Mumbai Traffic Police : मुंबई वाहतूक पोलीस अवजड वाहनांविरोधात विशेष मोहीम राबवणार
Heavy Vehicles : अवजड वाहनांच्या चालकांमध्ये शिस्त राहावी आणि अवजड वाहनचालकांकडून होणारी वाहतूक रोखता यावी यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.
मुंबई: मुंबईच्या रस्त्यावर शिस्त तोडून चालणाऱ्या अवजड वाहनांविरोधात आता कारवाई होणार आहे. अशा वाहनांविरोधात कारवाई करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीस एक विशेष मोहीम राबवणार आहेत. त्यामध्ये रस्त्याच्या उजव्या बाजूने जड वाहन चालवणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत जास्तीत जास्त कारवाई केली जाणार आहे.
वाहनचालकाने कोणत्या रस्त्याने वाहन चालवावे, हे मोटार वाहन नियमात आधीच नमूद केलेले आहे. त्यानुसार अवजड वाहन चालकाने आपले वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवणे आवश्यक आहे. मात्र, जड वाहनांचे चालक रस्त्याच्या उजव्या बाजूने वाहने चालवल्याने वाहतूक कोंडी निर्माण होऊन गैरसोय होऊन वेळेचा अपव्यय होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. अशा कृतीमुळे रस्ता अपघातही होतो.
त्यामुळे अवजड वाहनांच्या चालकांमध्ये शिस्त राहावी आणि अवजड वाहनचालकांकडून होणारी वाहतूक रोखता यावी म्हणून मुंबई वाहतूक पोलीस अवजड वाहनांविरोधात विशेष मोहीम राबवणार असून त्यामध्ये रस्त्याच्या उजव्या बाजूने जड वाहन चालवणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत जास्तीत जास्त कारवाई केली जाणार आहे.
मुंबईत बाईकवर हेल्मेट सक्ती
मुंबईकर बाईक चालकांना आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून वाहतुकीचा हा नियम अंमलात आणण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी त्या आधी 15 दिवसांपूर्वी याबाबत नोटीस जारी केली होती. त्यानुसार 9 जूनपासून मुंबई वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे.
हेल्मेट नसणाऱ्या दुचाकीस्वारांवर कडक कारवाई करण्यासाठी सुमारे 50 वाहतूक पोलीस चौक्या सतर्क राहणार आहेत. आर्थिक राजधानी मुंबईत मोटारसायकल आणि स्कूटरवर मागे बसणाऱ्या व्यक्तींनाही हेल्मेट परिधान करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. वाहतूक पोलिसांनी 25 मे रोजी हा आदेश जारी केला होता. अनिवार्य असूनही बहुतांश दुचाकी चालक हेल्मेट घालत नाहीत. हेल्मेट न घातल्याने रस्ते अपघातात जखमी आणि मृतांची संख्या वाढली आहे, असं अधिसूचनेत पोलिसांनी म्हटलं आहे.
500 रुपये दंड आणि तीन महिने लायसन्स निलंबित
नवीन नियम लागू करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी 15 दिवसांची मुदत दिली होती. यानंतर नियमांचं उल्लंघन केल्यास मोटार वाहन कायद्यामध्ये 500 रुपये दंड तसंच तीन महिन्यांसाठी लायसन्स निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे. हेल्मेट घालणे दुचाकी चालक आणि त्याच्यामागे बसणाऱ्यांच्या हिताचं असल्याचं वाहतूक पोलिसांचं म्हणणं आहे. पगडी परिधान करणाऱ्या शीखांना हेल्मेटच्या अनिवार्यतेतून सूट देण्यात आली आहे.
दरम्यान, देशातील अनेक शहरांमध्ये दुचाकीस्वार आणि मागे बसणाऱ्यासाठी हेल्मेट अनिवार्य आहे. अनेक ठिकाणी तर पाच वर्षांवरील मुलांसाठीही हेल्मेट सक्तीचं करण्यात आलं आहे.
ही कागदपत्रे ठेवावीत
दुचाकीस्वारांकडे ड्रायव्हिंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी), इन्शुरन्स सर्टिफिकेट इन्शुरन्स सर्टिफिकेट आणि प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. डीएल आणि प्रदूषण प्रमाणपत्र मूळ असावे. आरसी आणि विमा प्रमाणपत्राची छायाप्रत ठेवावी लागेल.