत्रांकडे दुर्लक्ष केलं खरं मात्र भुकेने व्याकूळ झाल्यानंतर कुत्र्यांनी आपलं रूप दाखवलं ते बघून मीही घाबरलो होतो. भुकेने व्याकूळ झालेल्या कुत्र्यांची अवस्था पाहिल्यानंतर मला 'लाईफ ऑफ पाय' या चित्रपटाची आठवण झाली. त्या चित्रपटातही भर समुद्रात सापडून भुकेने व्याकूळ झालेल्या वाघाची अवस्था मी पाहिली होती. तशीच अवस्था इथे सापडलेल्या कुत्र्यांची झालेली होती. हळूहळू त्यांचा धीर सुटत होता. मात्र आम्ही सर्वजण जागरूक होतो, त्यामुळे अनर्थ टळला.
डॉक्टर संदीप पाटील म्हणाले की, माणसांप्रमाणे जनावरांनाही आपला जीव महत्त्वाचा असतो. तेही आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत असतात. या परिसरात मोठ्या प्रमाणात कुत्री आली, मात्र एखाद्या पूरग्रस्तांना एखादं कुत्र चावलं असतं, तर त्याच्यावर उपचार करणेही कठीण होतं. नेमकं कुठलं कुत्रं चावलं, ते पिसाळलेलं होतं की नाही, याची माहिती घेणं त्यावेळी कठीण होतं. त्यावेळी उपचार करायला औषधेही उपलब्ध नव्हती. पूरपरिस्थितीत सापडलेल्या कुत्र्यांवरही औषध उपचार करणं गरजेचं आहे, असं मला वाटतं.
कोल्हापुरातल्या महापुराचं भीषण वास्तव, थेट पंचगंगेच्या घाटावरुन | महापूर परिषद | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement