Nashik Godavari Flood :आता गोदावरीच्या पुराच्या पाण्याचे रेखांकन होणार, पुराचा धोका ओळखता येणार
Nashik Godavari Flood : गोदावरीच्या (Godavari Flood) पुराच्या पाण्याचे रेखांकन होणार असून त्याद्वारे पुराचा धोका वेळीच ओळखता येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त रमेश पवार (Nashik NMC) यांनी दिली आहे.
Nashik Godavari Flood : गोदावरी (Godavari River) नदिला येणाऱ्या पुराबाबत गंगापूर धरणातून (Gangapur Dam) सोडण्यात येणारे पाणी व गोदावरी नदिला मिळणाऱ्या नाल्यांचे तसेच पावसाचे पाणी याचा अंदाज घेऊन पुराच्या (Godavari Flood) पाण्याचा विस्तार कुठपर्यंत होणार, याचे रेखांकन करण्याचा निर्णय मनपा आयुक्त रमेश पवार यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकित घेतला असून याबाबत लवकरच बांधकाम विभागाच्या वतीने जलसंपदा विभागाला पत्र पाठविले जाणार आहे.
गोदावरी नदिला गंगापूर धरणातून सोडण्यात येणारे पाणी व गोदावरी नदिला गंगापूर गाव ते होळकरपुल दरम्यान असणारे नाले यांच्यातून येणारे पाणी व पावसाचे पाणी यामुळे पूर येतो. जलसंपदा विभागाच्यावतीने 2008 मध्ये आलेल्या पुराच्या आधारे निळी व लाल पूर रेषा ठरविण्यात आली आहे. निळी पूर रेषा ही गेल्या 25 वर्षात आलेल्या पुराच्या तर लालरेषा गेल्या 100 वर्षात आलेल्या पुराच्या आधारे ठरविण्यात आली आहे. मात्र ही पूररेषा ठरविताना या रेषेपर्यंत पुराचे पाणी आल्यास हे पाणी शहराच्या कीती भागापर्यंत पसरू शकते याचे मापक मात्र अजुनही ठरविण्यात आलेेले नाही. त्यामुळे नदिकाठी असलेल्यांना पुराचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळेच हे रेखांकन करण्याचा निर्णय मनपा आयुक्तांनी घेतला असून पूरस्थितीत आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घेता याव्यात यासाठी आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी गंगापूर धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गाच्या अनुषंगाने गोदावरीच्या दोन्ही किनाऱ्यावर पुराच्या पाण्याचे रेखांकन करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
या अनुषंगाने मनपा आयुक्तांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांच्या समवेत बैठक घेतली. गोदावरी नदिला पूर आला की प्रामुख्याने सराफ बाजार, दहीपूल आणि हुंडीवाला लेनमध्ये पाणीच पाणी होते. तेथील व्यावसायिकांना आर्थिक फटका बसतो. त्यांच्या दुकानात पाणी जाऊन आतमधील सामानाचे नुकसान होत असते. किनाऱ्यावर दाटीवाटीने व लहान बांधकामे आहेत. त्यात अनेक जुने वाडे व घरांचा समावेश आहे. सराफ बाजारासारखी महत्त्वपूर्ण वस्तीही गोदावरीच्या किनाऱ्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. दरवर्षी येणार्या पुरामुळे नदीकाठच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
नाशिक (Nashik) मनपाचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी म्हणाले कि, गोदावरी नदिपात्रात असलेल्या आसाराम बापू ते टाळकुटेश्वर पुलांवर प्रत्येक फुटांवर रेखांकन करण्यात येणार आहे. पावसाचा रेड अॅलर्ट लक्षात घेत जलसंपदा विभागाने पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. त्यानुसार, गोदावरीच्या किनाऱ्यावर अहिल्याबाई होळकर पूल ते दसक या भागात कोणत्या पातळीपर्यंत पाणी जाते याचे रेखांकन केले जाणार आहे. त्याचबरोबर जलसंपदा विभाच्या माहितीनुसार केलेल्या रेखांकनाची केंद्रिय जल संशोधन केंद्रामार्फत तपासणी करण्यात येणार आहे.
कन्नमवार पुलाजवळ जलमापन यंत्रणा
गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्याचे मापन करण्यासाठी कन्नमवार पुलाजवळ केंद्रीय जल आयोगाच्या वतीने टॉवरच्या सहाय्याने जलमापन यंत्रणा बसविण्यात आली आहे. याद्वारे गोदावरीची पूर पातळी कीती आहे, याची माहिती हैद्राबादहून दिल्लीला पाठविण्यात येते. तसेच याची माहिती जिल्हाधिकार्यांना संदेशाद्वारे पाठविण्यात येते. अशी यंत्रणा गोदावरी पात्रात नाशिक, कोपरगाव, पैठण, नांदेड या ठिकाणी बसविण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे या शहरातून वाहणार्या गोदावरी नदिला आलेल्या पुराची पातळी कीती आहे, याची माहिती हैद्राबाद येथील कार्यालयास मिळाल्यास ते तत्काळ संबंधित जिल्हाधिकार्याना कळविण्यात येते.