जिल्हा परिषद सदस्य ते प्रदेशाध्यक्ष, तळागाळातून आलेल्या नेत्याकडे महाराष्ट्र काँग्रेसची धुरा, हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत?
Harshwardhan Vasantrao Sapkal, Mumbai : राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी पेलली, मानवतावादी विचारांचा प्रभाव असलेले हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत?

Harshwardhan Vasantrao Sapkal, Mumbai : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्यात आलं आहे. आता महाराष्ट्र काँग्रेसची धुरा तळागाळातून आलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर असणार आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हा परिषद सदस्यपदापासून आपला प्रवास सुरु केलाय. आज त्यांच्यावर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी राष्ट्रीय राजकारणात देखील मोठी जबाबदारी सांभाळलेली आहे. हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत? जाणून घेऊयात..
हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. 2014 ते 2019 ते बुलढाण्याचे आमदार होते. 2019 मध्ये त्यांना पुन्हा तिकीट मिळालं होतं, पण त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. सपकाळ यांनी आमदारकीच्या काळात जलसंधारण व्यवस्थापनाचा प्रकल्प मतदारसंघात राबवला होता. हर्षवर्धन सपकाळ सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारधारेवर आधारित ग्रामस्वराज्य निर्मितीत सपकाळ यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यांना ग्राम स्वच्छता अभियान आणि आदर्श ग्राम चळवळीत सक्रिय सहभागाचा अनुभव आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषद सदस्य ते आमदार अशी तळागाळातून पुढे आली आहे.
1999 ते 2002 या काळात ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते
14-15 वर्षे राहुल गांधी यांच्या कोअर टीममध्ये काम केले
राज्यातलं काम पाहून राहुल गांधींनी त्यांना दिल्लीला बोलावून घेतलं.
भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या संदर्भात अनेकदा त्यांना विचारणा झाली मात्र त्यांनी काँग्रेस विचाराच्या सोबत राहण्याचा विचार ठेवला
हर्षवर्धन वसंतराव सपकाळ यांचा संक्षिप्त परिचय
युवावस्थेपासूनच गाडगे महाराज,तुकडोजी महाराज व गांधीवादी - सर्वोदयी कार्यकर्ता म्हणून परिचित आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संलग्नित राजीव गांधी पंचायत राज संघटनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (nsui) च्या माध्यमातून राजकीय जीवनात सक्रीय झाले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी.कॉम व बी. पी.एड पदवी धारण केलेली आहे. शेतकरी कुटूंबातून आलेले असून सामाजिक कार्य व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. ग्राम स्वराज्याच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्रात सुरू केलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत त्यांनी विशेष योगदान दिले आहे. ग्रामस्वच्छता तथा आदर्श ग्राम निर्माण या क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. युवकांसाठी युवक शिबिराच्या नियमित सातत्याने आयोजन, ही त्यांची वैचारिक प्रतिबध्दता दर्शविते. तसेच ही एक फार मोठी उपलब्धी समजली जाते. शेतीस्वावलंबनासाठी तसेच टंचाईमुक्तीसाठी त्यांनी आपल्या विधानसभा मतदार संघात केलेला जलवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून जलव्यवस्थापन तथा जलसंधारण क्षेत्रात त्यांनी विशेष उल्लेखनीय कार्य केले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी तथा आदिवासी गावांचे सक्षमीकरण करण्यासाठी गेल्या 25 वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील तथा कटीबध्द आहेत. 1999 से 2002 या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वात तरूण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यकाळात बुलढाणा जिल्हा परिषद ही महाराष्ट्रात अव्वल होती, हे येथे विशेष उल्लेखनीय. तसेच 2014 ते 2019 या कालावधीत ते बुलढाणा विधान सभा मतदार संघात विधान सभा सदस्य म्हणून राहिले आहेत. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात सद्यस्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष, राजीव गांधी पंचायत राज संगठन म्हणून कार्यरत आहेत. तसेच यापूर्वी राष्ट्रीय सचिव, अ.भा.काँ.कमेटी नवी दिल्ली व राष्ट्रीय उपाध्यक्ष, राजीव गांधी पंचायत राज संगठन ही जबाबदारी सुध्दा पार पाडलेली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदार संघात संविधान चेतना यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गाव-वस्ती-वाडीपर्यंत संविधान जागृतीसाठी कार्य केले आहे.
काँग्रेसचे सचिव म्हणून पंजाब चे सहप्रभारी म्हणून सुध्दा काम केले आहे. तसेच तत्पूर्वी गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांचे सुध्दा सहप्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. अ.भा.काँ.कमिटी द्वारा सेवाग्राम-वर्धा येथील गांधी आश्रमात आयोजित देशव्यापी गांधी विचार दर्शन शिबिराचे राष्ट्रीय शिबिर समन्वयक म्हणून पक्षाने सोपविलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीतारित्या पार पाडलेली आहे. यासोबतच विविध राज्यातील विधान सभा निवडणूकीत उमेदवार निवडीसाठी पक्षाने स्थापित केलेल्या स्क्रिनिंग कमिटीचे सुध्दा ते सदस्य राहिलेले आहेत. एकविसाव्या शतकातील वैश्विक मित्रता अभियान अंतर्गत जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशनच्यावतीने 1996 मध्ये जपान या देशांमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय युवा परिषदेसाठी त्यांनी 20 भारतीय युवक प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केलेले आहे.
सामाजिक क्षेत्रातील योगदान :
1) गांधी तथा विनोबा यांच्या विचारधारेवर आधारीत ग्राम-स्वराज निर्माण
2) सर्वोदय विचारांवर आधारीत राष्ट्रनिर्माण युवक शिबिरे
3) ग्रामस्वच्छता अभियान तथा आदर्श ग्राम चळवळीत सक्रिय योगदान
4)जलसंधारण व जलव्यवस्थापन प्रकल्पांची अंमलबजावणी.
5)आदिवासी समुदायाचे तथा गावांचे सक्षमीकरण.
राजकीय क्षेत्रातील योगदान :
1) विद्यामान राष्ट्रीय अध्यक्ष- राजीव गांधी पंचायत राज संगठन
2) जेष्ठ पक्ष निरिक्षक - ओडिसा लोकसभा/विधानसभा 2024
3) राष्ट्रीय सचिव- अ.भा.काँ.कमेटी नवी दिल्ली- सह प्रभारी गुजरात- मध्यप्रदेश -पंजाब (दहा वर्ष)
4) राष्ट्रीय उपाध्यक्ष- राजीव गांधी पंचायत राज संगठन
5) माजी अध्यक्ष- जिल्हा परिषद बुलढाणा (1999 ते 2002)
6) माजी विधान सभा सदस्य- 22 बुलडाणा विधानसभा (2014 ते 2019)
7) माजी सदस्य- जिल्हा परिषद बुलढाणा (1997 से 2006)
8) शिबिर समन्वयक- गांधी विचार दर्शन सेवाग्राम (अ.भा.काँ.कमिटी द्वारा आयोजन)
9) पक्ष निरिक्षक- अनेक राज्यांमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने.
10)माजी उपाध्यक्ष- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
