BMC: कोरोनानंतर महापालिका शाळांतील विद्यार्थी संख्येत 42 टक्क्यांची वाढ, मात्र 10 वर्षात मराठी माध्यमातील संख्या रोडावली
Education: गेल्या दहा वर्षांमध्ये महापालिकेच्या मराठी माध्यमांतील विद्यार्थी संख्या 51 टक्क्यांनी घसरली असल्याचं प्रजा फाउंडेशनच्या अहवालात म्हटलं आहे.

मुंबई: कोरोनानंतर मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या 42 टक्क्यांनी वाढली असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबई महापालिकांच्या शाळांच्या स्थिती संदर्भातला प्रजा फाउंडेशनचा अहवाल जाहीर झाला असून त्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. बीएमसी मराठी माध्यमांच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागील दहा वर्षाच्या तुलनेत 51 टक्क्यांनी घसरली आहे. तर इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 40 टक्क्यांनी वाढली असल्याचंही हा अहवाल सांगतोय.
काय म्हटलंय या अहवालात?
मुंबईतील शाळांमध्ये दाखल होणाऱ्या एकूण विद्यार्थ्यापैकी मुंबई महापालिका शाळेत भरती होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 2018-19 ला 36 टक्क्यांनी कमी झाली होती. मात्र कोरोनानंतर आता 2021- 22 च्या अहवालामध्ये ही 42 टक्क्यांनी वाढल्याचं स्पष्ट झालं आहे.
विद्यार्थी संख्येत वाढ बघितली तर पूर्व प्राथमिक वर्गात ही वाढ 78 टक्के तर इयत्ता दहावीमध्ये 25 टक्के वाढ झालेली दिसते.
कोरोनानंतर, मागील दोन वर्षात मुंबई महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी संख्या 79,884 वरून 1,01,110 झाली, म्हणजे त्यामध्ये 27 टक्के वाढ झाली आहे.
तर कोरोनानंतर, मागील दोन वर्षात मुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत फक्त दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मुंबई महापालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये सातत्याने प्रगती होत आहे. या शाळेतील विद्यार्थी संख्येत 92 टक्क्यांची वाढ झाली आहे.
महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थांनी पूर्व प्राथमिक शाळेत शिक्षण घेतल्यानंतर अगदी 40 टक्के विद्यार्थी हे मुंबई महापालिकेच्या शाळेत दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करत आहेत.
आर्थिक वर्ष 2012 -13 मध्ये मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पीय अंदाजात प्रति विद्यार्थी 49,126 रुपयांची तरतूद होती, जी आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 108 टक्क्यांनी वाढवून 1,02,143 रुपये इतकी झाली आहे.
मुंबई महापालिकेमध्ये स्वतंत्र शिक्षण समिती आहे आणि शिक्षण विभागाच्या कामगिरीवर लक्ष ठेवणे या समितीची मुख्य जबाबदारी आहे. सध्या प्रशासनाला उत्तरदायी करण्यासाठी समिती नाही.
परंतु या पुढे शिक्षण समितीने या कामाची धुरा पुढे नेली पाहिजे, नियमित बैठका घेतल्या पाहिजेत आणि मनपा शाळेतील शिक्षण सुधारणाच्या दृष्टीने विविध उपाय योजनांवर चर्चा करून त्या लागू करण्याचे काम केले पाहिजे. त्यासोबतच सध्याचा शिक्षणाचा दर्जा टिकून ठेवून अधिक दर्जा वाढवण्याची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
