(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG : गावाकडंही लक्ष द्या उद्धवजी...!
कोरोना आला त्यावेळी सुरुवातीला तर कोरोना बिरोना काय नसतंय असं म्हणत गावखेड्यातल्या लोकांनी अक्षरशा टिंगलच केली. शहरातून गावी गेलेला एखादा माणूस मास्क लावून हिंडत असेल तर त्याच्याकडं पाहून त्याला येड्यात काढून हसण्यापर्यंतचे दिव्य चमत्कार गावातल्या लोकांनी केले. अर्थात यामागे कारणंही तशी होती. कोरोनाचं गांभीर्य त्यांना कळलं नव्हतं आणि कळलं तरी आपल्या रोजच्या कामधंद्याच्या नादात त्याला एवढं महत्व द्यावं असं गावकऱ्यांना वाटलं नाही. मात्र आता या दुसऱ्या लाटेची झळ गावांना बसतेय. त्यामुळं ते बैचेन आहेत, महत्वाचं म्हणजे ते प्रचंड घाबरलेत.
त्यात अपुऱ्या यंत्रणेमुळं त्यांची भीती दूर करुन त्यांना योग्य मार्गदर्शन सल्ले द्यायला यंत्रणा त्यांच्याजवळ आणि ते यंत्रणेजवळ पोहोचू शकत नाहीयेत. गावात लोकं कोरोनानं मरायला लागलीत. घरच्या घरं उद्ध्वस्त झालीत. आधी कोरोनाला फाट्यावर मारणारी लोकं घाबरलीत. मेल्यावर मडंही मिळत नाही या भीतीमुळं ती आधीपेक्षा आता सतर्कही झालीत. मात्र त्यांच्या मनात अजून बरेच सवाल आहेत. त्याची उत्तरं त्यांना मिळत नाहीयेत.
ग्रामीण भागात मन विषण्ण करणारी परिस्थिती आहे. लोकं त्यांच्या सवयीप्रमाणं कोरोनासारखा महाभयानक आजार अंगावर काढताहेत. त्यात पुरेसं टेस्टिंग नाही. अनेक ठिकाणी तर दवाखान्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था नाहीय. घरात मृत्यू होताहेत. आजारी माणसांना शेतात ठेवलं जातंय, ती लोकं तिथंच जीव सोडत आहेत. त्या मरणाची कुठेही नोंद नाही. त्यांच्या अंत्यविधीचा कुठला प्रोटोकॉल नाही.परिणामी गावखेड्यातले मसणवाटे धगधगत आहेत.
खरोखर वाईट परिस्थिती आहे. एखाद्याला लक्षणं दिसली तर तो भीतीनं कुणालाही न सांगता घरात बसतोय. परिणामी संसर्ग वाढतोय. बरं त्यांना दवाखान्यात जायचं असेल तर सुविधा नाही. शहराच्या ठिकाणी कसेबसे पोहोचलेच तर टेस्टिंग कुठे होते याची माहिती नाही. टेस्टिंग झालीच तरी रिपोर्ट यायला बरेच दिवस लागत आहेत. तोवर एक रुग्ण कित्येकांना बाधित करत असेल याची कल्पना करवत नाही. गावातल्या बेड, ऑक्सिजन या गोष्टी तर याबद्दल नॉलेज नाहीय. त्यात अवाढव्य बिलाच्या भीतीनं लोकं दवाखान्याची पायरी चढायला नको म्हणत आहेत. रेमडेसिवीरसारख्या इंजेक्शनसाठी वणवण भटकूनही ते मिळायला तयार नाही. मिळालंच तर अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.
राज्यात काही लोकप्रतिनिधींनी काही आदर्श या कोरोना काळात उभे केलेत. यातलं एक उदाहरण द्यावं वाटतं ते आमदार निलेश लंके यांचं. लंके स्वत: जातीनं त्यांनी उभारलेल्या कोविड सेंटरला उपस्थित असतात. तिथल्या व्यवस्थेबद्दल सांगण्याची वेगळी गरज नाही. तालुक्यातल्या लोकांना यामुळं मोठा आधार मिळालाय. ग्रामीण भागात प्रत्येक आमदार आणि लोकप्रतिनिधीकडून असं काम अपेक्षित आहे. आरोग्य पत्रकार संतोष आंधळे म्हणतात त्याप्रमाणं, नागरिकांची दारी जाऊन तपासणी चेस द व्हायरस, मृत्यू दर कमी करण्यासाठी मिशन झिरो आणि नो मास्क नो एन्ट्री, माझे कुटुंब माझी जबाबदारी हे उपक्रम गावखेड्यात सुरु केले पाहिजेत. जम्बो कोविड केअर सेंटर्स सुरु करून त्या ठिकाणी ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढावी लागणार आहे. अतिदक्षता विभागाच्या खाटा या ग्रामीण भागात कळीचा मुद्दा आहे त्यामुळे या खाटाची संख्या वाढवावी लागणार आहे. मुंबईतील काही विशेष तज्ञांचे मार्गदर्शनाचे नियमित वर्ग डॉक्टरांसाठी माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे आयोजित केले पाहिजे. विशेष करून ज्या काही नवीन उपचार पद्धती जी आहे त्या बद्दल सूचना देत राहणे गरजेचे आहे. औषधांचा आणि ऑक्सिजनचा साठा या भागातील रुग्णलयात वेळेवर पोहोचून रुग्णालयातील व्यवस्थेबाबत प्रशासनाने आरोग्य विभागातील अधिकाऱ्याशी चर्चा करून त्या गोष्टीत त्या ठिकाणी तात्काळ कशा पोहचतील याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सुधारित करण्यासाठी सामाजिक संस्थांची खासगी उद्योगधंद्याची मदत घेतली पाहिजे.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लसीकरणाबाबत अनेक गैरसमज आजही गावात आहेत. याबाबत जनजागृती केली जात नाहीय. म्हणजे माझ्या जवळच्या माणसांना मी लसीबाबत बोललो तर मला मिळालेलं उत्तर भयानक होतं. 'लस देऊन आम्हाला मारायचा विचार आहे का?' असं उत्तर मला एका नातेवाईकाकडून मिळालं. एवढं भीषण अज्ञान आणि भीती आहे. त्यातही ज्यांना लस घ्यायचीय त्यांना लसीकरणासाठी व्यवस्था नाहीय. तुटवडा सगळीकडेच आहे मान्य आहे मात्र गावखेड्यात ऑनलाईन पद्धतीने नोंदणी ही गोष्टच मुळात चुकीची ठरते आहे. अनेकांकडे मोबाईल नाही, असले तरी बेसिक फोन आहेत, स्मार्टफोन नाही, कुठे मोबाईल असला तरी नेटवर्क मिळेल याची खात्री नाही. ऑनलाईन नोंदणी करिता आवश्यक सुविधा सर्व घटकांकडे आहेत का? याचा विचार न करता एकतर्फी निर्णय घेतला गेलाय असं वाटतंय.
राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या महामारीच्या काळात खरोखर कौतुकास्पद काम केलं आहे. राज्यात विरोधक कितीही त्यांच्याविरोधात ओरडत असले तरी खुद्द पंतप्रधानांनी ठाकरे यांचं कौतुक करुन ठाकरे सरकारच्या विरोधकांची तोंडं बंद केलीत. गेल्या दहा दिवसात राज्यातील कोरोनाची आकडेवारी पाहिली तर निर्बंधांचा फायदा होताना दिसतोय. नवीन रुग्णांच्या तुलनेत डिस्चार्ज होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कधीकाळी सर्वात जास्त रुग्णसंख्या असलेल्या शहरांमध्ये आज कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. मुंबई, पुण्यात स्थिती कंट्रोलमध्ये आहे. मुंबई पॅटर्नचं कौतुक देशभरात होतंय. मात्र आता हे पॅटर्न गावखेड्यापर्यंत न्यायची हीच ती योग्य वेळ आहे. राज्यातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण आणि सध्याच्या घडीला लागणाऱ्या आरोग्य सुविधा पोहोचवून त्यांना मदत केली पाहिजे, गावातल्या कष्टकरी, वंचित गावकऱ्यांच्या मनातली भीती दूर केली पाहिजे, त्यांना आधार मिळाला पाहिजे, हीच ती योग्य वेळ आहे उद्धवजी, अन्यथा गावातले मसणवाटे धगधगतील, ज्याची धग आवरणं कठिण होऊन जाईल.