Dalai Lama: तब्बल 64 वर्षानंतर दलाई लामांनी स्वीकारला रॅमन मॅगसेसे पुरस्कार, तिबेटी बंड अयशस्वी झाल्याने आले होते भारतात
Ramon Magsaysay Award : तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांना 1959 साली मानाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. तो पुरस्कार त्यांनी बुधवारी स्वीकारला.
![Dalai Lama: तब्बल 64 वर्षानंतर दलाई लामांनी स्वीकारला रॅमन मॅगसेसे पुरस्कार, तिबेटी बंड अयशस्वी झाल्याने आले होते भारतात Dalai Lama gets 1959 Ramon Magsaysay Award in person after 64 years know details Dalai Lama: तब्बल 64 वर्षानंतर दलाई लामांनी स्वीकारला रॅमन मॅगसेसे पुरस्कार, तिबेटी बंड अयशस्वी झाल्याने आले होते भारतात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/27/3369641f7a6e8b4354f03e220fe5dbea168261364090393_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ramon Magsaysay Award: तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांनी बुधवारी तब्बल 64 वर्षानंतर रॅमन मॅगसेसे पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार देण्यासाठी रॅमन मॅगसेसे पुरस्काराच्या टीमने हिमाचलमध्ये येऊन दलाई लामा यांना दिला. दलाई लामा यांना 1959 साली हा पुरस्कार देण्यात आल्याची घोषणा केली होती. दलाई लामा यांना देण्यात आलेला हा पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार होता. फिलिपिन्स सरकारच्या वतीनं देण्यात येणारा हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा असून तो आशियातील नोबेल पुरस्कार समजला जातो.
दलाई लामा यांनी तिबेटी समुदायासाठी केलेल्या संघर्षासाठी आणि तिबेटी संस्कृतीला प्रेरणा दिल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला होता. चीनी सरकारच्या वतीनं तिबेटी समूदायाच्या हक्कासाठी दलाई लामा यांनी दीर्घकाळ संघर्ष केला. चीन सरकार दलाई लामांना अटक करण्यापूर्वीच त्यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश केला. दलाई लामा सध्या हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा या ठिकाणी आहेत.
1959 साली दलाई लामा भारताच्या आश्रयाला
1959 मध्ये दलाई लामांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला होता. तेव्हा चीनकडून तिबेटमधील बौद्ध धर्माच्या अनुयायांवर अत्याचार करण्यात येत होता. चिनी हल्ल्यामुळे व्यथित होऊन दलाई लामा 1959 मध्ये तिबेट सोडून भारतात आले होते. यामुळे तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाऊ शकले नाहीत.
कोण आहेत दलाई लामा?
दलाई लामा हे तिबेटी लोकांचे आध्यात्मिक गुरू आहेत आणि तिबेटी बौद्ध धर्मातील सर्वात महत्वाच्या व्यक्तींपैकी एक मानले जातात. 'दलाई लामा' हे शीर्षक मंगोलियन शब्द 'दलाई' म्हणजे महासागर आणि तिबेटी शब्द 'लामा' म्हणजे गुरु, शिक्षक किंवा मार्गदर्शक यांचे संयोजन आहे.
दलाई लामा हे तिबेटचे 14 वे धर्मगुरू असून त्यांचे मूळ नाव हे तेन्झिन ग्यात्सो असं आहे. त्यांचा जन्म 1935 मध्ये तिबेटमध्ये झाला होता. वयाच्या दुसऱ्या वर्षी त्यांना दलाई लामा ही पदवी दिली गेली आणि 1950 मध्ये ते या पदावर विराजमान झाले. 1959 मध्ये, चिनी राजवटीविरुद्ध अयशस्वी बंड केल्यानंतर ते तिबेटमधून बाहेर पडले आणि तेव्हापासून ते भारतात वास्तव्य करत आहेत.
दलाई लामा यांना त्यांच्या कार्याबद्दल या आधी शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी आयुष्यभर अहिंसा, मानवी हक्क आणि धार्मिक सौहार्दाचा पुरस्कार केला.
फिलिपाइन्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो
रॅमन मॅगसेसे पुरस्कार हा फिलीपिन्सचे तिसरे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ दिला जातो. त्याची स्थापना 1957 मध्ये झाली. समाजसुधारणेच्या क्षेत्रात चांगले काम करणाऱ्याला हा पुरस्कार दिला जातो. त्याला आशियाचा नोबेल पुरस्कार देखील म्हणतात. फिलीपिन्स सरकार तसेच रॉकफेलर सोसायटीच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात येतो. ही सोसायटी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)