Rahul Gandhi Detained : दिल्लीत राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं, सोनिया गांधींच्या ED चौकशीविरोधात काँग्रेसचं तीव्र आंदोलन
National Herald Case : सोनिया गांधींच्या ED चौकशीविरोधात काँग्रेसमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसह कार्यकर्ते देशभरात रस्त्यावर उतरून निषेध करत आहेत.
National Herald Case : मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money Laundering) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांच्या चौकशीच्या विरोधात काँग्रेसकडून निषेध करण्यात येत आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या राहुल गांधींना (Rahul Gandhi) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कॉंग्रेसकडून देशभरात निषेध
मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी आज दुसऱ्यांदा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी करत आहे. सोनिया गांधींच्या या चौकशीमुळे काँग्रेसमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसह कार्यकर्ते देशभरात रस्त्यावर उतरून निषेध करत आहेत. या दरम्यान राहुल गांधीही दिल्लीतील विजय चौकात निदर्शने करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सामील झाले होते, त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुल गांधी यांना किंग्सवे कॅम्पमध्ये नेण्यात आले आहे.
#WATCH | Congress leader Rahul Gandhi detained by Delhi Police at Vijay Chowk
— ANI (@ANI) July 26, 2022
Congress MPs had taken out a protest march from Parliament to Vijay Chowk pic.twitter.com/kjfhKx0Gvd
--------------------------
काँग्रेसच्या खासदारांनाही ताब्यात घेण्यात आले
माहितीनुसार, राहुल गांधी यांना राष्ट्रपतींना भेटून त्यांना निवेदन द्यायचे होते, मात्र त्यांना विजय चौकाच्या पलीकडे जाऊ दिले नाही. त्यानंतर राहुल विजय चौकातच धरणे धरून बसले. या सर्व प्रकारानंतर राहुल गांधींना ताब्यात घेण्यात आले. त्याचवेळी पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी संसद भवन परिसर ते विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. यावेळी काँग्रेसच्या अनेक खासदारांना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी म्हणाले...
ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसचे हे खासदार विजय चौकात आले आहेत. बेरोजगारी ते महागाई यासह इतर अनेक मुद्द्यांवर त्यांना बोलायचे होते, मात्र पोलीस त्यांना येथे बसू देत नाहीत. दुसरीकडे संसदेत चर्चा होऊ दिली जात नाही आणि इथे पोलीस आम्हाला अटक करत आहेत.