(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Congress Protest : ना स्टेअरिंग...ना इंजिन... भर चौकात पेटवली भंगारतली कार, नागपुरात काँग्रेसचे 'हटके' आंदोलन
Maharashtra Congress Protest : सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीच्या विरोधात राज्यभर काँग्रेसकडून आंदोलने करण्यात येत आहे. नागपुरातही युवक काँग्रेसचे कार्यकरर्ते आक्रमक झाले. नागपुरातील जीपीओ चौकात कार्यकर्त्यांनी एक कार पेटवून दिली.
नागपूर : सोनिया गांधींच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ तिथे नागपुरातही युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले.आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क कारच पेटवून दिली पण ही कार भंगारातली असल्याने मोठं नुकसान झालं नाही. पोलिसांनी स्टंटबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे
सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीच्या विरोधात राज्यभर काँग्रेसकडून आंदोलने करण्यात येत आहे. नागपुरातही युवक काँग्रेसचे कार्यकरर्ते आक्रमक झाले. नागपुरातील जीपीओ चौकात कार्यकर्त्यांनी एक कार पेटवून दिली. त्यामुळे परिसरात तणाव पाहायला मिळाला. या प्रकारानंतर पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.
मात्र युवक काँग्रेसच्या या आंदोलनात पेटवून देण्यात आलेली कार ही भंगारातली निघाली आहे. ज्या कारला इंजिन नव्हतं, स्टेरिंग नव्हतं, इतर कोणतेही स्पेअर पार्ट नव्हते. ती भंगारातली कार हाताने ढकलून चौकात आणण्यात आली आणि नंतर पेटवून देण्यात आली. नागपुरातील अत्यंत वर्दळीच्या जीपीओ चौकात अचानकपणे अशी कार पेटवून देण्यात आल्यामुळे तिथून जाणाऱ्या नागरिकांमध्ये घबराट पसरली. लोकांची पळापळ झाली, त्यामुळे काही वेळ या परिसरात तणाव पाहायला मिळाला आहे.
कार पेटवल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत आग विझवली. पोलिसांनी स्टंटबाजी करणाऱ्या युवक काँग्रेसच्या सुमारे 40 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
कॉंग्रेसकडून देशभरात निषेध
मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी आज दुसऱ्यांदा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी करत आहे. सोनिया गांधींच्या या चौकशीमुळे काँग्रेसमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसह कार्यकर्ते देशभरात रस्त्यावर उतरून निषेध करत आहेत. या दरम्यान राहुल गांधीही दिल्लीतील विजय चौकात निदर्शने करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सामील झाले होते, त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुल गांधी यांना किंग्सवे कॅम्पमध्ये नेण्यात आले आहे.
पाहा व्हिडीओ :