Nashik Namami Goda : वाराणसी, प्रयागराज मॉडेलवर नमामि गोदा प्रकल्प, केंद्राकडून निधी मंजूर
Nashik Namami Goda : नमामि गंगा प्रकल्पाच्या धर्तीवर नाशिक महापालिकेकडून नमामि गोदा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
Nashik Namami Goda : नाशिक (Nashik) शहरातील महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेला नमामि गोदा (Namami Goda) प्रकल्पासाठी अलमोंडझ कंपनीची सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या कंपनीस पुढील सहा महिन्यात प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे आदेश नाशिकचे मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Nashik NMC) यांनी दिले आहेत तर जवळपास एक हजार आठशे तेवीस कोटींचा निधी यासाठी मंजूर झाला आहे.
नमामि गंगा प्रकल्पाच्या धर्तीवर नाशिक महापालिकेकडून नमामि गोदा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने 1823 कोटींचा निधी मंजूर केला आहे. तर या प्रकल्पाचा आराखडा साधारपणे 1823 कोटी रुपयांचा असून तो तयार करण्यासाठी 17 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे समजते. नाशिक शहरात पाच वर्षांनी होणाऱ्या सिहंस्थ कुंभमेळ्यापूर्वी (Kumbhmela) हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरवण्याची महापालिकेची तयारी आहे. यासाठीच्या सल्लागार नेमणूक प्रक्रिया संथ गतीने सुरू होती. अखेर ही निविदा प्रक्रिया मार्गी लागली असून अलमोंडझ या कंपनीची नमामि गोदा प्रकल्पासाठी सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे. त्यासाठी साबरमती रिव्हरफ्रंट सह वाराणसी व प्रयागराजच्या नदी प्रकल्पांचा अभ्यास करावा अशा सूचना आयुक्तांनी संबंधित कंपनीला दिल्या आहेत.
दरम्यान गोदा नमामि प्रकल्पाचा आराखडा तयार करताना गोदावरीच्या स्वच्छतेला प्राधान्य राहणार असून नाशिकच्या गंगाघाटावरील सर्व प्राचीन वारसा स्थळांना हात न लावता सुशोभीकरणाचा आराखड्यात समावेश करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कंपनीची नेमणूक झाल्यानंतर पुढच्या काही दिवसात नमामी गोदा प्रकल्पाच्या प्रक्रियेला गती येईल. यासाठी अलमोंडझ ही कंपनी पुढील सहा महिन्यात आराखडा तयार करेल. आराखडा तयार करण्यापूर्वी संबंधित सल्लागार संस्थेने अहमदाबाद येथील साबरमती रिव्हर फ्रंट, वाराणशी व प्रयागराज येथील नमामि गंगा या प्रकल्पांची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात पालिकेच्या शहर अभियंत्यांसह यांत्रिकी विभागाची अधिकारी या कंपनीसोबत प्रकल्पांची पाहणी करणार आहेत.
नमामी गोदा प्रकल्प नेमका कसा?
नमामी गोदा प्रकल्पाकरिता सल्लागाराची नेमणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. संबंधित कंपनीला आराखडा तयार करण्यापूर्वी साबरमती, वाराणसी, प्रयागराज या ठिकाणांना भेटी देण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार दिली आहे. नमामि गंगा प्रकल्पाच्या धर्तीवर नमामि गोदा हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे या प्रकल्पाद्वारे शहरातील गोदावरी नदीमध्ये येणारे नाल्यांचे सांडपाणी थेट नदीत जाऊन देता शहराबाहेर काढले जाणार आहे. यामुळे गोदावरी नदीचे प्रदूषण रोखता येणार असून गोदावरीचे पाणी शुद्ध होणार आहे. तसेच गोदावरी नदी घाटांचे सुशोभीकरण, कारंजे, पुरातन मंदिरांचे जतन, लेझर शो याद्वारे गोदेचे सौंदर्य खुलवले जाणार आहे.