Ashok Chavan : शक्तीपीठ महामार्गाला माझाही विरोध, मात्र मुख्यमंत्र्यांना भेटून पर्याय काढता आला तर...; अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण
शक्तिपीठ महामार्गाला जमिनी देण्यास नांदेड मधील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे माझाही त्याला विरोध असून जे शेतकर्यांचे मत आहे, तेच माझं मत असल्याची प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
Ashok Chavan, Nanded : शक्तिपीठ महामार्गाला जमिनी देण्यास नांदेड मधील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. दरम्यान शक्तिपीठ महामार्गाला माझाही विरोध आहे. जे शेतकर्यांचे मत आहे, तेच माझं मत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिली आहे. दरम्यान यात काही पर्याय उपलब्ध आहेत का, हे पहावं लागेल असं ही खासदार अशोक चव्हाण म्हणाले. यातून काही मार्ग काढता येईल का हे बघू. याबाबत मी शेतकऱ्यांना भेटणार आहे, त्यानंतर मी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे ही अशोक चव्हाण म्हणाले.
महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्टला अनेक जिल्ह्यातून विरोध
राज्यातील दळणवळण सुविधा, व्यावसायिक संधी त्या सोबतच पर्यटनाला व्यापक प्रमाणात गती देणाऱ्या शासनाच्या महत्वकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथिगृह येथे नुकत्याच पार पडलेल्या आगामी 100 दिवसातील सार्वजनिक बांधकाम विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्दैशित केले. तर दुसरीकडे शक्तिपीठ महामार्गाला राज्यातील अनेक भागातून विरोध होत आहे. शक्तीपीठ महामार्गातून (Shaktipeeth Expressway) ज्या पद्धतीने कोल्हापूर वगळलं, त्याच पद्धतीने सांगली जिल्ह्यालाही वगळावं. सरकारला ही शेवटची विनंती, अन्यथा आंदोलन करावं लागेल, असा खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी सरकारला इशारा दिला आहे.
आम्ही शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत नाही. शक्तीपिठाला रत्नागिरी-नागपूर हा पर्यायी रस्ता आहे. याच रस्त्याला शक्तीपीठ जोडावेत. ज्या भागात शेतकरी जमिनी द्यायला तयार आहेत, त्या ठिकाणच्या जमिनी घ्याव्यात. तासगाव , मिरज या तालुक्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गास विरोध आहे. नियोजित शक्तीपीठ हा खरोखरच शक्तीपीठाला जोडणारा रस्ता आहे की दुसऱ्या हेतून निर्माण केलेला रस्ता आहे. कमी खर्चात जमीन अधिग्रहण करून त्यासाठी जास्त खर्च करण्यासाठी हा प्रकल्प आहे अशी शंका येते, असंही विशाल पाटील म्हणाले.
जे शेतकर्यांचे मत, तेच माझं मत- अशोक चव्हाण
तर दुसरीकडे शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर, सांगली पाठोपाठ आता हिंगोली जिल्ह्यातून सुद्धा विरोध होतोय. या महामार्गासाठी महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातून 27 हजार हेक्टर शेत जमिनीचा अधिग्रहण केला जाणार आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सुद्धा शेत जमिनीचा समावेश असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला आहे. त्यातच आता खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेड संदर्भात बोलताना शेतकर्यांचे जे मत आहे, तेच माझं मत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
कोणत्या देवस्थानांना हा शक्तीपीठ महामार्ग जोडणार?
कोल्हापूर - अंबाबाई, तुळजापूर - तुळजाभवानी. नांदेड - माहूरची रेणुका देवी या तीन शक्ती पीठांना जोडणारा हा महामार्ग असणार आहे. परळी वैजनाथ, हिंगोली जिल्ह्यातील औंधा नागनाथ (नागेश्वर), माहूरची रेणुकादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपुरचे विठ्ठल रखुमाई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, सोलापुरातील सिद्धरामेश्वर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा (लाड), नृसिंहवाडी, औदुंबर या बारा देवस्थानांना हा महामार्ग जोडणार आहे.
संबंधित बातमी: