बंदी घातलेल्या निर्यातदारांकडून कायदेशीररित्या रेमडेसिवीर खरेदीबाबत चर्चा सुरु, राजेश टोपेंची माहिती
रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घातल्याने निर्यातीसाठी तयार केलेला निर्यातीचा साठा राज्याला दिला तरी राज्यातील तुटवडा काही दिवसात संपुष्टात येऊ शकतो, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना वैद्यकीय सुविधांची मोठी कमतरता भासू लागली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी लोकांची मोठी धावपळ पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णांना मिळत नाहीयेत. त्यामुळे केंद्र सरकारने रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. याच पार्श्वभूमीवर बंदी असणाऱ्या निर्यातदारांकडून कायदेशीररित्या रेमडेसिवीर खरेदी घेण्याबाबत चर्चा सुरु आहे. आठवडाभरात रेमडेसिवीरचा तुटवडा कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घातल्याने निर्यातीसाठी तयार केलेला निर्यातीचा साठा राज्याला दिला तरी राज्यातील तुटवडा काही दिवसात संपुष्टात येऊ शकतो. ज्या सात कंपन्या रेमडेसिवीरचं उत्पादन करतात त्यांनी जरी पुरवठा केला तर प्रश्न सुटेल. राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यात चर्चा होऊ शकते. मुख्यमंत्री केंद्र सरकारशी चर्चा करुन यासाठी प्रयत्न करु शकतील, असं राजेश टोपे यांनी म्हटलं.
गेल्या काही दिवसात ऑक्सिजनचीही कमतरता भासत होती. राज्याला जवळपास 1400 मेट्रिक टन ऑक्सिजनच्या पुरवठ्याची गरज आहे. सध्याच्या स्थितीत आपण तेवढा पुरवठा करत आहेतच. केंद्राकडून चार-पाच राज्यांकडून ऑक्सिजन घेण्याची परवानगी मिळाली आहे. JSW ने देखील वाढीव ऑक्सिजन उत्पादन सुरु केलं आहे. त्यामुळे पुढील पाच-सहा दिवस आपल्या वाढीव रुग्णसंख्येला पुरेल इतका ऑक्सिजनला पुरवठा होईल. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी आपल्याला जिल्ह्यातील महत्वाच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट सुरुच करावे लागतील. खासगी हॉस्पिटल्सला देखील आम्ही विनंती करणार आहोत, की स्वत:चे ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट सुरु करावे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.