Travel BLOG : रोड ट्रिपमध्ये काय करावं आणि काय करू नये?
>> अमेय चुंभळे, ABP माझा प्रतिनिधी
मंडळी रोड ट्रिप कशी प्लॅन करावी हे आपण मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं. रोड ट्रिपवर असताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, यावर आज चर्चा करूयात.
- संपूर्ण ट्रिपमध्ये कारची काळजी घ्या. ओव्हरटेकिंगसाठी गाडी डांबरी रस्त्याच्या खाली उतरवण्यासारखे प्रकार करू नका. ट्रिप दरम्यान गॅरेजमध्ये जावं लागलं तर बराच वेळ वाया जाईल.
- टायरमध्ये हवेच्या ऐवजी नायट्रोजन भरा. त्यानं टायर थंड राहतात, आणि गाडीची स्थिरता वाढते.
- अति खाणं, जागरणं टाळा. 10-15 दिवसांच्या रोड ट्रिपमध्य़े तब्येत व्यवस्थित राहिली पाहिजे, नाहीतर सर्वांचाच हिरमोड होतो.
- ग्रुपमधील गाडी चालवणाऱ्या मंडळींकडे विशेष लक्ष द्या. ते पुरेशी झोप घेतायेत आणि आदल्या रात्री किंवा वाटेत दारू पीत नाहीयेत ना, यावर लक्ष ठेवा.
- एखाद्या ठिकाणी पोहोचताना वाटेतच खूप उशीर झाला तर आहात तिथं रूम बुक करून मुक्काम करा, मात्र रात्रीचा प्रवास टाळा. दिवसभर कार चालवून शरीर थकतं हे वास्तव आहे.
- पर्यटन स्थळांचा आनंद घ्या, मात्र विशिष्ठ शहरातली सर्वच पर्यटन स्थळं पाहण्याचा अट्टाहास करू नका.
- परिस्थितीनुसार ट्रिपमध्ये बदल करण्यास पुढे-मागे बघू नका. सर्वांच्या हितासाठी आणि सुरक्षेसाठी काही बदल करावे लागले तर आपल्याला कुणीही शिक्षा करणार नाहीये हे लक्षात घ्या.
- प्रवासात किंवा पर्यटन स्थळांवर गेल्यावर अजिबात धोका पत्करू नका. आपण ट्रिपवर असलो तरी घरी आपली कुणीतरी वाट पाहतंय हे नेहमी लक्षात ठेवा
- स्थानिकांशी सन्मानानं वागा, त्यांच्या सूचना गांभीर्यानं घ्या. अरुंद घाटरस्ते, घनदाट जंगल, गुफा, धबधबे, नदी, तलाव अशा ठिकाणी जाण्याआधी स्थानिकांचं मत जाणून घ्या. 'अमुक ठिकाणी जाऊ नका' असं स्थानिक सांगत असतील तर त्यांचं ऐका. नसतं धाडस करण्यात अर्थ नाही.
- सेल्फी आणि रील शूट करताना जीवाची काळजी घ्या. फोटो काढण्यासाठी गाडी कुठेही उभी करू नका. रस्ता अरुंद असेल तर भीषण अपघाताचा धोका असतो. घाट रस्त्यांसाठी तर हे अधिक लागू होतं.
- नियम आणि कायदे मोडू नका. संरक्षित वनक्षेत्रं, व्याघ्र प्रकल्प, युद्धस्मारकं, आंतरराष्ट्रीय सीमा, संग्रहालयं, धार्मिक स्थळं अशा ठिकाणी कायदे आणि नियम असतात, ते तंतोतंत पाळा.
- अनोळखी ठिकाणी रात्री अपरात्री भटकू नका. सगळीच शहरं मुंबई-पुण्यासारखी 24 तास सुरक्षित नसतात. त्यामुळे नव्या ठिकाणी 'नाईट-आऊट' सारखे प्रकार टाळा.
वाचा आणखी एक ब्लॉग :