विनेश फोगाटसाठी हरीश साळवेंचा जोरदार युक्तीवाद; अपात्रतेच्या सुनावणीत काय काय घडलं?, पाहा
Vinesh Phogat Paris Olympics 2024: सुनावणीत विनेश फोगटच्या बाजूने हरीश साळवे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केल्याचे सांगण्यात येत आहे.
Vinesh Phogat Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून (Paris Olympics 2024) अपात्र ठरल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगटने (Vinesh Phogat) तिला रौप्य पदक देण्यासाठी सीएएसकडे आवाहन केले होते. ऑलिम्पिक खेळ संपण्यापूर्वी सीएएस आपला निर्णय देऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. विनेश फोगटच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे हा खटला लढवत आहेत. काल झालेल्या सुनावणीत हरीश साळवे यांनी जवळपास 1 तास 10 मिनिटे आपली बाजू मांडली. या सुनावणीत विनेश फोगाटच्या बाजूने कोणता युक्तिवाद करण्यात आला, याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
Hearing concludes in Vinesh Phogat's appeal against Olympic disqualification at CAS ad-hoc division, IOA hopeful of positive resolution.
— Press Trust of India (@PTI_News) August 9, 2024
विनेशच्या बाजूने हरीश साळवे काय म्हणाले?
या सुनावणीत विनेश फोगटच्या बाजूने हरीश साळवे यांनी 4 महत्वाचे मुद्दे उपस्थित केल्याचे सांगण्यात येत आहे. यामधील पहिला मुद्दा अगदी स्पष्ट आणि सोपा आहे की, विनेशने कोणतीही फसवणूक केलेली नाही, त्यामुळे तिला रौप्य पदक दिले पाहिजे. दुसरी बाजू अशी मांडण्यात आली आहे की विनेश फोगटचे वजन वाढणे ही शरीराची नैसर्गिक पुनर्प्राप्ती प्रक्रिया होती, ज्यामध्ये ती काहीही करू शकत नव्हती. याशिवाय, खेळाडूला त्याच्या शरीराची काळजी घेण्याचा अधिकार असल्याचा दावा करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी विनेशचे वजन निर्धारित मानकांपेक्षा कमी असल्याचा चौथा आणि शेवटचा युक्तिवाद करण्यात आला आहे. दरम्यान, पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे, अशी बाजूही हरीश साळवे यांनी मांडली.
आज किंवा उद्या निकाल-
मिळालेल्या माहितीनूसार, विनेश फोगट आणि युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. या प्रकरणाची सुनावणी कदाचित पुढे चालणार नाही आणि लवकरच निकाल दिला जाऊ शकतो. आज आणि उद्या निकाल जाहीर होण्याचीही शक्यता आहे. विनेशच्या प्रकरणावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितिचे अध्यक्ष थॉमस बाक म्हणाले की, विनेश फोगटच्या भावना मी समजू शकतो. पण, अशा परिस्थितींमध्ये सवलत दिल्यानंतर नेमकी रेषा कुठे काढायची याबद्दलही मला खात्री नाही. तिने क्रीडा लवादाकडे दाद मागितली आहे आणि शेवटी सीएएसचा जो निर्णय येईल तो आम्ही मान्य करू, असं थॉमस बाक यांनी सांगितले.
सीएएसचं काम कसं चालतं?
पहिलं ऑलिम्पिकमध्ये 1896 मध्ये ग्रीसमध्ये खेळवलं गेलं होतं. मात्र, यानंतर काही वर्षांनी वाद निर्माण झाले होते. काही खेळाडूंनी नियमांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. या वादांवर निर्णय घेण्यासाठी 'कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स' ची निर्मिती करण्यात आली होती. सीएएसची स्थापना1984 करण्यात आली होती. याचं मुख्यालय स्वित्झरलँडमध्ये आहे. ही एक स्वायत्त संस्था असून निर्णय स्वतंत्रपण घेत असते.