Nashik News : सीएसआर निधी हवाय? नाशिक जिल्हा परिषद देणार मदतीचा हात, अशी करा नोंदणी
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्हा परिषदेच्या पुढाकारामुळे जिल्ह्यातील हव्या त्या ठिकाणी काम करणे आता शक्य होणार आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक सामाजिक संस्था या ग्रामीण भागात कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेतील (Nashik ZP) अनेक विभागांसोबत सामाजिक कृतज्ञता निधीच्या (CSR) माध्यमातून सामाजिक संस्थांना काम करण्याची इच्छा असते. या संस्थांना आता हव्या त्या विभागात काम करता येणार आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी यासंदर्भात आवाहन केले आहे.
नाशिक जिल्ह्याचा आवाका बघता अनेक सामाजिक संस्था (Social Organization) ह्या शासकीय यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून जिल्ह्यातील विविध ठिकाणी काम करताना दिसतात. शालेय शिक्षण, आरोग्य, कुपोषण निर्मूलन अशा विविध प्रश्नांवर शासकीय यंत्रणेसोबत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थांना काम करण्याची इच्छा असते. अशा सर्व संस्थांना जिल्हा परिषदेच्या या पुढाकारामुळे जिल्ह्यातील हव्या त्या ठिकाणी काम करणे आता शक्य होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील दुर्गम भागात काम करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था या इच्छुक असतात. या निर्णयामुळे सामाजिक संस्थांना शासकीय यंत्रणेशी समन्वय साधणे सोपे होणार आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर विशेष टॅब देण्यात आला असून यामध्ये सामाजिक संस्थेचे नाव, त्यांना कोणत्या विभागात काम करावयाचे आहे, विशिष्ठ तालुका, गाव याबतचा तपशील भरल्यानंतर जिल्हा परिषदेतर्फे या सामाजिक संस्थांना बोलावण्यात येवून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येणार आहे.
ज्या सामाजिक संस्था व खाजगी कंपन्यांना सामाजिक कृतज्ञता निधी अथवा स्वयंस्फूर्तीने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काम करायचे आहे त्या संस्थांनी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर भेट देत ज्या विभागात काम करायचे आहे तो विभाग, तालुका आणि गाव यांबद्दल माहिती भरल्यास ग्रामीण भागात काम करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत ही जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात येईल, अशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे.
सीएसआर निधी म्हणजे काय?
सीएसआर म्हणजे सामाजिक कृतज्ञता निधी होय. राज्यातील अथवा देशभरात तसेच जगभरात असलेल्या खाजगी कंपन्या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून कंपनीच्या प्रगतीला हातभार लावण्याचे काम करतात. त्याबदल्यात सामाजिक परतफेड करण्याची जबाबदारी असावी म्हणून सामाजिक कृतज्ञता निधीची तरतूद करण्यात आली आहे. खाजगी क्षेत्रातील काही कंपन्या नफ्याचा काही भाग बाजूला काढून ठेवतात. एक सामाजिक जबाबदारी म्हणून या निधीच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्यात येते. याच माध्यमातून अनेक ठिकाणी शाळा, रुग्णालये, पाण्याची व्यवस्था त्याचबरोबर इतर समाजपयोगी कामे केली जातात.