Suresh Jain Hospitalized : सुरेश जैन यांना न्युमोनियाची लागण, एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात हलवलं
Suresh Jain Hospitalized : माजी मंत्री सुरेश जैन यांना न्युमोनियाची लागण झाली असून त्यांना उपचारांसाठी मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
Suresh Jain Hospitalised : माजी मंत्री सुरेश जैन (Suresh Jain) यांना न्युमोनियाची (Pneumonia) लागण झाली असून त्यांना उपचारांसाठी मुंबई (Mumbai) येथील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) हलवण्यात आलं आहे. सुरेश जैन यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.
एअर अॅम्ब्युलन्समधून जैन मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात
सुरेश जैन यांना काल (23 डिसेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यानंतर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी त्यांना न्युमोनियाची लागण झाल्याचं निदान डॉक्टरांनी केले होतं. यानंतर जैन यांना पुढील उपचारांसाठी तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात नियमित उपचार सुरु असल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सच्या मदतीने मुंबईत हलवण्यात आलं. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे
नियमित जामीन मंजूर झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच सुरेश जैन जळगावात
दरम्यान काही दिवसांपूर्वीच घरकुल घोटाळा प्रकरणात सुरेश जैन यांना उच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला होता. त्यानंतर ते प्रथमच जळगावमध्ये दाखल झाले होते. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व असं स्वागत केलं होतं. वाढतं वय लक्षात घेता आपण यापुढे राजकीय जीवनातून संन्यास घेत असल्याचं सुरेश जैन यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं होतं.
सुरेश जैन पाच वर्षे तुरुंगात
जळगावमधील गाजलेल्या घरकुल प्रकरणी सुरेश जैन यांच्यासह इतरांना धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा आणि दंड ठोठावला होता. सुरेश जैन यांना सात वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सुरेश जैन हे पाच वर्ष कारागृहात होते. याच दरम्यान प्रकृती अस्वस्थ्यामुळे जैन यांना यापूर्वी साल 2019 मध्ये वैद्यकीय जामीन मंजूर झाला होता. मात्र जळगाव जिल्ह्यात येण्यास त्यांना बंदी घालण्यात आली होती. परंतु हाच जामीन नियमित झाल्यामुळे देशभरात सुरेश जैन यांना कुठेही फिरता येणार आहे. त्यानंतर ते जळगावात दाखल झाले होते.
काय आहे घरकुल घोटाळा?
या घरकुल योजनेत सुमारे 5000 घरांची बांधणी होणार होती. मात्र अवघ्या 1500 घरांचीच उभारणी करण्यात आली. बांधकाम व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करुन आरोपींनी संगनमताने यामध्ये गैरप्रकार केला असा आरोप करण्यात आला होता. साल 2006 मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांनी याबाबत रितसर तक्रार केली होती. त्यानंतर जैन यांना याप्रकरणी मार्च 2012 मध्ये अटक करण्यात आली होती. सुमारे 29 कोटी रुपयांचा गैरव्यवहार या 'घरकुल' योजनेत झाल्याच्या आरोपात धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने 31 ऑगस्ट 2019 रोजी सुरेश जैन यांच्यासह अन्य 47 जणांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. तसंच शिक्षा सुनावल्याच्या दिवशीच सर्व आरोपींना अटक करण्याचे आदेशही दिले होते. त्याचबरोबर तब्बल 100 कोटी रुपयांचा दंडही न्यायालयाने याप्रकरणी सुनावला होता.