Zero Hour : मुंबई, परिसरात मराठी माणूस सुरक्षित नाही? कल्याणमधील घटनेचे हिवाळी अधिवेशनात पडसाद
Zero Hour : मुंबई, परिसरात मराठी माणूस सुरक्षित नाही? कल्याणमधील घटनेचे हिवाळी अधिवेशनात पडसाद
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई आणि आसपासच्या परिसरा मराठी माणूस सुरक्षित नाहीय का असा प्रश्न निर्माण होतोय. कारण कल्याणच्या एका उच्चभ्रू सोसायटीत एका मराठी कुटुंबाला अमराठी व्यक्तीनं गुंडांकडून बेदम मारहाण केलीय. कारण काय तर, केवळ धूप लावण्यावरून दोन महिलांचा वाद झाला, आणि तो वाद सोडवण्यासाठी गेलेल्या देशमुख कुटुंबातील काही सदस्यांना आरोपी अखिलेश शुक्लानं जीवघेणी मारहाण केली. एवढंच नाही तर मारहाण करताना त्यानं मराठी माणसांविषयी अतिशय संतापजनक उद्गार काढले. मांसमच्छी खाणारे तुम्ही मराठी लोक घाणेरडे आहेत, तुमच्यासारखे लोक मी झाडू मारायला ठेवतो, माझं कुणी काहीही करू शकणार नाही अशी संतापजनक शेरेबाजी शुक्लानं केली. पण हे प्रकरण इथंच संपत नाही. आम्ही तक्रार देण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी आम्हाला पाच तास बसवून ठेवलं, आणि त्यानंतरही अतिशय किरकोळ गुन्हे दाखल केले असा आरोप देशमुख कुटुंबीयांनी केला आहे. या आरोपात तथ्य आहे असं वाटण्यास जागा आहे, कारण घटना दोन दिवसांपूर्वीची असूनही पोलिसांनी अटकसत्र आज दुपारी सुरू केलं. दुपारी चारच्या सुमाराला अखिलेश शुक्लानं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे. या प्रकरणाचे पडसाद नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही उमटले. सर्वपक्षीय आमदारांनी या घटनेकडे लक्ष वेधलं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत सविस्तर निवेदन केलं. माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, एमटीडीसीच्या सेवेत असलेला आरोपी शुक्लाला निलंबित करण्यात आलं आहे, अशी माहिती फडणवीसांनी सभागृहाला दिली.