बाह्य सौंदर्याच्या हट्टापायी स्वभावातलं सौदंर्य हरवतयं का? #Racism
वर्णभेद आणि समाज...
आपल्या प्रत्येकाला आजीबाईंचा बटवा माहित आहे. माझ्या आजीकडेही बटवा असतो . त्यात ती ठेवते एक कंगवा, टिकलीचं पाकिट, खाकी पावडर आणि ‘फेअर अँड लव्हली’ची क्रीम. आजीच्या चेहऱ्यावर काळे डाग असल्याने ते लपवण्यासाठी तिच्या मैत्रिणीने हा पर्याय तिला सुचवलेला. वयाच्या सत्तर-पंच्याहत्तरीतदेखील काळ्या डागांचा किंवा काळेपणाचा एवढा न्यूनगंड किंवा भीती असेल तर मग माझ्या वयातल्या तरुण तरुणींमध्ये तो असणं सहाजिकच आहे. पण खरचं रंग आपली सुंदरता ठरवतो का?
आज हिंदुस्थान युनिलिव्हरच्या ‘फेअर अँड लव्हली’ या क्रिमच्या नावातून ‘फेअर’ हा शब्द काढून टाकणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. पण वर्षानुवर्ष अमुक एखादी क्रीम आपल्याला गोरं बनवू शकते, हा विचार अनेकांच्या मनात रुजवला कोणी? मला ‘गोरं म्हणजे सुंदर’ व्हायचंय हा प्रत्येकाच्या मनातला घट्ट रुतलेला विचार काढणार कोण? खरंतर, तुम्ही नाकी, डोळी, गुणांनी किंवा बुद्धीने कसेही असलात तरी तुमच्या सुंदरतेचा मापदंड ठरवणारा असतो तो म्हणजे तुमचा रंग.
'गोरा' या शब्दाचा समानअर्थी शब्द म्हणजे 'सुंदर' हा समज आपल्या समाजात पक्का रुजलेला आहे. मुलगी जन्माला काळी सावळी जरी आली तरी आई-बापाला टेन्शन येतं, की आता हीच कसं होणार? यात चूक आई बापाची नाही. कारण हल्ली प्रत्येक मुलाच्या अपेक्षांच्या यादीत ‘गोरी मुलगी हवी’ हेच ठळकपणे असतंच नंतर तीनं कितीही ‘गुण’ उधळले तरी चालेल. मग काय मुलगी वयात येते तेव्हापासून तिच्या पद्धतीनं हा समाजाने दिलेला काळेपणाचा शिक्का पुसण्याचा आतोनात प्रयत्न करते.
आता एखाद्याचा हा रंग काळा किंवा गोरा कसा होतो?
त्वचेमधील मेलेनॉसाइट ही पेशी मेलनिन अर्थात रंग निर्माण करणारे द्रव्य स्त्रवत असते. काही लोकांमध्ये मेलेनॉसाइट कमी रंग निर्माण करतात आणि म्हणून ते लोक “गोरे” दिसतात. याउलट काही लोकांमध्ये मेलेनॉसाइट अधिक प्रमाणात मेलानिन निर्माण करत असतात त्यामुळे ते लोक “सावळे किंवा काळे” असतात.
स्त्री असो किंवा पुरुष आपल्या सगळ्यांनाच स्वतःच्या दिसण्याबद्दल खूप शंका असतात. माझ्याकडे अमूक नाही म्हणजे मी सुंदर नाही, मी तिच्यासारखी नाही, म्हणजे मी कुठेतरी कमी आहे. मुळात दोषाविना कुणीही नाही, हे आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. गोरा रंग, चेहऱ्यावर डाग नाही, लांबसडक केस, शरीराची योग्य मोजमापं आणि नीटनेटके दात अशा असंख्य गोष्टींनी सौंदर्य ठरवलं जातं. यामधलं थोडं जरी कमी जास्त झालं तर ते ठीक करण्यासाठी विविध घरगुती उपचारांपासून ते अगदी शस्त्रक्रियेपर्यंत सगळे प्रयत्न होतात. प्रेझेंटेबल दिसावं म्हणून काही गोष्टी नक्कीच कराव्यात. पण बाह्य सौंदर्याच्या हट्टापायी स्वभावातलं, कामातलं सौदंर्य हरवत कुठे हरवतयं का? याचा विचार ही व्हायला हवा.
मीडिया, सिनेमा आणि टी.व्ही इंडस्ट्रीने आपल्या डोक्यात हे दिसणं, प्रेझेंटेबल असणे याविषयी भ्रामक कल्पना घालून दिल्या आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर black is beautiful अशा आशयाच्या एका मराठी मालिकेत काळ्या रंगाच्या प्रमुख भूमिकेतली नटी मुळात गोरी आहे. तिला काळा मेकअप लावून इतकं रंगवलं जातं की ही मालिका मुळात समाजाला चांगला संदेश देत आहे की थट्टा करतेय, हेच समजेनासं होतयं.
हे सगळे थुकरट विचार सोडून इथं मुद्दा आहे, स्वतःला आहे तसे स्वीकारून आनंदाने जगण्याचा. कोणतीच बाह्य गोष्ट तुम्हाला सुंदर करू शकत नाही आणि कोणती दुसरी व्यक्ती येऊन तुम्ही सुंदर आहात की नाही, हे ठरवू शकत नाही. खरंतर, गोरेपणातच सौंदर्य आहे या समजाला आधीपासून समाजात बढावा मिळाला आहे. हा गैरसमज बदलणं आवश्यक आहे. त्वचा सावळी असो किंवा गोरी असो शेवटी तुमचं सौंदर्य तुमच्या व्यक्तीमत्वात दडलेलं आहे.
पुढच्या वेळी कोणी विचारलं कशी किंवा कसा आहेस? तर क्षणाचाही विलंब न लावता म्हणा 'मी सुंदर आहे’. मग बघा तुमच्यातल्या सौंदर्याची प्रचिती तुम्हालाच येईल.