(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivsena Party Crisis : एकनाथ शिंदे शिवसेना हिसकावणार? आम्हीच शिवसेना असल्याचं निवडणूक आयोगाला पत्र
Maharashtra Political Crisis Shivsena : राज्याच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडी सुरूच आहेत. शिवसेनेत भूतपूर्व बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधात आक्रमक चाली रचल्या जात आहेत. लोकसभेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नेमणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांनी निवडणूक आयोगाला (Election Commission) पत्र लिहिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता देण्याची विनंती करण्यात आली आहे.
विधानसभेतील आमदारांमध्ये फूट पाडल्यानंतर आपण शिवसेना सोडली नसून शिवसेनेतच असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत होता. शिंदे गटाने भाजपसोबत जात राज्यात सरकारदेखील स्थापन केले. त्यानंतर शिंदे गटात अनेक पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी सामिल झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोरांवर कारवाई सुरू झाल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे यांच्या नेतृत्वातील कार्यकारणी बरखास्त केल्याची घोषणा करत स्वत: ची नवीन कार्यकारणी घोषित केली. त्यानंतर शिंदे गट आता शिवसेनेवर दावा करणार असल्याची चर्चा होती. आता ही चर्चा खरी असल्याचे स्पष्ट होत आहे.