Russia Ukraine War : तुर्कस्तानमधील कराराच्या 24 तासांनंतरच रशियाचा युक्रेनवर हल्ला; झेलेंस्की म्हणतात, 'रशियावर विश्वास कसा ठेवावा?'
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यात तुर्कस्तानमध्ये झालेल्या कराराच्या एका दिवसानंतरच रशियन सैन्याने युक्रेनच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला.
Russia Ukraine War : युक्रेन (Ukraine) आणि रशियामधील (Russia) युद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये तुर्कस्तानमध्ये नुकताच एका करार झाला. हा करार होऊन अवघे 24 तास उलटले नसताना, तोच रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्र डागली आहेत. युक्रेन आणि रशिया दोन्ही देशांनी तुर्कस्तानमध्ये महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारानुसार यूक्रेनहून (Ukraine) काळा समुद्रमार्गे (Black Sea) अन्नधान्याची निर्यात करण्यात येईल. या महत्त्वपूर्ण करारामुळे जगभरातील अन्नधान्याचं संकट दूर होणार आहे. पण रशियावर विश्वास ठेवणं कठीण असल्याचं युक्रेनने म्हटलं आहे. रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे, ज्या ठिकाणाहून अन्नधान्याची निर्यात करण्यात येणार होती, तिथेच रशियाने हल्ला चढवला आहे. करारानंतरही रशियाने हल्ला केल्यामुळे रशियावर विश्वास नसल्याचं युक्रेनने म्हटलं आहे.
युक्रेनच्या लष्करी तळावर क्षेपणास्त्र हल्ला
रशिया आणि युक्रेन युद्धामुळे अन्नधान्य आयात - निर्यातीवर अनेक निर्बंध लागले आहेत. या करारामुळे आता युक्रेनमधील लाखो टन अन्नधान्याची निर्यात करता येणार आहे. हा करार झाल्यानंतर युक्रेन आणि रशियामधील संघर्षाची परिस्थिती काही अंशी निवळेल अशी शक्यता होती. पण कराराच्या एका दिवसानंतरच रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला आहे. रशियाने युक्रेनच्या लष्करी तळावर क्षेपणास्त्र डागली आहेत.
करारावर दोन्ही देशांची स्वाक्षरी
दोन्ही देशांमधील करारानुसार, रशियाने म्हटले आहे की, ते समुद्रमार्गे धान्य वाहून नेणाऱ्या मालवाहू जहाजांवर हल्ला करणार नाहीत. ज्या बंदरांमधून अन्नधान्य पुरवठा केला जातो, त्या बंदरांवरही रशिया हल्ला करणार नाही. युक्रेननेही काही अटी मान्य केल्या आहेत. या कराराअंतर्गत अन्न पुरवठा करणाऱ्या जहाजांच्या तपासणीला परवानगी द्यावी लागेल. त्यांच्यामार्फत शस्त्रांचा पुरवठा होत आहे का, हे तपासादरम्यान पाहिलं जाणार आहे.
धान्य गोदामावर रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला
युक्रेनने शनिवारी माहिती दिली की, मॉस्कोने चार क्रूझ क्षेपणास्त्र डागत ओडेसा बंदरावर हल्ला केला, त्यापैकी दोन क्षेपणास्त्र युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं पाडलं. प्रवक्त्या नतालिया हुमेन्युक यांनी सांगितले की, धान्य साठवणुकीच्या सुविधांवर कोणताही परिणाम झाला नाही. युक्रेनियन अधिकार्यांकडून बातमी मिळाली आहे की, एक क्षेपणास्त्र धान्य गोदामावर पडलं, तर दुसरे क्षेपणास्त्र त्याच्या जवळील भागात पडलं, परंतु याचा ओडेसा बंदरावरील मालवाहू सुविधांवर परिणाम झाला नाही.
झेलेन्स्की म्हणाले - रशियावर विश्वास ठेवणं कठीण
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की, युक्रेनच्या ओडेसा बंदरावर केलेल्या हवाई हल्ल्यात केवळ लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलं. रशिया आणि युक्रेननं बंदरातून धान्य निर्यात पुन्हा सुरू करण्याच्या करारावर स्वाक्षरी केल्याच्या एक दिवसानंतर क्षेपणास्त्र हल्ला झाला आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी माहिती दिली, या हल्ल्यांमुळे मॉस्कोवर विश्वास ठेवता येत नाही, असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.