अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
विधानसभेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरपंच हत्या प्रकरणावर उत्तर दिलं. सरपंच हत्येचा गुन्हा ज्याने केलाय, त्यावर कोणीही असला तरी कारवाई केली जाईल, असं म्हटलं.
नागपूर : राज्याच्या विधिमंडळातील हिवाळी अधिवेशनात बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण चांगलच गाजत आहे. त्यातच, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रश्नावरुन विधानसभेत अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतर विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील थेट धनंजय मुंडेंचे (Dhananjay Munde) खास समजले जाणाऱ्या वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. वाल्मिक कराड हे 4 दिवसांपासून नागपूरच्या फार्म हाऊसवर आहेत, मी पत्ता देतो, त्यांना अटक करा असे थेट सभागृहातच म्हटले. त्यामुळे, हे प्रकरण अधिक संवेदनशील बनले असून गेल्या तीन दिवसांपासून मीडियापासून व सभागृहापासून दूर राहिलेल्या मंत्री धनंजय मुंडेंनी आज माध्यमांसमोर येऊन आपली प्रतिक्रिया दिली. तसेच, अंबादास दानवे यांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली.
विधानसभेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरपंच हत्या प्रकरणावर उत्तर दिलं. सरपंच हत्येचा गुन्हा ज्याने केलाय, त्यावर कोणीही असला तरी कारवाई केली जाईल, असं म्हटलं. आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून वाल्मिक कराडचं नाव घेऊन सांगतो. एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे. त्यावर कारवाई होणारच आहे. पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर कारवाई होणारच, कोणालाही सोडणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत वाल्मिक कराड याचं नाव घेऊन त्यांचा पत्ता देतो, त्यांना अटक करणार का अशी भूमिका व्यक्त केली. त्यावर आता धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
माझ्या नावावर सदनात जो आरोप करण्यात आला आहे, शेवटी पोलीस तपासणार आहे. पोलीस यंत्रणा आहे, सीआयडीकडे तपास दिला आहे. विरोधी पक्षनेत्यानं काय बोलावं हे मला सांगता येत नाही. वाल्मिक नागपुरात कुठे आहे, तेही सांगावे. पोलिसांनी त्यांना पकडण्याचे काम केलं असतं, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली.
म्हणून मी सभागृहात उपस्थित नव्हतो
विधिमंडळात माझ्या सहकाऱ्याच्या संबंधित जर एखाद्या घटनेची चर्चा चालू असेल आणि त्या चर्चेचे उत्तर मुख्यमंत्री देत असतील तर परंपरेनुसार मी सदरात उपस्थित राहिलो नाही. त्याशिवाय सभागृहात उपस्थित न राहण्याचे दुसरे कुठेलेही कारण नाही. विरोधक काहीतरी बोलणार, त्यावर माझ्याकडून बोललं जाणार, त्यावर मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला अडचण होणार असे धनंजय मुंडेंनी म्हटले. तसेच, जे काही असेल ते एकदाच काय दूध का दूध, पाणी का पाणी होऊ जाऊ द्या... मुख्यमंत्र्याच्या उत्तरातून ते कळलं देखील असेही मुंडेंनी म्हटले.
मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलंय, समाधान झालंय
मी सुरुवातीपासून म्हणत आहे, हे घरातलं झालेलं भांडण आहे. त्यातूनच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली आहे. या प्रकरणात तीव्र भावना आमची सगळ्यांची आहे. एस.आय.टी नेमलेली आहे, याचा तपास होणार आहे, कोण होतं, काय काय होतं, घटनेच्या आदल्या दिवशी काय झालं. त्यामध्ये मकोका लावण्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी जो काही बोलले, तो फक्त या प्रकरणात लावायचा आहे, की यापुढे अशा प्रकरणात लावायचा आहे, यावरही मुख्यमंत्री यांनी निवेदन केलं आहे. स्वाभाविक, सर्वांचं समाधान झाला आहे, असे धनंजय मुंडेंनी म्हटले. दरम्यान, या घटनेत ज्यांनी कोणी अशा पद्धतीने हत्या केली, त्यांना सर्वांना फाशी झाली पाहिजे ही माझी भूमिका असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.