
Nashik Baglan : बागलाणचं केळझर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, दिंडोरीच्या पुणेगाव धरणातून विसर्ग, नाशिक जिल्ह्याचा धरणसाठा!
Nsshik News : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात अद्यापह पावसाची प्रतीक्षा असून जिल्ह्यातील काही भागात रिपरिप सुरु असल्याने धरणे हळूहळू भरू लागली आहेत.

Nashik Rain : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात अद्यापह पावसाची प्रतीक्षा असून जिल्ह्यातील काही भागात रिपरिप सुरु असल्याने धरणे हळूहळू भरू लागली आहेत. मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असून जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (trimbakeshwer), इगतपुरी, सुरगाणा पेठ, आदी तालुक्यांसह कसमादे पट्ट्यात रिपरिप सुरु असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. बागलाण तालुक्यातील केळझर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून ओसंडून वाहू लागले आहे. तर दिंडोरी (Dindori) तालुक्यातील पुणेगाव धरणही ओव्हरफ्लो झाले आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यातील (Nashik District) बहुतांश भागात पावसाची अवकृपा असून अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. बागलाणच्या पश्चिम भागास वरदान ठरलेले 572 दलघफू क्षमता असलेले केळझर (गोपाळ सागर) धरण (Kelzar Dam) आज सकाळी पूर्ण क्षमतेने भरले. धरणाच्या सांडव्यावरून आरम नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. केळझर मध्यम लघू प्रकल्प परिसरात मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे केळझर धरण ओसंडून वाहू लागले आहे. बागलाण (Baglan) तालुक्यातील बहुतांशी शेती सिंचनाखाली आणण्यात केळझर धरणाच्या डांगसौंदाणे पाणलोट क्षेत्राचा मोठा फायदा होतो. केळझर धरणं भरल्याने आरम खोऱ्यातील शेतकरी आनंदी झाले आहे. शेत व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
तसेच धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरण (Punegaon Dam) क्षेत्रात समाधानकारक पाऊस बरसत असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या दोन दरवाजातून ओझरखेड धरणाकडे पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. दिंडोरी तालुक्यात एकूण सहा धरण असून , त्यापैकी फक्त पुणेगाव धरण प्रथम पूर्ण क्षमतेने भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. पुणेगाव धरणातून चांदवड तालुक्याला कॅनॉलद्वारे पाणी सोडले जाते. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक भाग अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे बहुतांश धरणे कोरडीठाक असून मनमाड शहरात पाणीटंचाई सुरु आहे. अशात काही भागात पावसाची रिपरिप सुरु असल्याने याच पावसावर शेतकऱ्यांनी पिके उभी केली आहेत. तर इगतपुरी तालुक्यातील अनेक धरणे भरली आहेत.
नाशिकला पावसाची प्रतीक्षा
पावसाळा सुरू होऊन सुमारे दोन महिन्याचा कालावधी लोटला असला तरी नाशिक जिल्ह्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात सर्वदूर पाऊस सुरू अनेक भागात पूर परिस्थिती येऊन पुरही ओसरला. मात्र नाशिकला अद्याप पहिल्याच पुराची प्रतीक्षा आहे. आज सकाळपासून तर सूर्यदर्शन होत असल्याने पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अद्यापही अपेक्षित असा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून शेतकऱ्यांसह नाशिककर आभाळाला आस लावून बसल्याचे चित्र आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Nashik Rain Update : पावसाचे दोन महिने उलटले, नाशिक जिल्हा तहानलेलाच, मनमाड शहरवासियांवर पाणीटंचाईची वेळ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
