Nashik Crime : हॉर्न का वाजवतात? जाब विचारल्यानं गुंडांची सटकली, चौघांकडून ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Nashik Crime : पाथर्डी फाटा परिसरातील आर के लॉन्स समोरुन चारचाकी वाहनातून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकावर चार गुंडांनी जीवघेणा हल्ला केलाय.

Nashik Crime : नाशिकमध्ये (Nashik News) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता गुढी पाडव्याच्या (Gudi Padwa 2025) पूर्वसंध्येला नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाथर्डी फाटा परिसरातील आर के लॉन्स समोरुन चारचाकी वाहनातून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाने विनाकारण हॉर्न का वाजवता? असा जाब विचारल्याचा राग आल्याने चार गुंडांनी त्या ज्येष्ठ नागरिकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला.
यानंतर गुंडांनी त्यांच्या चारचाकी वाहनावर दगडफेक करून वाहनाची तोडफोड करीत परिसरात दहशत माजवल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला हा प्रकार घडल्याने घटनास्थळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान या प्रकरणातील दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हॉर्न का वाजवतात?
याबाबत अधिक माहिती अशी की, गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक मदन डेमसे यांचे वडील पाथर्डी गाव येथील प्रगतशील शेतकरी बाकेराव मामा डेमसे (60 रा. पाथर्डी गाव) हे शनिवारी (दि. 29) त्यांच्या चारचाकीतून पाथर्डी येथील आर के लॉन्सकडून त्यांच्या कार्यालयात जात होते. यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी अचानक जोर जोरात हॉर्न वाजवला. यावेळी डेमसे यांनी विनाकारण हॉर्न का वाजवतात? अशी विचारणा केली.
चौघांकडून ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला
यानंतर चारही गुंडांनी घटनास्थळी जोरजोरात आरडाओरड करून धुमाकूळ घातला. गुंडांनी डेमसे यांना धक्काबुक्की केली. दरम्यान यातील एकाने त्यांच्यावर धारदार शस्त्र काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र एवढ्यावरच न थांबता या गुंडांनी त्यांच्या लाल रंगाच्या चारचाकी वाहनाची दगडाच्या सहाय्याने तोडफोड करीत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.
दोन जण पोलिसांच्या ताब्यात
या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. चौघांपैकी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य दोन जण फरार झाले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पाथर्डी ग्रामस्थांनी तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधींनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात संबंधित गुंडांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी मोठी गर्दी केली होती.
आणखी वाचा























