हा अजून मरत नाही, जिवंत कसा?, लोक माझ्या मरणाची वाट पाहतायत...; शरद पोंक्षेंचं धक्कादायक वक्तव्य
Purush Marathi Natak: ती वेळ आणि ठिकाण आल्याशिवाय मला कोणीच मारू शकत नाही. त्यामुळे मला त्याची भिती नाही, असं शरद पोंक्षे म्हणाले.
Sharad Ponkshe Statement on Purush Natak : आपल्या परखड वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) आता रंगभूमीवर 40 वर्षांपूर्वीचं नाटक घेऊन येत आहेत. ज्येष्ठ नाटककार जयवंत दळवी (Jaywant Dalvi) यांचं पुरुष नाटक (Purush Marathi Play) जवळपास 40 वर्षांनंतर रंगभूमीवर दाखल होणार आहे. या नाटकाच्या निमित्तानं त्यांनी एबीपी माझाला विशेष मुलाखत दिली. त्यासाठी शरद पोंक्षे आणि नाटकातील कलाकार उपस्थित होते. यावेळी सर्वांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. नाटक, नाटकातील संवाद, त्यामधील व्यक्तिरेखा यांसारख्या अनेक गोष्टींवर सर्वांनी संवाद साधला. याच मुलाखती बोलताना शरद पोंक्षे यांनी मात्र, नाटकासोबतच काही धक्कादायक वक्तव्य देखील केली. यावेळी अनेकजण माझ्या मरणाची वाट पाहतायत, असं सांगितलं. तसेच, त्यांच्या सोशल मीडियावरच्या पोस्टखाली हा जिवंत कसा, हा अजून मेला का नाही... यांसारख्या कमेंट असतात, असंही त्यांनी सांगितलं.
शरद पोंक्षे बोलताना म्हणाले की, "अनेकजण खूप शिव्या घालतात मला, पुरूष नाटकाच्या पोस्टवरती काही लोकांच्या रिअॅक्शन्स होत्या, तुझी मुलगी मात्र तू अमेरिकेला पाठव शिकायला. याचा काय संबंध आहे? कारण पोस्ट कोणती आहे, पुरूष नाटकाचा प्रोमो टाकलाय. त्यावर काय रिअॅक्शन्स... तर तुझी पोरगी अमेरिकेला पाठव शिकायला. आम्ही काय नाटक पाहायला यायचं काय? अरे, मग येऊ नकोस नाटक पाहायला. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे मी दुर्लक्ष करतो. कारण मरणाची वेळ आणि ठिकाण ठरलेलं आहे, हे लक्षात ठेवा. ती वेळ आणि ठिकाण आल्याशिवाय मला कोणीच मारू शकत नाही. त्यामुळे मला त्याची भिती नाही. मध्ये एकदा 2019 मध्ये अशीच वेळ आलेली, पण ती ठरलेली वेळ आणि ठिकाण नव्हतं, त्यामुळे त्यातूनही बाहेर आलो मी. हा तर पोटात गोळा आला असेल लोकांच्या की, हा अजून कसा मरत नाही. अजून शरद पोंक्षे मेला नाही वाटतं हा... अजूनही जिवंत आहे वाटतं हा... असंस्कृत पणाचा कळस ठायी ठायी दिसतो... त्यामुळे हाथी चले अपनी चाल, कुत्ते तो भोंकते रहते है... त्यामुळे आपण काही घाबरण्याचं कारण नाही. कोण काय करणार आहे...."
शरद पोंक्षेंची थेट देवेंद्र फडणवीसांना विनंती, म्हणाले...
महायुती सरकारच्या मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर काही मंत्र्यांच्या शपथविधीवर बोलताना शरद पोंक्षेंनी नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पुरुष नाटकाचा प्रयोग ठेवण्याची विनंती एबीपी माझाच्या माध्यमातून केली. ज्येष्ठ नाटककार जयवंत दळवी यांचं पुरुष नाटक जवळपास 40 वर्षांनंतर रंगभूमीवर दाखल झालं. पण या नाटकाचे फक्त 50 प्रयोग होणार आहेत. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येणार आहे. स्त्रीच्या संघर्षाची गाथा आणि समाजाच्या पुरुषप्रधान मानसिकतेवर सडेतोड भाष्य करणारी ही कलाकृती आहे.
कला आणि राजकारण कायमच हातात हात घेऊन चालतात,ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप आहेत, त्यांनाच मंत्रीपदं दिली जात आहेत, अशा बातम्या देखील आहेत. त्यावर शरद पोंक्षेंनी म्हटलं की, त्यासाठीच तुम्ही आमचं नाटक बघायला या. राजकीय क्षेत्रातील लोकांनी तर नक्की या. राजकीय क्षेत्रातील लोकांनी हे नाटक का बघावं? यावर शरद पोंक्षेंनी म्हटलं की, तुमच्यात सुधारणा होण्यासाठी आयुष्यात कुणीतरी आरसा दाखवणारं लागतं तुमच्यात सुधारणा होण्यासाठी. वाल्या कोळीलाही कुणीतरी आरसा दाखवला. तेव्हा त्याला त्याचा चेहरा भयानक दिसला. ते दाखवणारे नारदमुनी होते. त्याला दिसलं की अरे बापरे, मी इतका भयानक आहे आणि त्याने स्वत:ला बदललं.
शरद पोंक्षे म्हणाले की, "आताच्या राजकारण्यांना आरसा दाखवण्याची गरज आहे, असं वाटतंय का? त्यावर शरद पोंक्षे म्हणाले की, खोट्या आशेवर जगायला काय हरकत आहे. आपण सामान्य माणसं काहीतरी चांगलच होणार, याच आशेवर जगतोय आपण. मग ही आशा आहे माझी, कधीतरी चुकून एक-दोन आमदार आले, मी बोलावणार आहे त्यांना अधिवेशन संपलं की, मी तुमच्या 288 आमदारांसाठी प्रयोग करायला तयार आहे. फडणवीस साहेब नागपुरातलं अधिवेशन संपलं की शेवटच्या दिवशी आमच्या नाटकाचा प्रयोग लावा. म्हणजे सगळ्यांना आरसा दिसेल. त्यातले सगळेच तसेच नाहीत. त्यांनी कोणते संवाद ऐकावेत असं वाटतं, त्यावर शरद पोंक्षे म्हणाले की, त्यासाठी पुरुषवर एक वेगळं अधिवेशन घ्यावं लागेल."
पाहा व्हिडीओ : Sharad Ponkshe Interview : लोक माझ्या मरणाची वाट बघतात, शरद पोंक्षेंनी ट्रोलर्सला सुनावलं