Amol Mitkari: महायुतीत मंत्रिपदावरून तिढा असतानाच अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'अजितदादांशिवाय अर्थमंत्रिपदासाठी दुसरा कुणी...'
Amol Mitkari on Ajit Pawar: अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळणार नाही, या बातम्यांत तथ्य असेल तर मग या सरकारही 'अर्थ' नसल्याचं मोठं वक्तव्य मिटकरींनी केलं आहे.
मुंबई: राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी अजित पवारांच्या अर्थमंत्रीपदावरून मोठं वक्तव्य केलं आहे. जर अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळणार नाही, या बातम्यांत तथ्य असेल तर मग या सरकारही 'अर्थ' नसल्याचं मोठं वक्तव्य मिटकरींनी केलं आहे. या सरकारमध्ये अजितदादांशिवाय अर्थमंत्री पदासाठी दुसरा कुणीच योग्य व्यक्ती नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते अकोला येथे 'एबीपी माझा'शी बोलत होते.
बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, आमच्या माहितीप्रमाणे 14 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. दहा कॅबिनेट पद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहेत. जर तुमची माहिती खरी असेल, अर्थात अजित पवारांना मिळणार नाही तर मी तुम्हाला सांगतो, अर्थ खातं अजित पवारांकडे असल्याशिवाय राज्याला आर्थिक शिस्त लागू शकत नाही आणि जर अर्थ खातं अजित पवारांकडे नसेल तर मग या सरकारला सुद्धा काही अर्थ आहे की नाही असा माझ्यासारख्यांना प्रश्न पडतो. अर्थ खात्यासाठी निश्चित आम्ही आग्रही आहोत. निवडणुकीपूर्वी ज्या काही योजना राबवल्या गेल्या त्या लाडकी बहिणी योजनेपासून शेतकऱ्यांच्या वीज बिल माफी पर्यंत त्यामध्ये सर्वात मोठा सहभाग हा अजित पवारांचा होता. त्यांनी आतापर्यंत दहा वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. म्हणून मी म्हटलं की, महाराष्ट्र राज्याला आर्थिक शिस्त लावायचे असेल तर अजित पवार हेच त्या महायुतीच्या सरकारमध्ये अर्थ मंत्री म्हणून शोभतात दुसरा कोणता नेता तिथं असेल असं मला वाटत नाही असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
शरद पवार आणि अजित पवारांची भेट ही पुर्णत: कौटुंबिक
आज दिल्लीत अजित पवारांनी सपत्नीक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांसह शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली, यावेळी शरद पवारांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, आज झालेली शरद पवार आणि अजित पवारांची भेट ही पुर्णत:कौटुंबिक होती. त्याचे कोणतेही राजकीय अन्ववयार्थ काढू नये, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे.
दरम्यान, परभणीतील हिंसाचारप्रकरणी कोंबींग ऑपरेशन राबवितांना निर्दोष लोकांना त्रास होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी असं ते म्हणाले आहेत. तर या प्रकरणानंतर फक्त दलित समाज रस्त्यावर आला आहे. इतर समाजालाही हक्क बाबासाहेबांच्या घटनेने दिले आहेत. मग इतर समाज शांत का?, त्यांनी लोकशाही मार्गाने निषेध का नोंदवला नाही, असा सवाल मिटकरींनी केला आहे.