Solapur Latest News : महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया असलेल्या सांगोल्यातून डाळिंब हद्दपार होण्याची वेळ
Solapur Latest News : सांगोल्याचे डाळिंबे थेट सातासमुद्रापार असलेल्या युरोपच्या बाजारात भाव खात असते. तालुक्याचे उत्पन्नही कितीतरी पटीत वाढत होते
Solapur Latest News : महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या सांगोला तालुका हा डाळिंबासाठी देशभर प्रसिद्ध होता. सांगोल्याचे डाळिंबे थेट सातासमुद्रापार असलेल्या युरोपच्या बाजारात भाव खात असते. डाळिंबामुळे सांगोल्यातील शेतकऱ्याला समृद्धी तर आलीच शिवाय एकमेकांच्या स्पर्धेमुळे तालुक्याचे उत्पन्नही कितीतरी पटीत वाढत होते. मात्र गेल्या दोन तीन नैसर्गिक बदलामुळे डाळिंब बागा अडचणीत आल्याने निम्म्यापेक्षा जास्त क्षेत्रातील डाळिंब बागा जाळून गेल्या आहेत . नैसर्गिक संकटामुळे कधी तेल्या, कधी मर, कधी कुजवं आणि आता नव्याने आलेला पिन होल बोअर अर्थात खोडकिडीमुळे डाळिंब बागा उध्वस्त होऊ लागल्या आहेत. सातत्याने होत असलेला मोठा आर्थिक तोटा आणि नवनवीन रोगामुळे अडचणीत येऊ लागलेल्या बागा याला वैतागून आता सांगोल्यातील शेतकरी डाळिंबाच्या उभ्या बागात ट्रॅक्टर घालून बागा उखडून टाकू लागला आहे . सांगोल्यातील एकतपूर, सावे, अजनाळे अशा अनेक गावात वर्षानुवर्षे जोपासलेल्या डाळिंब बागा शेतकरी आपल्या हाताने जमीनदोस्त करताना दिसत आहे . साधारण ५० हजार एकर वरील डाळिंब बागा तील निम्म्यापेक्षा जास्त बागा या खोडकिडीमुळे जाळून गेल्याने अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबासारखे नगदी पिकाकडे पाठ फिरवली आहे . सध्या सांगोला तालुक्यातील केवळ २५ टक्के बागा उरल्या असून यावरही तेल्या सारखे रोग आल्याने जवळपास ४ हजार कोटीचे उत्पन्न घेणाऱ्या डाळिंबातून यंदा कसे तरी 500 कोटी रुपयाचे उत्पन्न हाती लागणार आहे. यामुळेच वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आता थेट बागांवर ट्रॅक्टर चालवण्यास सुरुवात केला आहे.
वर्षानुवर्षे डाळिंब पिकवणारे सांगोल्यातील शेतकरी आता आंबा , पेरू, केळी अशा फळबागांकडे वळू लागले आहेत. डाळिंबाला पोषक असणारी मुरमाड जमीन, कोरडे हवामान, कमालीची उष्णता आणि पाण्याची कमतरता यामध्ये डाळिंबातून पूर्वी लाखो रुपये मिळविले आहेत. मात्र अशा हवामानात आणि वातावरणात इतर फळबागांना कितपत यशस्वी होतील हि चिंता देखील या शेतकऱ्यांना सतावत आहे. पेरू आणि आंबा बागांसाठी दुप्पट पाणी लागत असून ज्या ठिकाणी पाणी आहे असे शेतकरी पेरू आणि आंब्याचा प्रयोग करतील . एकतपूर येथील शहाजी बिले यांनी डाळिंबातून सातत्याने होत असलेल्या नुकसानीला कंटाळून आपल्या 3 एकर बागेत ट्रॅक्टर घातला आहे. तर येथील सुनील अवताडे या शेतकऱ्याने देखील आपली दोन एकर बाग उखडून टाकली आहे. डाळिंबावर येत असलेल्या नवनवीन रोगावर प्रभावी कीटकनाशके मिळत नसल्याची या शेतकऱ्यांची नाराजी आहे. तर सावे येथील मेजर चंद्रकांत भोसले यांनी 2015 मध्ये सैन्यातून निवृत्तीनंतर डाळिंब पिकात कष्ट घेऊन इतकी वर्षे चांगले उत्पन्न घेतले होते. मात्र सध्या वाढलेल्या मर रोगामुळे आपली डाळिंब बाग उखडून टाकत साळुंखे यांनी याठिकाणी चक्क सफरचंदाची बाग लावली आहे. हिमाचल प्रदेश येथून आणलेली रोपे आता 14 महिन्याची झाली असून चांगली उगवून आली आहेत. आता या बागेला कळ्या व फळे उगवू लागली असून सांगोला सारख्या उष्ण भागात देखील सफरचंद येऊ शकतात असे मेजर साळुंखे सांगतात. आपल्या बाहेरील सफरचंदे जून जुलै पर्यंत बाजारात येणार असून त्याला रंगही चांगला येईल असे साळुंखे यांचे सांगणे आहे. एकंदर डाळिंबाला नागडी पिकाचे स्थान देणारा सांगोला तालुका आता डाळिंबाकडे पाठ फिरवू लागल्याने डाळिंब संशोधन केंद्रातील संशोधकाना हे नक्की विचार करावे लागणारे आहे . राज्यातील डाळिंबाच्या एकूण उप्तादनापैकी जवळपास 25 टक्के हिस्सा असणाऱ्या सांगोला तालुक्यातून आता या रोगराईमुळे डाळिंब जर हद्दपार होत असेल तर कृषी विभागाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे .