मुंबई-नाशिक प्रवास की तुरुंगवास? शहापूरजवळ आठ ते दहा किलोमीटरची वाहतूक कोंडी, मोठमोठाले खड्डे आणि रखडलेल्या पुलामुळे प्रवाशांचे हाल
Mumbai- Nashik Highway: रोजच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा सर्वसामान्य नागरिक आणि भिवंडी ठाणे, मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
![मुंबई-नाशिक प्रवास की तुरुंगवास? शहापूरजवळ आठ ते दहा किलोमीटरची वाहतूक कोंडी, मोठमोठाले खड्डे आणि रखडलेल्या पुलामुळे प्रवाशांचे हाल Mumbai Nashik highway Traffic near Shahapur eight to ten kilometers of traffic jams huge potholes Maharashtra News मुंबई-नाशिक प्रवास की तुरुंगवास? शहापूरजवळ आठ ते दहा किलोमीटरची वाहतूक कोंडी, मोठमोठाले खड्डे आणि रखडलेल्या पुलामुळे प्रवाशांचे हाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/14/27fe7db97db5e32d2fb97a0abcb2721c172094497339689_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे: मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai- Nashik Highway) वाहतूक कोंडी ही नित्याची झालीये. आज मात्र या कोंडीनं कहर केला आहे. वासिंद - आसनगाव - शहापूर-आटगाव पट्ट्यात वाहनांच्या आठ ते दहा किमीच्या रांगा लागल्या आहेत. मोठमोठाले खड्डे आणि वाशिंद ते आसनगाव दरम्यान उड्डाणपुलाचं संथ गतीनं सुरू असलेलं काम, यामुळे ही कोंडी होतेय. पुलाचं काम सुरू असल्यामुळे त्याच्या बाजूनं गाड्यांना जावं लागतं. मात्र तिथं एक ते दोन मीटर परिघाचे खड्डे पडलेत. त्यामुळे वाहनांचा वेग अक्षरशः ताशी एक ते दोन किमीवर येतो. यामध्ये भर पडते ती समृद्धी महामार्ग, भंडारदरा आणि नाशिकच्या दिशेनं येणाऱ्या वीकेंड पब्लिकची. त्यामुळे शनिवारी नाशिककडे जाताना, आणि रविवारी मुंबईकडे परतताना इगतपुरे ते ठाणे अंतर पार करण्यासाठी पाच ते सात तास लागत आहेत.
मुंबई-नाशिक प्रवास की तुरुंगवास असे काहीसे चित्र मुंबई-नाशिक महामार्गावर पाहायला मिळत आहे. रोजच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा सर्वसामान्य नागरिक आणि भिवंडी ठाणे, मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक उद्योग व्यावसायिकांना वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. आज तर आसनगाव येथे एमआयडीसी मध्ये कामासाठी जाणाऱ्या कामगार मंडळीला या वाहतूक कोंडीचा मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागलेले आहे. आसनगाव शहापूर हे एक किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी स्थानिक नागरिकांना एक ते दीड दीड तासाचा अवधी लागत आहे.
खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण
पावसामुळे अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे अपघात तसेच वाहतूक कोंडीचा फटका वाहनचालक आणि प्रवाशांना बसत आहे. सध्या रस्त्याची अशी विविध कामे सुरू असल्याने वाहतुकीच्या समस्येत भर पडत आहे. त्यातच आता पावसाळ्यात खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग आणखी मंदावत आहे
जीव धोक्यात घालून नागरिकांचा प्रवास
मुंबई-नाशिक महामार्ग हा राज्यातला महत्वाचा मार्ग आहे. मुंबई, ठाणे आणि नाशिक या शहरांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. रस्त्यांवरील खड्यांमुळे मणक्यांच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. ठाणे शहरातील साकेत ब्रीजच्या रखडलेल्या कामामुळे तर या वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. या महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रदुषणात भर पडत आहे. मुंबई-या रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून या अपघातामध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणारे नागरिक आपला जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत, असं नागरिक म्हणाले.
Video :
हे ही वाचा :
उच्च न्यायालयाने वाहतूक पोलीसांनाच सुनावले खडे बोल, उपायुक्त निष्क्रिय, सुधारणा न केल्यास थेट बदलीचा इशारा!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)