Harshvardhan Patil: शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांची भेट झाली अन् चंद्रशेखर बावकुळेंच्या त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
Maharashtra Politics: हर्षवर्धन पाटील हे विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटात प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. ते इंदापूर मतदारसंघातून अजितदादा गटाच्या दत्तात्रेय भरणे यांच्याविरोधात रिंगणात उतरण्याची दाट शक्यता.
पुणे: गेल्या काही दिवसांपासून भाजपचे इंदापूरमधील नेते हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच मंगळवारी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये हे दोन्ही नेते संस्थेच्या बैठकीच्यानिमित्ताने आमनेसामने आले. या बैठकीनंतर शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात चर्चाही झाली. त्यामुळे हर्षवर्धन पाटील लवकरच तुतारी हाती धरणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे एक वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमधील अनेक नेते महाविकास आघाडी आणि शरद पवार गटात सामील होणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते की, ज्यांना पक्ष सोडून जायचे आहे, त्यांनी खुशाल जावे. पक्ष कोणाला अडवणार नाही. त्यांनी जर विचार केला असेल तर आम्ही त्यांना थांबवू शकत नाही. मात्र, थोडा संयम ठेवला तर पक्ष काहीतरी निर्णय घेईल, महायुतीमध्ये ज्या विधानसभेच्या जागा राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे जातील, त्या ठिकाणी मागच्या निवडणुकीत लढलेले आमचे नेते आहेत. मात्र, त्यांना थांबायचं नाही. शेवटी त्यांनी थांबावं, अशी आमची इच्छा आहे, आमची त्यांना विनंती आहे. मात्र, शेवटी त्यांनी जर विचार केला असेल तर आम्ही त्यांना थांबवू शकत नाहीत.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्याचा रोख हर्षवर्धन पाटील यांच्या दिशेने असल्याची चर्चा रंगली होती. काल शरद पवारांशी चर्चा केल्यामुळे हे वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांच्यासाठीच असल्याच्या चर्चेने आणखी जोर धरला. मात्र, हर्षवर्धन पाटील यांनी यावर तात्काळ स्पष्टीकरण दिले. मी कोणाच्या, कोणी माझ्या संपर्कात नाही. महायुतीचे जागावाटपही झालेले नसल्याने इशारा देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य माझ्यासाठी नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले.
शरद पवारांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील नेमकं काय म्हणाले?
इंदापूरमधून निवडणूक लढविण्यावर मी ठाम आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याबाबतचा निर्णय घेतील. अन्य कोणत्याही पक्षाच्या नेत्याशी माझा संपर्क झालेला नाही. मीदेखील कोणाच्या संपर्कात नाही. मात्र, मी निवडणूक लढवावी, यावर कार्यकर्ते ठाम आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात एक बैठक झाली होती. त्यावेळी इंदापूरबाबतचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले होते. अजित पवार यांनीही त्याला मान्यता दिली होती. मी निवडणूक लढवावी, ही कार्यकर्त्यांची भावना आहे. ती त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. त्यामुळे योग्य निर्णय घेण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले.
तीन आठवड्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती. ते काय निर्णय घेतील ते पाहावं लागेल. आम्ही लोकांच्यात असतो. कार्यकर्त्यांची इच्छा आहे. महायुतीच्या जागावाटपात अंतिम निर्णय झाला नाही. त्या कमिटीत मी नाही. मी कोअर कमिटीत आहे. त्यात तरी जागावाटपाबाबत चर्चा झाली नाही. राहिला प्रश्न इंदापूरचा तर कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. हे पाहून वरिष्ठ निर्णय घेतील.महायुतीत जागावाटपाचा निर्णय झालेला नाही कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. कार्यकर्ते म्हणत आहेत की आपल्याला महायुतीच तिकीटच मिळालं पाहिजे. काही म्हणतात अपक्ष उभे राहा. मात्र ही कार्यकर्त्यांची चर्चा आहे याबाबत कोणीही माझ्याशी संपर्क साधलेला नाही, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत.
आणखी वाचा