एक्स्प्लोर
Advertisement
स्वतंत्र भारताच्या पहिल्या मतदाराच्या शोधात
श्याम सरण नेगी हे एका अर्थानं भारतीय लोकशाहीची बखर आहेत. त्यांच्या एका एका शब्दांमधून आपल्या लोकशाहीचाच इतिहास ऐकायला मिळतो. श्याम सरण नेगी याही निवडणुकीत मतदान करण्याचा उत्साह बाळगून आहेत.
स्वतंत्र भारताचा पहिला मतदार अजून हयात आहे हे कळल्यानंतरच या माणसाला प्रत्यक्ष भेटण्याची प्रचंड उत्सुकता लागलेली होती. ज्यांच्या मतदानानं देशात लोकशाहीची सुरुवात झाली, ज्यांनी आजवरच्या 16 ही लोकसभांचा प्रवास स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलाय त्या व्यक्तीच्या नजरेतून हा सगळा बदल कसा आहे हे समजून घ्यायचं होतं. श्याम सरण नेगी असं त्यांचं नाव आहे. सध्याचं वय 102 वर्षे. आपण त्यांना भेटायला जातोय खरं, पण ते बोलण्याच्या अवस्थेत असतील का या वयात अशी एक शंका मनात येत होती. पण तसं असलं तरी किमान हा माणूस दाखवणं गरजेचं आहे अशी समजूत काढूनच प्रवासाला निघालो होतो.
दिल्ली ते हिमाचलप्रदेशमधलं कल्पा हे जवळपास 600 किलोमीटरचं अंतर आहे. दिल्लीहून सोनीपत-पानिपत-चंदीगढ-शिमला-रामपूर-किन्नौर असा प्रवास करत इथे पोहचावं लागतं. आमचा प्रवास मार्चच्या महिन्यातला असला तरी हिमाचलप्रदेश-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरु होती. त्यामुळे गाडीचा वेग नेहमीच्या प्रवासापेक्षा आपसूकच मंदावला होता. शिमल्यापासून पुढे गेल्यानंतर रामपूर नावाचं गाव लागतं. शिमला-कुफरी-नारकंडा ही गावं उंचावर आहेत, पण शिमला ते किन्नौर प्रवासात डोंगराच्या पायथ्याला वसलेलं रामपूर हे एकमेव मोठं गाव आहे. त्यामुळे अशा बर्फवृष्टीच्या दिवसांत इथेच थांबणं सोयीस्कर असा सल्ला एका स्थानिकांकडून मिळाला. थंडीही कमी जाणवेल, शिवाय अशा दिवसांत दरडी कोसळण्याचा धोका असल्यानं सर्व प्रवास दिवसाउजेडीच केलेला बरा असा हिशोब त्यापाठीमागे होता. दुस-या दिवशी सकाळी आठ वाजता कल्पाच्या दिशेनं प्रवास सुरु झाला. काही अंतर सोडल्यानंतर किन्नौर.. फलों की घाटी में आपका स्वागत है अशी एक मोठी कमान डोंगरात दिसते. सफरचंद म्हटलं की पटकन काश्मीर आठवत असलं तरी हिमाचलप्रदेशातल्या किन्नौरमधली सफरचंदंही आपली विशिष्ट ओळख आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये बाळगून आहेत. किन्नौर हे जिल्ह्याचं नाव...त्यातल्या रिकांगपियो तालुक्यापासून कल्पाचं अंतर 8 ते 10 किलोमीटर आहे. शिमल्यापासूनच्या संपूर्ण प्रवासात वरती हिमाच्छादित शिखरे आणि खाली सतलज नदीचा शांत प्रवाह तुमची सोबत करत असतो. जलविद्युत हाही सध्या हिमाचलचा प्रमुख उद्योग बनलाय, त्यामुळे अवघ्या 100 किलोमीटरच्या अंतरातच तीन छोटी-मोठी धरणंही दिसतात. रात्रीच जोरदार बर्फवृष्टी झाल्यानं हा प्रवास आमच्यासाठी प्रचंड जिकिरीचा बनला. रस्त्यात दोन ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतूक थांबवली होती. एके ठिकाणी तर आमच्या पुढे अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर प्रचंड आकाराची शिळा डोंगरातून सटकून जीपवर आदळली होती. ड्रायव्हर आणि गाडीतल्या इतर चौघांना हाँस्पिटलमध्ये दाखल करुन सगळे पोलिसांच्या येण्याची वाट पाहत बसले होते. जेसीबी येऊन आजूबाजूची थोडी दरड हटवून गेला, पण दोन तास झाले तरी पोलीस काही यायची लक्षणं दिसेनात. हे आमच्यासाठी नेहमीचंच, 100 नंबरवर फोन केला तरी पोलीस लवकर प्रतिसाद देत नाहीत. तीन चार किलोमीटर अंतरावरच पोलीस स्टेशन आहे, मग तरीही इतका वेळ का लागावा यांना यायला अशा स्थानिकांच्या गप्पा तावातावानं सुरु झाल्या. त्यातच काही युवकांनी या समस्येच्या मुळाकडंच लक्ष वेधलं. ते सांगत होते. इथे धरणांसाठी एवढे मोठमोठे सुरुंग लावलेत डोंगरात...दरडी कोसळणार नाही तर काय होणार... या कंपन्यांच्या कारभाराबद्दल काही बोलायची सोय नाही. मागे एक आंदोलन झालं, तर आंदोलकांवर गोळ्या चालवण्यापर्यंत मजल गेली सरकारची. आम्हीही इतके वर्षे पाहिली, पण इतक्या दरडी कोसळण्याचे प्रकार हल्लीच सुरु झालेत, एका वृद्ध गृहस्थांनी आपल्या चेह-यावरच्या सुरकुत्या हलवत या तरुणांच्या म्हणण्याला अनुमोदन दिलं. या सगळ्या गप्पा चालू असतानाच मग दोन तासानंतर पोलीस अवतरले, त्यांनी त्यांच्या शिस्तीत पंचनामा वगैरे करुन, जेसीबीला जीपवरची मोठी शिळा हटवायला परवानगी दिली..घाटात थांबलेलं ट्रॅफिक पुन्हा सुरु झालं.
रिकांगपियोमध्ये पोहचलो तेव्हा जिथे पाहावं तिथे बर्फच दिसत होता. इथून पुढचा कल्पाचा रस्ता माहिती नव्हता. पण श्याम सरण नेगी यांच्याकडे जायचंय म्हटल्यावर कुणीही लगेच दिशादर्शनाचं काम करत होते. कल्पा हे गाव आता स्वतंत्र भारताच्या पहिल्या मतदाराचं गाव म्हणून ओळखलं जायला लागलंय. मुळात श्याम सरण नेगी हे स्वतंत्र भारताचे पहिले मतदार कसे बनले? स्वातंत्र्यानंतर देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली 1952 झाली. देशात सगळीकडे फेब्रुवारीमध्येच मतदान होणार होतं. पण हिमाचलप्रदेशातल्या दोन जिल्ह्यांमधे त्यावेळी प्रचंड बर्फवृष्टीचा इशारा होता. त्यामुळे निवडणूक आयोगानं इथे चार महिने आधीच मतदान घेतलं. 25 आँक्टोबर 1951 ही इथल्या मतदानाची तारीख होती. या दिवशी सगळ्यात पहिलं मतदान केलं श्याम सरण नेगी यांनी.. आणि अशा पद्धतीनं ते बनले स्वतंत्र भारताचे पहिले मतदार.
रिकांगपियो मध्ये पोहचल्यानंतर वाटेत कल्पाचे उपसरपंच राजकुमारजी भेटले. कल्पाचं आधीचं नाव होतं चिनी, आधी हेच तालुक्याचं ठिकाण होतं, पण नंतर डोंगरावरती सगळ्या गोष्टी वसवणं अवघड होऊ लागलं, त्यामुळे तळाच्या रिकांगपियोमध्येच सगळी शासकीय कार्यालयं आली. इथून कैलाश पर्वतरांगांमधल्या शिवलिंगाचं टोक दिसतं वगैरे रंजक माहिती त्यांच्याकडून ऐकत असतानाच आम्ही पोहचलो श्यामसरण नेगी यांच्या घरी. त्यांचे चार पुत्रांपैकी सर्वात धाकटे, चंद्रप्रकाश नेगी दारात उभे होते. ते हवामान विभागात काम करतात. त्यांनी प्रवासाची ख्यालीखुशाली विचारुन स्वागत केलं. त्यानंतर घरासमोर साचलेल्या बर्फाच्या छोट्या डोंगरातून वाट काढत आम्ही आतमध्ये शिरलो.
102 वर्षांचा माणूस म्हटल्यावर आपल्याला अंथरुणाशेजारी बसूनच बोलावं लागतं की काय हा पहिला समज खोटा ठरला. श्याम सरण नेगी हे कुणाचाही आधार न घेता, स्वत: काठी टेकवत, हळू हळू चालत चालत आमच्याकडे आले. काल बर्फ पडून गेला असला तरी आज सूर्यप्रकाश स्वच्छ होता. त्यामुळे उन्हातच बसून मुलाखत करुयात असं घरच्यांनी सुचवलं होतं. चेह-यावर सगळीकडे दाट सुरकुत्या, डोळे आतमध्ये गेलेले, शरीर सुकलेलं असलं तरी आतला माणूस मात्र अजून टवटवीत होता. पुढच्या अर्धा तासांच्या गप्पांमध्ये ते वारंवार जाणवत होतं. कानाला अजून कुठलंही मशीन लावावं लागलेलं नाही, डोळेही अजून स्वच्छ..अख्खं आयुष्य हिमालयात काढलेलं, भौतिक जगातल्या काही सुखांच्या कल्पना त्यांच्यापर्यंत पोहचल्याही नसतील, पण त्याची कसर हे शारिरीक वैभव उतारवयातही टिकवून हिमालयानंच भरुन काढलेली दिसत होती.
तुम्हाला पहिल्यांदा मतदान केलं तो दिवस आठवतो का, या प्रश्नावर पहिल्यांदा थोडा वेळ पॉझ घेत, सगळं तर नाही आठवत असं म्हणत बोलायला सुरुवात केली. त्यावेळी मी शिक्षक म्हणून नोकरी करत होतो. आमच्या गावात मतदानासाठी दोन शासकीय पथकं तयार झाली होती. माझी डयुटी नदीपल्याड होती. पण माझं मतदान तर या बाजूलाच होतं. डयुटीवर जाण्याआधी मला मतदान करायचं होतं. मी माझी अडचण प्रिसायडिंग आँफिसरला सांगितलं, त्यावेळी त्यानंही जरा खिल्ली उडवत म्हटलं, इथं कुठलं शंभर टक्के मतदान होणार आहे, तीस चाळीस टक्क्यांच्या वरती आकडा जाणार नाही. तुझ्या एका मतानं असा काय फरक पडणार आहे. पण मी म्हटलं मला मतदान द्यायचं आहे. शेकडो वर्षानंतर आपला देश गुलामगिरीतून मु्क्त झाला होता. या नव्या प्रवासात मी माझं कर्तव्य जरुर बजावणार. सहा वाजताच मी मतदान केंद्राच्या बाहेर जाऊन बसलो होते. तोपर्यंत तर शासकीय पथक पण नव्हतं आलं, ते सगळे आले साडेसहा वाजता. नंतर पावणेसात वाजता मी माझी सगळी परिस्थिती, अडचण सांगितल्यावर त्यांनी मला पहिली मतपत्रिका दिली आणि मी माझं मतदान केलं. व्होटिंग के बाद फिर मै छलांगे लगांते हुए अपनी डयुटी के लिए निकला.या शेवटच्या वाक्यातला त्यांचा आनंद इतक्या वर्षानंतरही चेह-यावर जाणवत होता.
श्यामसरण नेगी हे आधी वनरक्षक म्हणून कार्यरत होते. नंतर आझाद हिंद सेनेची काही लोकं सुटून आल्यानंतर त्यांच्यासाठी ही पदं द्यावं लागली, त्यामुळे त्यांची ही नोकरी सुटली. पण नंतर शिक्षकाच्या जागेसाठी त्यांनी अर्ज केला आणि 1975 पर्यंत ते या पेशात रमले. पहिल्या दोन-तीन निवडणुका झाल्या तरी मला मी देशाचा पहिला मतदार आहे हे कळलंच नव्हतं. नंतर कुणीतरी रेकाँर्डमध्ये पाहून ही माहिती माझ्यापर्यंत पोहचवली. आजवरच्या प्रत्येक लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी असं एकूण जवळपास 32 वेळा त्यांनी मतदान केलंय. मतदानावर तुमचा एवढा गाढ विश्वास का आहे, तुम्हाला जो अपेक्षित बदल होता तो तुमच्या गावात, भागात झालाय का..या प्रश्नावर ते सांगतात. पहिल्यांदा मतदान केलं, तेव्हा देश गुलामगिरीतून मुक्त झाल्याचा आनंद होता. देश स्वतंत्र झाला म्हणजे आता आपण प्रगतीच्या मार्गावर जाणार, भूकबळी बंद होणार ही आमची स्वप्नं होती.
कल्पाची लोकसंख्या आधी खूप कमी होती. पण तरीही खूप अडचणी होत्या.रात्री जेवलो तर उद्याची चिंता असायची. आता चित्र बदललंय, पण जितकं चित्र बदलायला पाहिजे होतं तितकं नाही बदललं.
पहले तो हम काँग्रेसपरही विश्वास करते थें, लेकिन फिर बाद में काँग्रेस पार्टी भी लाचार बन गयी, फिर हमनें भी थोडाबहुत अपना विचार बदल दिया. हे मत कुठल्या पक्षाच्या विरोधातलं म्हणून नव्हे, तर एकूण देशाच्या आजवरच्या प्रवासाबद्दल एका सच्चा नागरिकाची खंत म्हणून गांभीर्यानं घ्यायला हवं. एक रुपया सरकारकडून आला तर 19 पैशाचं सुद्धा काम होत नसल्याचं बोललं जाऊ लागलं. सगळा पैसा विकासाच्या कामांमध्ये वापरला जात नसल्याचं लक्षात येऊ लागलं. व्यवस्थेबद्दलची अशी नाराजी असली तरीही त्यांचा मतदानावरचा विश्वास मात्र तसूभरही कमी झालेला नाही. अच्छे नेता चुनना तो हमारा फर्ज हैं, वह तो करनाही चाहिए. असं ते सांगतात.
आजवरचे कुठले पंतप्रधान तुम्हाला आठवतात, असं म्हटल्यावर छोटासा पॉझ घेत नेहरु, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी आणि थेट वाजपेयी ही नावं एकेक करुन बाहेर पडतात. इंदिरा गांधी आणि आपण एकाच वयाचे आहोत, त्यांची आणि माझी जन्मतारीख एकच आहे हे ते उत्साहानं सांगतात. वयोमानानं काहीसं विस्मरण होत ते पहिल्यांदा 1947 म्हणतात पण लगेच स्वत:ला करेक्ट करत नहीं नहीं 1917 असं ठासून सांगतात. कुलू-मनाली असा प्रवास करत इकडे एकदा इंदिरा गांधी आल्या होत्या, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी कसा जलसा लागला होता, आपण कसं त्यांना पाहिलं होतं हे सांगताना त्यांचे डोळे अजूनही लुकलुकतात. पंतप्रधान म्हणून लक्षात असलेल्या या मोजक्या नावांच्या यादीत परमारजी हेही नाव सारखं येत राहतं. नेहरु जैसे वो भी बहुत साल रहें असं ते सांगतात. नंतर ग्रामस्थ सांगतात हे परमारजी म्हणजे यशवंत सिंह परमार..काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे अगदी 1977 पर्यंत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते.
श्याम सरण नेगी यांनी इतक्या वर्षांच्या या आयुष्यात अनेक महत्वाच्या घडामोडी ऐकल्या, पाहिल्या. पण त्यांच्यासाठी सर्वात आघात करणारी घटना म्हणजे गांधीहत्या. गांधी हत्येचा दिवस आठवतो का असं म्हटल्यावर पुढचं सगळं सांगताना त्यांचे डोळे पाणावतात. तारीखवार अगदी ते घटना सांगतात.15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला. त्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मैं उस वक्त कहा था याद नहीं लेकिन यह खबर सुनकर बहुत बुरा लगा. महात्मा गांधी जैसा सच्चा नेता था हमारा. कुछ दुश्मन के हाथों से मरते हैं, सबको मरणा होता ही हैं, लेकिन अपने ही लोगों से मर जाना ये कोई भूलने वाली बात नहीं है. अगर हत्या ना होती बापुजी की..तो देश कितना आगे जाता. भारत तो सोने की चिडिया बनता. असं सांगत त्यांची दृष्टी भूतकाळात हरवून जाते.
श्याम सरण नेगी हे पहिल्या निवडणुकीपासून मतदान करत आलेत. पण लोकशाही व्यवस्थेतला प्रत्येक बदल ते सकारात्मकतेनं पाहतात. आता मतपत्रिका जाऊन इव्हीएम मशीन आल्या, त्याबद्दल काय वाटतं, यावर ते अगदी बारकाईनं सांगतात. आधीच्या मतपत्रिकांमुळे मतमोजणीत कुठल्या गावानं कुठल्या गावात मतदान केलं हे कळायचं, त्यामुळे नाही म्हटलं तरी निकालानंतर त्याचा वाईट परिणाम व्हायचाच थोडा. हे सांगतान त्यांच्या चेह-यावर मिश्किल हसू असतं. पण मशीन आल्यामुळे एकदम आसानी हो गयी, हे त्यांच्या बोलण्याचं सार.
त्यांच्या खोलीत एक जुना रेडिओ, औषधं आणि नामस्मरणाची छोटी वही इतकाच ऐवज दिसत होता.
आता देश कोण चालवते दिल्लीत या प्रश्नावर ते मोठा पॉज घेतात. मग आपलं उत्तर बरोबर आहे का विचारत, अब तो जनता पार्टी का राज आ गया हैं, ना असं म्हणतात. भारतीय जनता पार्टी ना..असं मी म्हटल्यावर हां, हां, भारतीय जनता पार्टी. असं पुन्हा घोळवतात. मोदी- राहुल गांधी ही नावं आपण घेतल्यानंतर त्यांना ही नावं आठवतात. इंदिरा के लडके का लडका ही त्यांच्यासाठी राहुल गांधी यांची ओळख. प्रियंका गांधी हे नाव त्यांना फारसं परिचीत नाही. पण मी त्या आता राजकारणात आल्यात हे सांगितल्यावर ते पुन्हा जवळ घेऊन एक गोष्टी सांगू का अशी सुरुवात करत पुन्हा बोलू लागतात...राजकारणात असं थेट कुणी कुठल्या पदावर नेमलं जाऊ नये, आधी काहीतरी काम करुन दाखवावं आणि नंतर त्यांनी यावं हे ते सांगतात. देशाचा पहिला मतदार याही वयात इतक्या सुजाण पद्धतीनं बोलतोय हे पाहताना खरंच निशब्द व्हायला होतं.
अब तो मै घर परिवार के लोगों के नाम भी भूल रहा हूं, असं ते म्हणतात पण त्यांच्या बोलण्यात गांधी हत्येची तारीख, इंदिराजींच्या जन्माची तारीख, देशातल्या निवडणुकांची तारीख हे सगळं अगदी न विसरता येतं हे विशेष. श्याम सरण नेगी हे एका अर्थानं भारतीय लोकशाहीची बखर आहेत. त्यांच्या एका एका शब्दांमधून आपल्या लोकशाहीचाच इतिहास ऐकायला मिळतो. श्याम सरण नेगी याही निवडणुकीत मतदान करण्याचा उत्साह बाळगून आहेत. 2010 मध्ये तत्कालीन केंद्रीय निवडणूक आयुक्त नवीन चावला हे कल्पा गावात आले होते. त्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले मतदार म्हणून त्यांचा सन्मान केला होता. ज्या डोळ्यांनी भारतीय लोकशाहीचा संपूर्ण प्रवास पाहिलाय ते पुन्हा एकदा कृतज्ञेनं पाहत, ज्या बोटांनी आपल्या लोकशाहीची सुरुवात केली ते प्रेमपूर्वक हातात घेत त्यांचा निरोप घेऊन मी कल्पा गावातून बाहेर पडतो.
- प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली
मेल- pshantkadam@gmail.com
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement