Solapur Crime: आमच्या धर्मातील मुलीला फसवतो का? जाब विचारत तरुणाला टोळक्याची मारहाण, एकाला अटक
Solapur Latest News : एक महाविद्यालयीन तरुण त्याच्या दोन मैत्रिणींसोबत गप्पा मारत असताना 10 ते 15 जणांच्या टोळक्याने त्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
सोलापूर: आमच्या धर्मातील मुलीला फसवतो का असा जाब विचारत सोलापुरात एका तरुणाला 10 ते 15 जणांच्या टोळक्याने जबर मारहाण केली आहे. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक (Solapur Police) केली असून अन्य आरोपींचा शोध घेतला जातोय. या सर्व आरोपी विरोधात भादवि कलम 363, 324, 341, 143, 147, 149, 504, व 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात फिर्यादी असलेला तरुण सोलापूर (Solapur) शहरातील एका महाविद्यालयात एमएसडब्ल्यूचे (MSW) शिक्षण घेत आहे. त्याच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या दोन मुली या अनेक दिवसांनी त्याला भेटल्या. त्यामुळे हे सर्व जण महाविद्यालयाच्या जवळ असलेल्या एका कॉफीशॉपमध्ये गप्पा मारत बसल्या होत्या. काही वेळाने तरुणांची एक टोळी त्यांच्याजवळ आली आणि तू आमच्या धर्मातील मुलींसोबत का बोलतो असा जाब फिर्यादी तरुणाला विचारू लागले.
टोळक्यातील तरुणांनी फिर्यादी तरुणास एमआयडीसी परिसरात नेलं आणि त्या ठिकाणी जबर मारहाण केली. तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी फिर्यादीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. त्यानंतर संबंधित तरुणाच्या फिर्यादीवरून सोलापूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलिसांनी ताबडतोब तपास करत एका आरोपीला अटक केली. इतर आरोपीची देखील ओळख पटली असून कायदेशीर कारवाई सुरु असल्याची माहिती सोलापूर पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली. दरम्यान सोशल मीडियावर सोलापूर सायबर पोलीस नजर ठेवून आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे कोणी षडयंत्र करत असेल तर सोलापूर पोलीस त्यावर कठोर कारवाई करेल अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली.
सांगोला नाक्यावर दारूची जीप पकडली
सांगलीत रिलायन्स ज्वेलर्स शोरुममध्ये रविवारी (4 जून) भरदिवसा सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकत तब्बल 14 कोटींचे दागिने लुटले. दागिने लुटून मंगळवेढ्याच्या दिशेने दरोडेखोरांनी पलायन केल्याने घटनेची माहिती मिळताच सांगलीसह सोलापूरमध्येही नाकाबंदी करण्यात आली. सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांनी ग्रामीण यंत्रणेवरुन नागरिकांना याबाबत कॉल करुन त्या गाडीचे वर्णन सांगत दरोडेखोरांना पकडण्याचे आवाहन केले होते. ते स्वत:ही सांगोला नाक्यावर थांबून वाहनांची तपासणी करीत असताना दरोडेखोरांचे वाहन सापडण्याऐवजी गोव्यावरुन 30 बॉक्स दारु घेऊन जाणारे वाहन पोलिसांना मिळाले.
ही बातमी वाचा: