(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लाईफलाईन कंपनीनं खोटे डॉक्टर्स आणि रुग्ण दाखवून पैसे लाटले; कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीचा आरोप
बीएमसीच्या जंबो कोविड-19 केंद्र चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या खाजगी कंत्राटदारांनी फसवणूक करून पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचा आरोप ईडीनं केला आहे.
BMC Covid Scam : कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी (BMC Covid Scam) ईडीनं (ED) मोठे आरोप केले आहेत. मोठ्या संख्येनं खोटे डॉक्टर्स आणि रुग्ण कोविड सेंटरमध्ये दाखवण्यात आल्याचा आरोप ईडीनं केला आहे. कोविड सेंटरचं कंत्राट घेतलेल्या लाईफलाईन कंपनीनं पेपर्सवर दाखवलेले डॉक्टर्स आता अस्तित्वातच नव्हते, असं ईडी चौकशीतून समोर आल्याची माहिती मिळत आहे. ईडी याप्रकरणी सध्या चौकशी करतेय. विविध अधिकारी आणि मोठमोठ्या नेत्यांच्या जवळच्या व्यक्ती या प्रकरणात ईडीच्या रडारवर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ईडीनं याप्रकरणी मुंबईत छापेमारी केली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं.
कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. बीएमसीच्या जंबो कोविड-19 केंद्र चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या खाजगी कंत्राटदारांनी फसवणूक करून पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. एवढंच नाहीतर, कोविड सेंटरमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या डॉक्टर्सपैकी अनेक डॉक्टर्सही खोटे असल्याचा आरोप ईडीनं केला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ED ला संशय आहे की, कोरोना महामारीत BMC नं उभारलेली जंबो कोविड सेंटर चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या खाजगी कंत्राटदारांनी महापालिकेकडून फसवणूक करून निधी मिळविण्यासाठी उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केला आहे. यापूर्वी, ईडीनं म्हटलं होतं की, शहरात चार केंद्र चालविणाऱ्या लाईफलाइन हॉस्पिटलनं बनावट डॉक्टरांच्या नावाचा वापर करून 22 कोटी रुपयांचे पेमेंट घेतलं होतं.
कथित कोविड घोटाळ्यात काही मोठ्या अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचं ईडीचं म्हणणं आहे. ईडीकडून सध्या कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगच्या अँगलनं तपास करत आहे.
'या' सगळ्या प्रकरणांमध्ये आरोप नेमके काय आहेत?
- आरोग्य सेवा पुरविण्याचा कोणताही अनुभव नसलेल्या कंपनीला कंत्राट
- करारासाठी बनावट कागदपत्रे सादर
- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने काळ्या यादीत टाकल्याची माहिती कंपनीने लपविली
- 100 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप
- 38 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा
प्रकरण नेमकं काय?
कोरोनाच्या काळात मुंबईत अनेक कोविड सेंटर उभारण्यात आले. मुंबईतील दहिसर येथे असंच एक कोविड केंद्र स्थापन करण्यात आलं होतं. संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणारे उद्योगपती सुजित पाटकर यांनी हे कोविड सेंटर बांधलं असल्याचा आरोप सातत्यानं केला जात आहे. त्यासाठी सुजित पाटकर यांनी रातोरात कंपनी स्थापन केली. ज्याला लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस असं नाव देण्यात आलं होतं.
माहितीनुसार, हे कोविड सेंटर 242 ऑक्सिजन बेडसह उभारण्यात आलं होतं. तिथे, दहिसर केंद्रात आणखी 120 रेग्युलर बेड होते. सुजित पाटकर यांना या कामाचं कंत्राट मिळालं होतं. ते चालवण्यासाठी जून 2020 मध्ये डॉक्टरांशी करार करण्यात आला आणि बीएमसीनं कंत्राट दिलं. त्यांच्या घरावर छापा टाकताना अंमलबजावणी संचालनालयाला (ED) एक कागद सापडल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. याच आधारे असा आरोप केला जात आहे की, कंत्राट मिळून जवळपास एक वर्षानंतर आणि कंपनीच्या खात्यात 32 कोटी रुपये जमा झाल्यानंतर कोविड परिसरातील रुग्णालयांच्या व्यवस्थापनासाठी बीएमसीसोबत करार करण्यात आला होता.