(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात आज सूर्यदर्शन, शेतकरी चिंतेत, दमदार पावसाची प्रतीक्षा कायम, पावसाचा अंदाज काय?
Nashik Rain Udpate : पावसाचा दोन महिन्याचा कालावधी लोटला असला तरी नाशिक जिल्ह्यात (Nashik) अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
Nashik Rain Udpate : पावसाळा (Rainy Seasion) सुरू होऊन सुमारे दोन महिन्याचा कालावधी लोटला असला तरी नाशिक जिल्ह्यात (Nashik District) अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात सर्वदूर पाऊस सुरू अनेक भागात पूर परिस्थिती येऊन पुरही ओसरला. मात्र नाशिकला अद्याप पहिल्याच पुराची प्रतीक्षा आहे. आज सकाळपासून तर सूर्यदर्शन होत असल्याने पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अद्यापही अपेक्षित असा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून शेतकऱ्यांसह नाशिककर आभाळाला आस लावून बसल्याचे चित्र आहे.
राज्यभरामध्ये मान्सून (Maharashtra Rain) दमदार हजेरी लावली असली तरी नाशिक जिल्ह्याला मात्र अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षाच असल्याचं बघायला मिळते आहे. पावसाळ्याचे दोन महिनेउलटून आता तिसरा महिना सुरु झाला असतानाही जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याने हलक्या सरींवर भाताची आवणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र पावसाने अशीच उघडीप दिली तर भात पिके (Rice Crop) करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आता पुढील पाच दिवसांपैकी दोन दिवस येलो अलर्ट तर तीन दिवस कोणताही अलर्ट पावसाकडून देण्यात आलेला नाही. त्यामुळे नाशिककरांसह शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकणातील रायगड (Raigad) आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे नाशिक जिल्ह्यावर वरुणराजा रुसला कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer), इगतपुरी तालुक्यात पावसाची रिपरिप सुरु असल्याने शेतीकाम सुरु आहेत, नाशिक शहर परिसरात कधीतरी हलक्या श्री कोसळत असल्याने दमदार पाऊस नाशिककरांना पाहायला मिळाला नाही. त्यामुळे शहरवासीयांसह जिल्ह्यातील नागरिकांची मोठी निराशा झाली असून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत नाशिककर आज लावून बसले आहेत.
पुढील पाच दिवस अंदाज काय?
पाऊस सुरु होऊन दोन महिने उलटले असून आता पावसाचे दोन महिने शिल्लक आहेत. अशात नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे, पाऊस पडेल असे आशादायी चित्र निर्माण होते. मात्र प्रत्येक वेळी पाऊस हुलकावणी देत असून आज तर सूर्यदर्शन होत असल्याने पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हवामान विभागानुसार पुढील पाच दिवस सुद्धा नाशिक जिल्ह्याला कोणताही अलर्ट नसल्याचे २ ऑगस्ट येलो अलर्ट, ३ ऑगस्ट येलो अलर्ट तर पाच ऑगस्ट पर्यंत कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही, त्यामुळे अजूनही नाशिकला पावसाची वाट पहावी लागणार असल्याची चिन्हे आहेत.
इतर संबंधित बातम्या :