(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : नाशिकमध्ये अंधश्रद्धेचा कळस; भुताटकीच्या संशयातून हरसूलच्या वृद्ध दाम्पत्याला मारहाण
Nashik News : नाशिक जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात अनेकदा अंधश्रद्धेच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
Nashik News : पुरोगामी महाराष्ट्रात आजही भगत बुंवावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. नाशिक (Nashik) जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात अनेकदा अंधश्रद्धेच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अशातच त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यात एका व्यक्तीच्या मृत्यूला वृद्ध दाम्पत्यास जबाबदार धरण्यात आले आहे. त्याचबरोबर या वृद्ध दाम्पत्यास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते (Kalmuste) येथील पिंपळाचा पाडा येथील ही घटना आहे. येथील भीमा बारकू तेलवडे यांच्या मोठ्या भावाचा गुजरातमधील मोहपाडा येथे दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पुतणीकडे वृद्धापकाळाने मृत्यू झाला. अंत्यविधीसाठी मृतदेह कळमुस्ते गावी आणण्यात आला. मात्र मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वीच त्यांच्या मृत्यूला त्यांचा सख्खा भाऊ भीमा बारकू तेलवडे आणि त्यांच्या पत्नी भागीबाई भीमा तेलवडे हे दोघे कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला. त्याचबरोबर या कुटुंबाने संबंधित दाम्पत्याला जबर मारहाण केली. यात दोघेही जखमी झाले आहेत.
दरम्यान, कळमुस्ते गावातील तरुणाने दाम्पत्यास जखमी अवस्थेत हरसुल पोलीस स्टेशनला आणले. अंनिसचे डॉ. गोराणे यांनी हरसूल पोलिसांशी तातडीने संपर्क केला. यानंतर हरसूल पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी अंनिसने वृद्ध दांपत्यास नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी या दाम्पत्याची भेट घेत घटनेची माहिती घेतली. त्यानुसार या दाम्पत्याचा मुलगा रवी तेलवडे यांनी सांगितले की, मागील सात आठ वर्षांपासून गावातील काही लोक आई-वडिलांना भुताटकीच्या संशयातून त्रास देत आहेत. त्याबद्दल मागील दोन वर्षांपासून संबंधित पोलीस प्रशासनाला तक्रार दिल्याचे ते म्हणाले.
एखाद्याला भुताटकीच्या संशयातून अवैज्ञानिक, अशास्त्रीय गोष्टींबाबत जबाबदार धरले जाते. त्यातून जबर मारहाण करणे किंवा प्रसंगी जीव घेण्यासारखे प्रसंग उद्भवतात. अशावेळी संबंधित कुटुंबावर अनेकदा आव सोडण्याची वेळ येते. ग्रामीण आणि आदिवासी भागांत सातत्याने अशा घटना घडतात. त्यासाठी अशा अंधश्रद्धांच्या (Superstitions) विरोधात प्रबोधन करण्याबरोबरच जादूटोणाविरोधी कायद्याचे पोलिसांसह नागरिकांमध्ये प्रशिक्षण आणि जनजागृती होणे अत्यंत गरजेचे असल्याचे अंनिसचे राज्य प्रधान डाॅ. टी. आर. गोराणे यांनी म्हटले आहे. कळमुस्ते येथील तेलवडे कुटुंबाला झालेल्या जबर मारहाणीच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी. तसेच, या घटनेबद्दल दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये जादूटोणाविरुद्ध कलम लावण्यात यावे, असं विनंती पत्र महाराष्ट्र अंनिसच्या वतीने देण्यात आले आहे.