Maharashtra Coronavirus: लिक्विड ऑक्सिजनला पर्याय म्हणून हवेतला ऑक्सिजन घेऊन रुग्णालयांना पुरवणार, राजेश टोपेंची माहिती
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आजपासून ब्रेक द चेनला जनतेने प्रतिसाद देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सगळ्या राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यानं कोणतंही राज्य ऑक्सिजन देत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
जालना : राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. अशात कोरोना रुग्णांना रेमडेसिवीरसह ऑक्सिजनचा देखील तुटवडा भासू लागला आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. लिक्विड ऑक्सिजनला पर्याय म्हणून आता सरकार हवेतून ऑक्सिजन घेवून रुग्णालयांना पुरवणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जालन्यात टोपे यांच्या हस्ते रेमडिसिवर इंजेक्शनचं वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रासह इतर राज्यातही ऑक्सिजनची कमतरता आहे. त्यामुळं कोणतंही राज्य ऑक्सिजन द्यायला तयार नाही. त्यामुळं हवेतला ऑक्सिजन घेवून त्याचं प्युरिफाईड करून ते रुग्णालयांना पुरवणार असल्याची महत्वाची माहिती टोपे यांनी दिली आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर राज्यभरात हा प्रयोग राबवणार असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे. दरम्यान आज पासूनच्या ब्रेक द चेनच्या नियमांचे पालन करून जनतेने सरकारला सहकार्य करावे, अशी विनंती देखील त्यांनी केली.
Break The Chain : राज्यात आज रात्री 8 पासून कलम 144 लागू; काय सुरु, काय बंद?
पुढील 15 दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू
महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यांत 15 दिवसांसाठी संचार बंदीची घोषणा केली. आजपासून राज्यात 144 कलम लागू करण्यात येणार असून पुढील 15 दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याला 'ब्रेक द चेन' असं नाव देण्यात आलं आहे. त्यावेळी त्यांनी राज्यातील आज रात्री 8 वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. संचारबंदीच्या काळात आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील. सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. लोकल, बस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहतील. जनावरांचे दवाखाने सुरु राहतील. पावसाळ्या पूर्वीची कामं सर्व सुरु राहतील. हॉटेल्स, रेस्टॉरंट टेक अवे सुरुच राहणार, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
सर्व दुर्बल घटकांना दिलासा
आर्थिक दुर्बल घटकांमधील दारिद्रय रेषेखालील कुटुंबे, महिला, वयोवृध्द नागरीक, विधवा, दिव्यांग, असंघटित क्षेत्रातील नागरिक, कामगार, रिक्षाचालक व आदिवासी समाज यांना विचारात घेवून आर्थिक सहाय देण्यात येणार आहे. यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, उद्योग-ऊर्जा व कामगार विभाग, नगर विकास विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अर्थसहाय देण्यात येणार आहे.
राज्यात काल 60 हजारांहून अधिक रुग्ण
महाराष्ट्रात कोरोनाचा वेग प्रचंड वाढला असून, फेब्रुवारीपासून होत असलेल्या रुग्णवाढीने मंगळवारी नवा उच्चांक नोंदवला आहे. 24 तासांत तब्बल 60,212 रुग्ण आढळून आले असून, 281 रुग्णांना जीव गमावावा लागला आहे. राज्यात काल 60,212 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 31, 624 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 2,86,6097 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 5, 93, 042 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. काल राज्यात 281 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळं एकूण 58,852 लोकांचा बळी गेला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.44% झाले आहे.