भुजबळांनंतर अजित पवारांचा आणखी एक आमदार नाराज; मंत्रिपद न मिळाल्याने अधिवेशन सोडून परतले
हिवाळी अधिवेशन सोडून पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे मतदार संघात परतले आहेत. अजित पवारांनी मंत्रिपद न दिल्यानं बनसोडे नाराज आहेत.
पुणे : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. कारण, अनेक बड्या नेत्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. तर, महायुतीच्या शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची जबाबदारी निभावलेल्या तब्बल 12 नेत्यांना मंत्रिमंडळातू डच्चू देण्यात आला आहे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या (Ajit pawar) राष्ट्रवादीतील माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही मंत्रिमंडळात स्थान नाही. त्यामुळे, भुजबळांनी जाहीरपणे अजित पवारांवर नाराजी व्यक्त केली असून पुढील काही दिवसांत आपला निर्णय जाहीर करू, असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, भुजबळांसह सर्वच राजकीय पक्षात अनेक आमदार मंत्रिपदासाठी आस लावून बसले होते. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने नाराज झाले आहेत. त्यामध्ये, पुणे (Pune) जिल्ह्यातील पिंपरी मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनीही नाराजी उघड करत अधिवेशन सोडून मतदारसंघ गाठला आहे.
हिवाळी अधिवेशन सोडून पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे मतदार संघात परतले आहेत. अजित पवारांनी मंत्रिपद न दिल्यानं बनसोडे नाराज आहेत. नागपुरात 39 आमदारांच्या मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर अधिवेशनात माझं मन लागत नव्हतं. त्यातच, माझ्या घरी नात्यात दुःखद घटना घडली, म्हणून मी अधिवेशन सोडून परतलो, असे अण्ण बनसोडे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं. मात्र, नागपूरहून परत आलेले नाराज अण्णा बनसोडे पुन्हा अधिवेशनात परतले नाहीत. मला मंत्रिपद भेटेल ही अपेक्षा आणि विश्वासही होता, मी तिसऱ्यांदा पिंपरी विधानसभा मतदारसंघातून भरगोस मतांनी विजयी झालो आहे. त्यामुळे, अजित दादा मला मंत्रिपद देतील असा विश्वास होता. मात्र, भ्रमनिराश झाला असला तरीही दादा हा शब्द नक्कीच पाळतील असा मला विश्वास असल्याचंही आमदाराने म्हटले. मतदारसंघातील लोकांच्या कामासाठी मी मतदारसंघातून परतलो आहे, दादांना भेटूनच मी इकडे आल्याचेही अण्णा बनसोडे यांनी एबीपीशी बोलताना म्हटले.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात राज्यातील 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामध्ये, 33 कॅबिनेट व 6 राज्यमंत्रीपदाचा शपथविधी संपन्न झाला. या 39 मंत्र्यांमध्ये पुणे जिल्ह्याला 3 मंत्रिपद मिळाली असून उपमुख्यमंत्री अजित पवारांसह एकूण 4 मंत्रिपद पुणे जिल्ह्याला मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांत पाटील, दत्तात्रय भरणे आणि माधुरी मिसाळ हे राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री आहेत, जे पुणे जिल्ह्यातून येतात. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळातही पुणे जिल्ह्याला स्थान मिळाले असून मुरलीधर मोहोळ हे केंद्रात मंत्रिपदी विराजमान आहेत.