Lok Sabha Election 2024: 24 तासांतच ममता बॅनर्जींचा यु-टर्न; आधी म्हणाल्या, "I.N.D.I.A आघाडीला बाहेरुन समर्थन", नंतर म्हणतात, "आम्ही आघाडीचाच भाग"
West Bengal CM Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी 24 तासांच्या आत त्यांचं वक्तव्य बदललं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Mamata Banerjee News: नवी दिल्ली : देशभरात लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) धुरळा पाहायला मिळत आहे. अशातच सर्वच नेत्यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. या सभांमधून आरोप-प्रत्यारोप करणारी वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहेत. कधी एकमेकांवर जहरी वार, तर कधी कोपरखळ्या मारल्याचं दिसून येतंय. अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस (TMC) च्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सध्या आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. इंडिया आघाडीचं (India Alliance Government) सरकार स्थापन झालं तर बाहेरुन पाठिंबा देऊन, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. पण त्यांच्या वक्तव्याला 24 तासही होत नाही तोच त्यांनी आपलं वक्तव्य बदलल्याचं पाहायला मिळत आहे. आम्ही (तृणमूल काँग्रेस) इंडिया आघाडीचाच एक भाग असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, ममता बॅनर्जींच्या लागोपाठच्या दोन परस्परविरोधी वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी 24 तासांच्या आत त्यांचं वक्तव्य बदललं आहे. आधी ममता बॅनर्जी म्हणालेल्या की, जर इंडिया आघाडीचं सरकार स्थापन झालं तर ते बाहेरून पाठिंबा देतील. तर 24 तासांच्या आतच ममता यांनी गुरुवारी (16 मे) सांगितलं की, त्या पूर्णपणे इंडिया आघाडीचाच एक भाग आहेत. तृणमूल काँग्रेस प्रमुखांच्या या वक्तव्यानं इंडिया आघाडीचा दरारा दिसू लागल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
तमलूकमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. याच रॅलीत त्या म्हणाल्या की, "ऑल इंडिया लेव्हलवर माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला आहे. मी पूर्णपणे इंडिया आघाडीचाच एक भाग आहे. इंडिया आघाडी ही माझ्या विचारांची उपज होती. आम्ही यापूर्वीही राष्ट्रीय स्तरावर एक होतो आणि यापुढेही एकच राहू." दरम्यान, यावेळी ममता बॅनर्जींनी राज्य पातळीवरील आणि राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आघाडीतील घटक पक्षांमधील फरक सांगितला. काँग्रेस आणि माकप भाजपसोबत असल्याचा आरोपाचा पुनरूच्चाही त्यांनी यावेळी केला.
सीपीआय-एम आणि काँग्रेसवर अजिबात विश्वास ठेवू नका : ममता बॅनर्जी
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, "बंगालमध्ये सीपीआय (एम) आणि काँग्रेसवर विश्वास ठेवूच नका. ते इथे भाजपची साथ देतायत. मी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीबाबत बोलतेय." तसेच, ममता बॅनर्जींनी लोकांना लोकसभा निवडणुकीत केवळ टीएमसीलाच मतदान करण्याचं आवाहनही केलं. विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली असतानाच ममता यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
काँग्रेस-सीपीआय (एम) कडून ममता बॅनर्जींवर टीकेची झोड
कोलकाता येथील पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रमुख अधीर रंजन चौधरी म्हणाले की, "त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. त्यांनी इंडिया आघाडी सोडली आणि पळून गेल्या. त्या भाजपमध्येही जाऊ शकतात. त्या एक संधीसाधू नेत्या आहेत आणि त्यांना आता इंडिया आघाडीला पाठिंबा द्यायचा आहे, कारण त्यांना माहीत आहे, इंडिया आघाडी निवडणुकीत आघाडीवर आहे, असं त्यांना वाटतं की, युतीचा पाठिंबा त्यांना मदत करेल."