विधानसभेसाठी शरद पवार गटाचे 'मिशन मुंबई'! 7 जागा लढवण्याची तयारी; भाजपा, शिंदेंना आव्हान देणार
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेस,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे सात जागांसाठी प्रस्ताव दिल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे.
मुंबई : राज्यात मिशन विधानसभा (Vidhansabha) सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपात झालेला उशीर महायुतीसाठी डोकेदुखी ठरल्याने आता विधानसभेसाठी लवकरच जागावाटप करण्याची योजना महायुतीच्या सर्वच पक्षांकडून आखली जात आहे. लोकसभेत यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबईत विधानसभेला 7 जागा लढवण्याच्या तयारीत असून उमेदवार देखील जवळपास निश्चित झाले आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत सात जागा हव्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेस,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे सात जागांसाठी प्रस्ताव दिल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे मुंबईतील घाटकोपर पूर्व, कुर्ला, वर्सोवा, जोगेश्वरी, दहिसर, अणुशक्ती नगर, मलबार हिल या जागांवर राष्ट्रवादी लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील विधानसभेच्या जागांचा प्रस्ताव सादर केला आहे.
कोणत्या जागेवर कोण लढण्यास इच्छुक?
घाटकोपर पूर्वमधून राखी जाधव, कुर्ल्यातून माजी आमदार मिलिंद कांबळे, वर्सोव्यातून नरेंद्र वर्मा, जोगेश्वरीमधून अजितराव रावराणे, दहिसरमधून मनीष दुबे, अनुशक्ती नगरमधून सुहेल सुभेदार, मलबार हिल येथू क्लाईड क्रास्टो लढण्यास इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीनेही राज्यात 100 जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे, त्यात मुंबईतील 7 जागा लढवण्याचा निर्धार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे.
कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात एकूण विधानसभेच्या 36 जागा आहेत. त्यापैकी, 7 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने मागणी केली आहे. त्यामुळे, उर्वरीत जागा ठाकरेंच्या शिवसेना आणि काँग्रेसला सोडल्या जातील. त्यामुळे, नेमकं किती व कोणत्या जागा कोणत्या पक्षाला मिळतील, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.
लोकसभेत घवघवीत यश
शरद पवार विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखतील. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला नेत्रदीपक यश मिळाले होते. मविआने राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 30 जागांवर विजय मिळवला होता. शरद पवार यांच्या पक्षाने एकूण 10 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 8 जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले तर सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांचा निसटता पराभव झाला होता. शरद पवार गटाचा 80 टक्क्यांचा स्ट्राईक रेट ही पक्षासाठी जमेची बाजू मानली जात आहे.
हे ही वाचा :
Maharashtra Vidhan Sabha Election : मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणाला...